मुंबईतील सर्व कोविड सेंटरचे लेखा परिक्षण अर्थात ऑडीट केले जाणार आहे. कोविड काळात झालेल्या खर्चाबाबत भाजपसह इतर पक्षांकडून झालेल्या आरोपांनंतर कोविडवरील खर्चाचे ऑडीट सुरुच आहे. मात्र, जंबो कोविड सेंटरच्या माध्यमातून रुग्ण सेवा पुरवण्यासाठी केलेल्या सर्व खर्चाचा लेखाजोखा तयार ठेवण्याचे निर्देश यापूर्वीच देण्यात आले होते, परंतु आता जंबो कोविड सेंटरचेही ऑडीट करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिल्याची माहिती मिळत आहे.
या ठिकाणी उभारली जंबो कोविड सेंटर
मुंबईत कोविड रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागल्याने कस्तुरबा, नायर आणि सेव्हन हिल्स रुग्णालयावरील वाढता ताण लक्षात घेता महापालिकेने बीकेसी, वरळी एनएससीआय डोम आदी ठिकाणी जंबो कोविड सेंटर प्राधान्याने तयार करून रुग्णांना सेवा उपलब्ध करून दिली. त्यानंतर गोरेगाव नेस्को येथे फेज वन आणि फेज टूमध्ये तसेच रिचडसन अँड क्रुडास, दहिसर चेकनाका, कांदरपाडा, रिचडसन क्रुडास भायखळा, मालाड, शीव आदी ठिकाणी जंबो कोविड सेंटर उभारली होती. परंतु मागील काही दिवसांपासून कोविड रुग्णांची संख्या घटत चालली असून त्यानुसार दहिसर, नेस्को आणि कांजूरमार्ग कोविड सेंटर कायमचे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर उर्वरीत कोविड सेंटर रुग्ण सेवांसाठी बंद असले तरी कोणत्याही क्षणी पुन्हा सुरु करता येईल अशापध्दतीने ते ऍक्टीव्ह ठेवण्यात आले आहे.
(हेही वाचा – PMGKP: कोरोनाशी लढा देणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी)
…म्हणून कोविड खर्चाच्या अहवालाचे ऑडीट सुरु
मात्र, मागील काही महिन्यांपासून कोविडच्या खर्चाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत असून यासर्व कोविड खर्चाचा अहवाल तसेच ऑडीटही सुरु आहे. परंतु प्रत्येक कोविड सेंटरचे स्वतंत्र ऑडीटही करण्याचे लेखी आदेशच महापालिका आयुक्तांनी दिल्याची माहिती मिळत आहे. आरोग्य विभागाचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रत्येक कोविड खर्चाचे ऑडीट होणे आवश्यक आहे. त्यामुळे जिथे जिथे अशाप्रकारचे ऑडीट झालेले नाही, तिथे तिथे ऑडीट करण्याचे लेखी आदेशच आयुक्तांनी दिलेले आहे. त्यामुळे ज्या ज्या जंबो कोविड सेंटरचे ऑडीट झाले नसेल त्या सर्वांचे ऑडीट करण्याच्या सूचना संबंधित अधिष्ठातांना देण्यात आल्या आहेत. त्याबाबत मागील बैठकीतच निर्देश देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.