आपल्या भारतात पूर्वीपासून ‘मी’ चा शोध घेण्याची परंपरा राहिलेली आहे. आपण नेमके कोण आहोत? हे जग कसं तयार झालं? देव आहे का? माझा आणि देवाचा काय संबंध? अशी प्रश्न आपल्याकडच्या थोर विभूतींना पडलेली आहेत आणि त्या प्रश्नांच्या उत्तरातूनच बुद्ध, महावीर, चार्वाक, शंकाराचार्य आदी थोर महात्म्ये इथे निर्माण झाले. प्रत्येकाला सत्य शोधण्याचा अधिकार भारतीय संस्कृतीने दिलेला आहे, म्हणून आपण भारतीय खर्या अर्थाने सत्यशोधक आहोत. या सत्यशोधक परंपरेला छेद देण्यासाठी व आपण म्हणतो तेच खरे असे बलात्काराने वठवण्यासाठी अनेक आक्रमणे इथे आली आणि या सत्यशोधक परंपरेला नष्ट करण्याचा प्रयत्न केला. भारतीय संस्कृती नष्ट झाली तर हाहाकार माजेल. कारण जगातल्या संस्कृतींमध्ये ही एक अशी संस्कृती आहे, जिच्यावर अनेक आक्रमक चालून आले पण ही संस्कृती नष्ट झाली नाही. कारण आपल्याला प्रत्येक दशकात एक राम-कृष्ण मिळालेला आहे.
( हेही वाचा : Budget Trip : पावसाळ्यात फिरण्यासाठी सुंदर आणि हटके जागा! )
…तर हंबीरमामा आठवतील
त्या राम-कृष्ण परंपरेतील आणि ती सत्यशोधनाची परंपरा टिकवण्यासाठी लढणारे महान योद्धे म्हणजे शिवराय आणि शंभूराजे. सरसेनापती हंबीरराव या नावावरुनच आपल्याला कळतं की हा चित्रपट हंबीरमामांवर बेतलेला आहे. मला जेव्हा जेव्हा व्याख्यान द्यायची संधी मिळाली, तेव्हा तेव्हा मी हंबीरमामांचा उल्लेख केलेला आहे. आपल्या मनावर नकारात्मक गोष्टींच पगडा असतो. म्हणून मामा म्हटलं की कंस आणि शकुनी मामाच आठवतो. शकुनी मामाचा आपल्या समाजावर मोठा प्रभाव आहे. म्हणूनच कोणत्याही भाषेतील टिव्ही सिरीयल लावून पाहा. त्यात मामा हा बर्याचदा लबाड दाखवला जातो. ही सायकोलॉजी आहे, ही आपली मानसिकता झालेली आहे. पण सुदैवाने सरसेनापती हंबीरराव या चित्रपटामुळे आता ही पद्धत बदलायला मदत मिळेल. आता मामा म्हटलं की कंस किंवा शकुनी आठवणार नाही, तर हंबीरमामा आठवतील.
छत्रपती स्वराज्याला सोडून गेल्यानंतर संभजीराजेंवर मोठा प्रसंग ओढवला, त्यांना अटक व ठार मारण्याची योजना आखली जात होती. त्यांच्याऐवजी राजाराम महाराजांना गादीवर बसवायची योजना होती. हंबीरराव राजाराम महाराजांचे सख्खे मामा आणि शंभूंचे सावत्र मामा. पण हा मामा पहाडासारखा उभा राहिला आणि त्यांनी हे कटकारस्थान उलथवून लावलं. जर हंबीरराव संभाजी महाराजांच्या मागे उभे राहिले नसते तर स्वराज्य कधीच पडलं असतं. आज आपण स्वतंत्र झालो आहोत, यात हंबीररावांचा खूप मोठा वाटा आहे. होय़, मुघलांविरोधतही लढाई देखील स्वातंत्र्य चळवळच होती.
चित्रपटाच्या बाबतीत बोलायचे झाले तर लेखक, दिग्दर्शक आणि निर्मात्यांनी हे आवाहन उत्तमरित्या आपल्या खांद्यावर पेललेलं आहे. आपला इतिहास कसा दाखवायचा याचं उत्तम उदाहरण म्हणजे सरसेनापती हंबीरराव. प्रतापराव गुजर ज्यावेळेस आपल्या ६ मावळ्यांसोबत मुघलांवर चालून जातात त्यावेळचा प्रसंग खूप छान दाखवला आहे. मुघल छावणीवर ७ मराठे चालून जातात आणि समोरचं दृश्य अस्पष्ट दिसू लागतं व त्यानंतर माघारी केवळ ७ घोडे परततात. लढाई दाखवण्याऐवजी प्रवीण तरडेंनी दाखवलेली ही कल्पकता सुंदर म्हणावी लागेल. पण चित्रपटात बर्याचदा युद्ध प्रसंग टाळून व्हॉइस ओव्हरचा वापर करण्यात आलेला आहे.
