मलिकांविरोधात ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्रात दाऊद व त्याच्या सहकाऱ्यांचा समावेश

132

मनी लॉड्रिंग प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेले राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या विरोधात ईडीने ५ हजार पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. या आरोपपत्रात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि त्याचे इतर साथीदार यांच्यासह मलिक यांच्या नियंत्रणाखाली असणाऱ्या दोन कंपन्यांचा समावेश करण्यात आलेला आहे.

आरोपपत्रात दाऊद व सहकाऱ्यांची नावे 

ईडीने गुरुवारी राज्याचे मंत्री नवाब मलिक यांच्याविरुद्ध नोंदवलेल्या मनी लॉड्रिंग प्रकरणात मुंबईतील विशेष पीएमएलए न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. ५ हजार पानांचे हे आरोपपत्र असून या आरोपपत्रात नवाब मलिक यांनी दाऊदच्या सहकाऱ्याकडून स्वस्तात खरेदी केलेल्या गोवाला कंपाउंड येथील संपत्ती सह मलिक यांच्या नियंत्रणात असणाऱ्या दोन कंपन्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. ईडीच्या तपासात कुर्ल्यातील गोवाला कंपाऊंड म्हणून ओळखल्या जाणार्‍या २.७५ एकर जमिनीबद्दल माहिती मिळाली, जी मलिकने दाऊद इब्राहिमची बहीण हसिना पारकर आणि १९९३ च्या बॉम्बस्फोटातील आरोपी सरदार शाहवली खान यांच्याकडून खरेदी केली होती. ईडीच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, मलिकांनी दिलेली रक्कम दहशतवादी फंडिंगसाठी वापरली गेली होती. २००३ ते २००५ दरम्यान हा करार झाला आणि मलिकांनी प्लॉटमध्ये अनेक भाडेकरू ठेवल्याचा आरोप आहे. नवाब मलिक यांच्या नियंत्रणात असलेल्या दोन कंपन्या मेसर्स सॉलिडस इन्व्हेस्टमेंट्स प्रायव्हेट लिमिटेड आणि मेसर्स मलिक इन्फ्रास्ट्रक्चर, दाऊद इब्राहिम, त्याचे सहाय्यक आणि संबंधित व्यक्ती चार्जशीटमध्ये आहेत, असे सूत्रांनी सांगितले आहे.

( हेही वाचा : मनसे अल्टिमेटमनंतर मुंबई पोलीस सज्ज! दंगल झाल्यास ५ मिनिटात पोहोचणार… )

ईडीने केलेल्या तपासात असे ही समोर आले की अशाच एका प्रकरणात मुनिरा प्लंबरची प्रमुख मालमत्ता, नवाब मलिकांनी मेसर्स सॉलिडस इन्व्हेस्टमेंट्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या माध्यमातून हडप केली होती, ही कंपनी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या मालकीची आणि त्याच्या नियंत्रणात होती.

ईडीने या महिन्याच्या सुरुवातीला मलिक, त्यांचे कुटुंबीय, मेसर्स सॉलिडस इन्व्हेस्टमेंट्स प्रायव्हेट लिमिटेड आणि मेसर्स मलिक इन्फ्रास्ट्रक्चर यांच्या मालकीची मालमत्ता मनी लॉंड्रिंग प्रतिबंधक कायदा, २००२ अंतर्गत तात्पुरती जप्त केली, संलग्न मालमत्तांमध्ये गोवाला कंपाउंड, कुर्ला (पश्चिम) यांचा समावेश आहे. , कुर्ला पश्चिम, मुंबई येथे व्यावसायिक युनिट, महाराष्ट्रातील उस्मानाबाद जिल्हा येथे शेतजमीन ५९.८१ हेक्टर एकूण क्षेत्रफळ १४७.७९४ एकर, कुर्ला पश्चिम येथे तीन सदनिका आणि वांद्रे पश्चिम येथे दोन निवासी सदनिका आहेत. नवाब मलिक हे सध्या न्यायालयीन कोठडीत असून त्यांना मुंबईतील आर्थर रोड तुरुंगात ठेवण्यात आलेले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.