मुंबई दहशतवाद्यांच्या रडारवर, एटीएस मात्र रिक्त!

या पथकाला ५ सहाय्यक पोलिस आयुक्त पदे मंजूर आहेत, मात्र त्यातील एकही पद भरण्यात आले नाही.

138

दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने पाक पुरस्कृत दहशतवादी कटाचे मॉड्युल उद्ध्वस्त केले. त्यामध्ये अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांपैकी एक जान महंमद शेख हा मुंबईतील धारावी भागात राहणारा आहे आणि तो आधीपासून डी गँगच्या संपर्कात होता. दिल्ली पोलिसांनी त्याला राजकोटला अटक केली. त्यानंतर मुंबई पोलिसांना न कळवता थेट धारावीत जान महंमदच्या घरावर धाड टाकली. त्यामुळे आता राज्य दहशतवादी पथका (एटीएस) च्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे. कारण पथकामध्ये सुमारे १०० पदे रिक्त असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. अशा वेळी अपुऱ्या मनुष्यबळाअभावी हे पथक कसे कार्यक्षम राहणार, असा प्रश्न आता विचारला जाऊ लागला आहे.

५ एसीपीची पदे रिक्त!

एटीएसची काळाचौकी, नागपाडा, जुहू, कुरार आणि विक्रोळी या ठिकाणी कार्यालये आहेत. त्यामध्ये ५० अधिकारी पदे आणि ५० कॉन्स्टेबल पदे रिक्त असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे या पथकाला ५ सहाय्यक पोलिस आयुक्त पदे मंजूर आहेत, मात्र त्यातील एकही पद भरण्यात आले नाही. सध्या या पथकाची जबाबदारी वाढलेली आहे. नवनवीन प्रकरणे या पथकाकडे येत असतात. शिवाय अंतर्गत सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कायम दक्ष राहणे आणि संवेदनशील माहिती मिळवणे. गुप्त घडामोडींचा माग काढणे अशा अनेक महत्वाच्या जबाबदाऱ्या या पथकाला पार पाडाव्या लागतात. अशा वेळी जर या पथकाकडे पुरेसे मनुष्यबळ नसेल, तर जान महंमद सारखे दहशतवादी खुशाल मुंबईत राहू शकतील आणि पाकिस्तानात प्रशिक्षण घेऊन येऊ शकतील, त्यामुळे राज्य सरकारने आता या पथकातील रिक्त पदे भरण्यावर जोर दिला पाहिजे, अशी मागणी होऊ लागली आहे.

(हेही वाचा : लवकरच पेट्रोल २५, डिझेल २२ रुपयांनी होणार स्वस्त!)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.