छानछोकीसाठी ती दोन मुले करत होती ‘हे’ काम! वाचून थक्क व्हाल

पंधरा ते सोळा वयोगटातील मुलांसोबत मैत्री करून त्यानंतर त्या मुलांना स्वतःच्या गरजेसाठी घरात चोरी करायला लावणाऱ्या १८ वर्षे वयाच्या हर्ष कामत आणि त्याचा मित्र अर्शद अस्लम शेख या दोघांना अंधेरी पोलिसांनी अटक केली आहे. हर्ष कामत याला कमी वयातच एशोआरामात राहाण्याची सवय लागल्यामुळे तो पैशासाठी या प्रकारचे गुन्हे करीत होता, अशी माहिती समोर आली आहे.

दोन वर्षांत २५ लाख १७ हजार रुपये हर्षला दिले

अंधेरी पूर्वेत राहणारे जीवारत्नम राव यांनी अंधेरी पोलिस ठाण्यात काही दिवसापूर्वी तक्रार दाखल केली होती. या तक्रारीत त्यांनी हर्ष कामत याने २०१९ मध्ये माझ्या मुलाकडे आजी आजारी असल्याचे सांगून पैसे मागितले होते. माझ्या मुलाने घर खर्चासाठी ठेवलेले २५ हजार रुपये घरात कुणाला काही कळू न देता मैत्रीखातर हर्ष याला दिले होते. काही दिवसांनी मुलाने पैसे परत मागितले असता त्याने त्याला ‘तू घरात चोरी केली आहे, पोलिसांना कळाले तर तुला तुरुंगात टाकतील’, अशी भीती घातली. प्रत्येक वेळी पोलिसांची भीती घालून हर्ष तक्रारदार अल्पवयीन मुलाकडे पैसे मागू लागला होता. पीडित मुलाने कधी घरातील रोकड, तर कधी दागिने चोरी करून दोन वर्षांत २५ लाख १७ हजार रुपये हर्षला दिले होते. त्यानंतर ही हर्ष त्याला धमकी देत होता, त्यामुळे पीडित मुलगा हा तणावात असताना वडिलांनी त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने घडलेला प्रकार वडिलांना सांगितला. वडिलांनी याप्रकरणी अंधेरी पोलिस ठाण्यात हर्ष आणि त्याचा मित्र अर्शद याच्याविरुद्ध तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून हर्षचा शोध सुरु केला, मात्र पोलिस आपल्या मागावर असल्याचे कळताच हर्ष हा घरी येत नव्हता, त्याने परस्पर आईला घेऊन पळून जाण्याचा योजना आखली आणि त्याने आईला एमआयडीसी येथे बोलावून घेतले. पोलिसांना हर्षचा ठावठिकाणा लागताच त्याला एमआयडीसी येथून एका इन्व्होवा मोटारीसह ताब्यत घेऊन अटक करण्यात आली. त्यापाठोपाठ अर्शद यालाही अटक  करण्यात आली.  पोलिसांच्या चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून १३ लाख १० हजाराचा ऐवज जप्त केला आहे.

(हेही वाचा वादग्रस्त ‘बुल्ली अ‍ॅप’ चे बंगळुरू ते उत्तराखंड कनेक्शन)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here