तुंगातील बाळासाहेब ठाकरे क्लिनिकचा ताबा घेणाऱ्या बाऊन्सर्सला हाकलून लावले

167

पवईच्या तुंगा गावातील रस्त्यालगत असलेल्या एका भूखंडावर महापालिकेने हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे क्लिनिक उभारले आहे. मात्र या क्लिनिकच्या जागेवर काही व्यक्तींकडून दावा ठोकत त्यांनी आपले बाऊन्सर्स या क्लिनिकमध्ये घुसवले. परंतु बुधवारी सकाळी महापालिका उपायुक्त तसेच महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी तातडीने यामध्ये हस्तक्षेप केल्यानंतर पोलिसांच्या मदतीने येथील  बाऊन्सर्सना बाहेर काढण्यात आले आहे.  त्यामुळे पुन्हा हे क्लिनिक सुरु करण्यात आले आहे.

क्लिनिकचे लोकार्पण ९ डिसेंबरला होणार होते

पवईतील तुंगा गावातील आरक्षित भूखंड हा महापालिकेच्या ताब्यात असल्याने यावर बाळासाहेब ठाकरे चिकित्सालय उभारण्यात आले असून या क्लिनिकचे लोकार्पण ९ डिसेंबरला होणार होते. परंतु या प्रवेशद्वारालाच खाजगी बाउन्सर्सच्या माध्यमातून टाळे ठोकले.  परिणामी या क्लिनिकचे उद्घाटन होऊ शकले नाही. याबाबत महापालिका एल विभागाकडून तक्रार दाखल करून, पवई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र पोलिसांनी पालिकेला आवश्यक मदत न केल्याने हा ताबा पालिकेला घेताच आला नाही.  या विरोधात शिवसेना (उध्दव ठाकरे) यांच्या तीव्र आंदोलन करीत टाळे तोडण्याचा इशारा देण्यात आला होता.  परंतु बुधवारी सकाळी स्वतः उपायुक्त हर्षद काळे, सहायक आयुक्त महादेव शिंदे हे शेकडो पालिकेचे कर्मचारी आणि सुरक्ष रक्षक घेऊन या ठिकाणी पोहोचले आणि त्यांनी हे टाळे तोडून आत प्रवेश केला. त्यावेळी आतमध्ये असलेल्या बाऊन्सर्सना अक्षरशः हाकलून बाहेर काढले. यावेळी शाब्दिक बाचाबाचीही झाली.मात्र पालिकेचा पवित्रा पाहून बाऊन्सर मुकाट निघून गेले. याप्रकरणी अतिरिक्त आयुक्त संजीव कुमार यांनी पोलिसांना याबाबत सूचना देण्यात आल्या असून याप्रकरणी पुन्हा असा प्रकार घडणार नाही,याची काळजी पोलिसांमार्फत घेतली जाईल,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

(हेही वाचा सीमाभागातील तणावाला जबाबदार असणाऱ्या बनावट ट्विटर अकाउंटवर कारवाई करणार – अमित शाह)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.