‘आम्ही त्या बंगल्याजवळ चप्पला सोडल्या, आम्ही अगोदर तिकडे आलो’ हे संभाषण ‘सिल्वर ओक’वरील हल्ल्यात अटक करण्यात आलेल्या अभिषेक पाटील आणि बुधवारी नागपूरमधून अटक करण्यात आलेल्या संदीप गोडबोले यांच्यामधील आहे. हल्ल्याच्या काही वेळापूर्वी आरोपीने संदीप गोडबोले याच्या मोबाईलवर फोन करून गोडबोले याला माहिती दिली होती. याचा अर्थ असा की, सिल्वर ओक वर झालेला हल्ला पूर्वनियोजित कट होता हे या संभाषणावरून उघड होत आहे.
तपासात संभाषण लागले हाती
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे मुंबईतील निवासस्थान असलेले ‘सिल्वर ओक’ या बंगल्यावर ८ एप्रिल रोजी हल्ला झाला होता. हा हल्ला आंदोलन करणाऱ्या कर्मचा-यांनी घडवून आणला होता. याप्रकरणी गावदेवी पोलिसांनी जेष्ठ वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यासह ११० आंदोलकाना अटक केली होती. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींचे मोबाईल फोन जप्त करून तपास सुरू केला होता. या गुन्हयात अटक करण्यात आलेल्या अभिषेक पाटील याच्या मोबाईल फोनवरून हल्ल्याच्या दिवशी कोणाला संपर्क केला, या हल्ल्याचा कट कसा शिजला याची माहिती घेण्यासाठी पाटील यांच्या फोनवरील संभाषण तांत्रिक पद्धतीने मिळवले आहे.
अभिषेक पाटील याने हल्ल्याच्या काही वेळापूर्वी नागपूर येथील संदीप गोडबोले याला फोन केला होता. त्यात दोघांमध्ये झालेल्या संभाषणात हा हल्ला पूर्वनियोजित असल्याचे समोर आले. पोलिसांनी या दोघांमध्ये झालेले संभाषण न्यायालयापुढे ठेवले आहे.
( हेही वाचा धक्कादायक! प्रशिक्षणाविनाच पायलट उडवत होते विमान )
अभिषेक पाटील – हॅलो ….
संदीप गोडबोले – बोल अभिषेक
अभिषेक पाटील- तिथेच जाऊ का
संदीप गोडबोले – हा तिथेच जायचे
अभिषेक पाटील – आम्ही त्या बंगल्याच्या तिथे चप्पला सोडल्या. आम्ही लवकर अगोदर आलो. आम्ही फोटो पण काढलेत. तिथे आता लोक लय आलेत. करावं तर सगळं आपणच करावं. बाकीचे निवांत बसावं. इथे येऊन साहेबांना लगेच सांगितलं. मुदलियार पाटील आताच आले. आता रात्रभर मैदानात आहे, सकाळी ०९ पर्यंत. सकाळी आंघोळ करून पण येवू नये का?
संदीप गोडबोले – आता कुठे आहेत तुम्ही, कुठे आहात आता?
अभिषेक पाटील – हा इथे सगळ्या महिला घेतल्यात डायरेक्ट त्यांना तिकीटांना पैसे दिलेत. तिकट काढलेत निघालेत. ७० ते ८० महिला आणि माणसं आहेत १००-२००.
संदीप गोडबोले – महालक्ष्मी पेट्रोल पंप कुठे आहे विचारा
अभिषेक पाटील – बरं पेट्रोल पंपावर ना. मिडीया आली.
संदीप गोडबोले – मिडीया आली आहे.
अभिषेक पाटील – चला मिडीया आली भाऊ
संदीप गोडबोले – हो