देशातील पश्चिम किनारपट्टीवर पहिले सॅटलाईट टॅगिंग केलेल्या प्रथमा या मादी ऑलिव्ह रिडले कासवाच्या अंड्यातून होळीच्या मुहूर्तापासून पिल्ले बाहेर पडण्यास सुरुवात झाली. गुरुवारी दोन पिल्लांनी वेळासच्या समुद्रकिना-यावरुन समुद्राकडे प्रयाण केले. शुक्रवारी रंगपंचमीच्यादिनी ४० अंड्यातून पिल्ले बाहेर पडली आणि समुद्राच्या दिशेने वळली. हे विहंगम दृश्य पाहण्यासाठी कासवांच्या अंड्यांची सुरक्षित देखभाल करणारी मंडळी, वन्यजीवप्रेमी आणि कांदळवन कक्षाचे अधिकारी वेळासला तळ ठोकून होते.
ऑलिव्ह रिडलेवर सेटलाईट टॅगिंगची पहिली नोंद
जानेवारी महिन्यात राज्यातील कोकण किनारपट्टीतील वेळासच्या समुद्रकिना-यावर अंडी घालण्यासाठी आलेल्या मादी ऑलिव्ह रिडले कासवावर वनविभागाचे कांदळवन कक्ष आणि केंद्रीय वने व पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभागांतर्गत येणा-या भारतीय वन्यजीव संशोधकांनी सॅटलाईट टॅगिंग केले. २४ जानेवारी रोजी देशाच्या पश्चिम किनारपट्टीवरील ऑलिव्ह रिडले कासवावर सेटलाईट टॅगिंगची पहिली नोंद झाली. या मादी कासवाला संशोधकांनी प्रथमा असे नाव दिले. त्यानंतर ५२ दिवसांच्या प्रतीक्षेनंतर १७ मार्च रोजी प्रथमाने किनारपट्टीवर घातलेल्या अंड्यातून दोन पिल्ले बाहेर आली. शुक्रवारी ४० अजून पिल्ले बाहेर आली.
(हेही वाचा – तब्बल ७१ वर्षांपासून ‘या’ गावात होळी, धुळवड खेळतच नाही!)
सध्या प्रथमा ही राज्याच्या किनारपट्टीतील समुद्रातच स्वैर संचार करत आहे. प्रथमा नंतर सॅटलाईट टॅगिंग झालेली सावनी ही मादी ऑलिव्ह रिडले कासव सर्वात जास्त समुद्रभ्रमंती करत आहे. सध्या ती अलिबागनजीकच्या खोल समुद्रात आहे. त्याखालोखाल रेवा आणि वनश्री नजीकच्या गुहागर समद्रातच फिरत आहेत.
कासवांच्या पिल्लांचे नाव ठेवलेले नाही
प्रथमा या मादी ऑलिव्ह रिडलेच्या पिल्लांना आम्ही नाव ठेवलेले नाही. जन्मतःच कासवाच्या पिल्लांचे लिंग समजत नाही. त्यामुळे पिल्लांना नाव दिलेले नाही, अशी माहिती कांदळवन कक्षाचे अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक विरेंद्र तिवारी यांनी दिली.
Join Our WhatsApp Community