ठाणे येथील येऊरच्या जंगलात मामा-भांजा या नावे प्रसिद्ध असलेल्या डोंगराळ भागाच्या पायथ्याशी बिबट्याचा मृतदेह सापडला. ही घटना गेल्या आठवड्याच्या शेवटी घडली. या डोंगराजवळच लोकमान्य नगर नागरी वसाहत आहे. या घटनेला अनेक दिवस उलटून गेले तरीही वनविभागाने याबाबत अधिकृत माहिती दिलेली नाही.
बिबट्याचा मृतदेह सापडल्याची माहिती मिळताच वनाधिका-यांनी घटनास्थळी धाव घेतली. बिबट्याचा मृत्यू दोन-तीन दिवस अगोदरपासूनच झाला असल्याचा अंदाज सूत्रांनी व्यक्त केला. पूर्ण वाढ झालेली ही मादी बिबट्या असून तिचा मृत्यू नैसर्गिकरित्याच झाला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. बिबट्याचा मृतदेह संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात शवविच्छेदनासाठी आणला गेला. लोकमान्य नगरच्या नागरी वसाहतीत बरेचदा बिबट्याचा वावर दिसून आला आहे. या भागांतील सीसीटीव्ही कॅमे-यात बिबट्याचे दर्शन होत आहे. मात्र जंगलाजवळचा भाग असल्याने परिसरातील नागरिकही काळजी घेत असल्याचे प्राणीप्रेमींनी सांगितले. हा भाग संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील येऊर विभागांतर्गत येतो. बिबट्याच्या मृतदेहाबाबत अधिकृतरित्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाकडून न सांगण्यामागील कारण मात्र स्पष्ट होऊ शकले नाही.
( हेही वाचा: औरंदाबाद- अहमदनगर मार्गावर ST आणि बैलगाडीचा भीषण अपघात; दोघे जागीच ठार )