अरेच्चा…अवघ्या सहा दिवसांत खटला निकाली, शिक्षाही ठोठावली!

आरोपी राजकुमार तांडेल याने महिलेसमोर अश्लील चाळे केले होते.

महिलांना बघून विकृत चाळे करणाऱ्या एका ५६ वर्षीय आरोपीला अवघ्या सहा दिवसांत न्यायालयाने ३ वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा सुनावल्याची घटना मुंबईत घडली आहे. जलदगती न्यायालयाने केवळ सहा दिवसांत हा निकाल दिला आहे. मुंबई महानगर न्यायदंडाधिकारी न्यायालयातील २८व्या न्यायालयाच्या न्यायाधीश श्रीमती यशश्री मारुळकर यांनी हा खटला ५ ऑक्टोबर रोजी निकाली काढत आरोपीला शिक्षाही सुनावली आहे. या निकालाचे जनसामान्यांकडून स्वागत करण्यात येत आहे.

महिलेसमोर अश्लील चाळे केले होते!

राजकुमार तांडेल असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. कुलाबा मच्छिमार नगर येथे राहणाऱ्या राजकुमार तांडेल याला मुंबई लोकमान्य टिळक मार्ग पोलिसांच्या निर्भया पथकाने महर्षी कर्वे रोड, स.का. पाटील उद्यान येथून १८ सप्टेंबर २०२१ रोजी अटक केली होती. एका महिलेचा पाठलाग करीत स.का. पाटील उद्यान येथे आला. तांडेल याने स्वतःच्या पॅन्टची झिप उघडून या महिलेला विचित्र चाळे करून दाखवत होता.

(हेही वाचा : मित्राची हत्या करून रचला बनाव! आरोपीला आठ तासांतच अटक)

३ वर्षांची सुनावली शिक्षा!

मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला याबाबत माहिती मिळताच लोकमान्य टिळक मार्ग पोलिस ठाण्याचे निर्भया पथकाच्या महिला पोलिस उपनिरीक्षक पल्लवी जाधव या घटनास्थळी दाखल झाल्या आणि त्यांनी या विकृताला ताब्यात घेऊन महिलेची तक्रार दाखल करून त्याच्या विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर राजकुमार तांडेल याला अटक करण्यात आली होती. आठ दिवसांत पोलिसांनी आरोपी विरोधात पुरावे, साक्षीदार गोळा करून २८ सप्टेंबर रोजी किल्ला कोर्टात २८व्या न्यायालयात आरोपीच्या विरोधात दोषारोप पत्र दाखल करण्यात आले होते. गुन्ह्याची गंभीरता तसेच आरोपीचा पूर्व इतिहास बघून न्यायधीश श्रीमती यशश्री मारुळकर यांनी अवघ्या सहा दिवसात पुरावे, साक्षीदार तपासून ५ ऑक्टोबर रोजी खटल्याचा निकाल देत आरोपी राजकुमार तांडेल याला दोषी ठरवून ३ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा आणि १० हजार रुपयांचा दंडांची शिक्षा सुनावली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here