प्रवीण तरडे हे हंबीरराव शोभून दिसले आहेत. कुणीतरी हीरोसरखा दिसणारा, चार्मिंग चेहर्याचा हंबीररावांऐवजी रांगडे प्रवीण तरडे शोभून दिसले आहेत. त्यांचं काम उत्तमच झालं आहे, त्यात लेखन व दिग्दर्शनातही त्यांनी देखणी कामगिरी केलेली आहे. त्यांच्या चित्रपटात रोमान्स तोंडी लावायला असतो याचा फायदा या चित्रपटात चांगलाच झालेला आहे. हॅंडसम बहिर्जी नाईक न दाखवता पहाडी आवाजाचे उपेंद्र लिमये बहिर्जी म्हणून मला खूप आवडले. यात सुखद धक्का म्हणजे गश्मीर महाजनी. गश्मीर ह्यांनी शिवराय आणि शंभूराजे अशी दोन्ही पात्रे साकारली आहेत. अभिनेता कसा घडत जातो गश्मीर यांच्याकडे पाहून कळतं. मराठीतला सर्वात हॅंडसम व चार्मिंग हीरो ही ओळख शाबूत ठेवून एक उक्तृष्ट अभिनेता ही ओळखही गश्मीरने मिळवली आहे. विशू या चित्रपटातला गोड आणि मनमौजी मुलगा व हंबीरराव चित्रपटातले स्वराज्याचे धनी शिवराय आणि शंभूराजे. खरं पाहता शिवराय आणि शंभूराजेंच्या गेटअपमध्ये फारसा फरक नाही. तरी दोन्ही भूमिकेत त्यांनी फरक दाखवलेला आहे. शिवरायांचे शांत संयमी डोळे आणि शंभूराजांच्या डोळ्यांतला अंगार गश्मीर ह्यांनी छान दाखवला आहे. बर्याच वर्षांनी मला आवडलेली शिवराय व शंभूराजांची भूमिका.
‘मी’ चा शोध घ्यायला लावणारा चित्रपट म्हणजे सरसेनापती हंबीरराव…
चित्रपटात बारकाईने काही प्रसंग रंगवण्यात आलेले आहेत. हंबीरराव शेतकर्यांची समस्या सोडवतात त्या प्रसंगातून आजच्या राज्यकर्त्यांनी खरोखरंच धडा घेतला पाहिजे. यवनांनी आपली मंदिरे फोडून मूर्तींची विटंबना केली, त्या मूर्ती हंबीरराव सोडवून आणतात. आपली कन्या ताराबाईंनी मुलींचे खेळ न खेळता हत्यार उचलून स्वरायाचं रक्षण केलं पाहिजे हे हंबीररावांचं सांगणं म्हणजे स्त्री सक्षमीकरण. ताराराणींनी पुढे औरंगझेबाला लाज वाटेल इतकं सळो की पळो केलेलं आहे हा इतिहास आपल्याला ज्ञात असेलंच.
आपल्या संस्कृतीविषयी अभिमान वाटावा असे अनेक प्रसंग यात आहेत. टाळ्यांचे संवाद देखील आहेत. इतिहासावर भाष्य करताना मनोरंजनाला बगल दिलेली नाही. शिवाजी महाराज सर्वांना सोडून जातात तेव्हा डोळ्यांत अश्रू घेऊनच प्रेक्षक मध्यांतराला बाहेर पडतो आणि हंबीरराव पडल्यानंतर ताराबाई तलवार उचलते तेव्हा भिजलेल्या डोळ्यांत अंगार साठवून पेक्षक घरी परततो. सरसेनापती हंबीरराव हा चित्रपट इतिहासाच्या जवळ जाणारा चित्रपट आहे. या निमित्ताने का होईना, परंतु नव्या पिढीच्या मनात आपल्या दैदिप्यमान इतिहासाबद्दल प्रेम निर्माण होत आहे हे विशेष. म्हणजे काय, तर आपण कोण आहेत? याचा शोध आता या आधुनिक पिढीने घ्यायला सुरुवात केली आहे. आपण मुघलांना पराभूत करुन भारतावर विजय मिळवला. इंग्रजांनी आपल्याला पराबूत करुन भारत जिंकला असला तरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेने आपण परत एकदा क्रांतीचा केतू उभारला आणि इंग्रजांना मारिता मारिता मरेतो झुंज दिली. आपल्यातला ’मी’ म्हणजे ’शिवाजी महाराज’. या ‘मी’ चा शोध घ्यायला लावणारा चित्रपट म्हणजे सरसेनापती हंबीरराव…
Join Our WhatsApp Community