माता न तू वैरीणी; वरळीतील पंचतारांकित हॉटेलच्या डस्टबिनमध्ये बाळाला फेकले

174

आपल्या बाळाला नऊ महिने नऊ दिवस पोटात वाढवून जन्माला घालणारी माताच वैरीणी होत असल्याच्या ३ घटना मागील तीन दिवसात मुंबईसह रायगड जिल्ह्यात घडल्या आहेत. मुंबईतील एका घटनेत बाळ बचावले असले तरी इतर दोन घटनांमध्ये मुलांना आपला जीव गमवावा लागला आहे. या घटनांमुळे मुंबईसह रायगड जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

हृदयद्रावक घटना

मुंबईतील वरळी येथील एका पंचतारांकित हॉटेलच्या ८व्या मजल्यावरील महिला स्वछतागृहातील डस्टबीन मध्ये एक नुकतेच जन्मलेले जिवंत अर्भक तेथील सफाई कर्मचारी महिलेला आढळले. हॉटेल व्यवस्थापकांनी तात्काळ पोलिसांना सूचना देऊन बाळाला ताब्यात घेतले आणि या बाळाला मुलांच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. नुकतेच जन्मलेले हे बाळ सुखरूप आणि ठणठणीत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

ना.एम.जोशी मार्ग पोलीस ठाण्यात याप्रकरणी अज्ञात मातेविरुद्ध गुन्हा दाखल करून तिचा शोध सुरू केला असता हॉटेलच्या सीसीटीव्ही कॅमेरात एक गर्भवती महिला हॉटेलमध्ये दिसली, सदर महिला हिचे नाव अमरीन जाफर खान असून ती दिंडोशी येथे राहणारी आहे, ती काम करीत असलेल्या कंपनीचा इव्हेंट या पंचतारांकित हॉटेलच्या हॉल मध्ये होणार होता, त्याची पाहणी करण्याकरिता ती आली होती अशी माहिती हॉटेल व्यवस्थापक यांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी अमरीन हिला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे.

( हेही वाचा : MPSC भरतीसाठी अर्ज करण्याचा शेवटचा दिवस! पूर्व परीक्षेची तारीख जाहीर )

दरम्यान माहीम पोलिसांना दोन दिवसांपूर्वी माहीम कॉजवे या ठिकाणी मृत अर्भक सापडले. स्त्री जातीचे हे अर्भक होते. अज्ञात महिलेने हे अर्भक कचरापेटी जवळ सोडून गेल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या प्रकरणी माहीम पोलिसांनी अज्ञात मातेविरुद्ध गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.

दोन दिवसांपूर्वी रायगड जिल्ह्यातील महाड येथे एका मातेने कौटुंबिक कलहातून आपल्या पोटच्या सहा चिमुकल्या जीवांना विहिरीत लोटले, त्यानंतर स्वतः आत्महत्येचा प्रयत्न केला मात्र स्थानिकांनी तिचे प्राण वाचवले परंतु या सहा मुलांचा मृत्यू झाला. एका पाठोपाठ एक अशा तीन घटना घडल्यामुळे नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात असून या माता मुलाच्या वैरीणी का बनल्या असा प्रश्नही विचारला जात आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.