अखिल मानवजात सामावून घेणारा विस्तृत, उदात्त, उच्च भगवा ‘हिंदुध्वज’- स्वातंत्र्यवीर सावरकर

हा हिंदुध्वज हिंदू जातीचेच तेवढे प्रतीक नसून, हिंदू धर्माचेही प्रतीक असल्याने तो त्या धर्माच्या सर्वांगिण उदारते इतकाच विस्तृत आहे. हिंदूच नव्हे तर उभी मानव जात नास्तिकापासून आस्तिकापर्यंत, हाँटेटोपासून हिंदुंपर्यंत, वर्ण-जाती-पंथ-निर्विशेष त्याच्या अमृतोपम शीतल छायेखाली समाविष्ट होऊन, परम् श्रेयः प्राप्त करू शकेल इतका तो विस्तृत आणि भव्य, उदात्त, उच्च आणि दिव्य आहे.

प्रत्येक ध्येय्यास, प्रत्येक समेष्ठिस, प्रत्येक नवीन महत्कार्यास त्याचे रहस्य व्यक्त करणारे आणि त्याच्या स्फूर्तीने अंतःकरणास उद्दीप्त करणारे असे जे त्याचे विशिष्ट संस्कार आणि जी स्वतंत्र प्रतीके असावी लागतात, त्या सर्वांमध्ये त्या ध्येय्याचा, समेष्ठीचा किंवा महान विचारांचा द्योतक आणि प्रवर्तक असा जो त्याचा ध्वज तोच त्यांचे प्रबलतम प्रतीक असतो.

एक वेष, एक राष्ट्र नि एक संस्कृती, एक रक्त, एक बीज, एक भूतकाळ आणि एक भवितव्य या अखंड संबंधांनी संबध्द झालेल्या ह्या एक गटातील चाळीस कोटी हिंदू जातीच्या महान समेष्ठींचा आणि तिच्या संघटनांच्या महत्कार्याचा हेतू, संदेश बल आणि तेज अखिल मनुष्य जातीत व्यक्त करणारे प्रतीक म्हणजेच हा आमच्या हिंदू जातीचा, अभिनव हिंदुध्वज होय.
आम्हा हिंदुंतील प्रांतोप्रांतीचे आणि पंथोपंथीयांचे वैशिष्ट्य रुप अनेक भिन्न-भिन्न ध्वज होत आले आणि त्यापैकी आजही त्या- त्या प्रांतात, पंथात पुष्कळ प्रचलीतही आहेत. मराठ्यांचा भगवा झेंडा आहे. राजपुतांचे दहा पाच केसरी ध्वज आहेत. गुरख्यांचा सूर्यचंद्रांकित ध्वज आहे. शिखांचे आणि जैनांचे, शैवांचे आणि वैष्णवांचे, आर्यांचे आणि अनार्यांचे. आमच्या या महान हिंदू जातीच्या प्रत्येक पंथाचे आणि प्रांताचे जे हे भिन्न ध्वज आहेत, ते-ते आम्हां सर्वांस पूज्य आणि आदरणीय आहेतच. त्या त्या पंथांची आणि उपजातींची ती ती विशिष्ट ध्येय्ये व्यक्त करत ते सर्व ध्वज यापुढेही आमच्या निरनिराळ्या हिंदू भाषांप्रमाणेच त्या त्या समाजात फडकत राहतील.

पण हा हिंदुध्वज हिंदू जातीचेच तेवढे प्रतीक नसून, हिंदू धर्माचेही प्रतीक असल्याने तो त्या धर्माच्या सर्वांगिण उदारते इतकाच विस्तृत आहे. हिंदू धर्माच्या ध्येय्याप्रमाणेच तो ही “स भूमिक विश्वतो कृत्वा अत्यतिष्ठत् दशांगुलम!” हिंदूच नव्हे तर उभी मानव जात नास्तिकापासून आस्तिकापर्यंत, हाँटेटोपासून हिंदुंपर्यंत, वर्ण-जाती-पंथ-निर्विशेष त्याच्या अमृतोपम शीतल छायेखाली समाविष्ट होऊन, परम् श्रेयः प्राप्त करू शकेल इतका तो विस्तृत आणि भव्य, उदात्त, उच्च आणि दिव्य आहे. कारण लोकांची धारणा करतो तो धर्म. धारणांत धर्म इत्याहु धर्मो घारयति प्रज्ञा! त्या धर्माची साध्ये दोन, अभ्युदय आणि निश्रेयस – ऐहिक भक्ती, पारलौकिक निश्रेयसाचे, अतींद्रिय आनंदाचे, पारमार्थिक परम गंतव्याचे जे द्योतक या ध्वजावर अंकित केलेले आहेत ते म्हणजेच कुंडलिनी होय. ती कोण्या वर्णाची अथवा जातीची मत्ता नसून मनुष्यमात्रांत अंतर्हित आहे.

आपल्या पाठीच्या कण्यास मेरुदंड म्हणतात. त्याच्या दोन्ही बाजूस ज्ञानतंतूच्या बनलेल्या दोन नाड्या आहेत. याच इडा आणि पिंगळा होत. मेरुदंडात इंग्रजी ८ च्या आकारासारख्या कण्यांची जी माळ आहे, तिच्यामधून तिसरी नाडी जिला सुषुम्ना म्हटले जाते. इडा आणि पिंगळा या नाड्यांस संलग्न झालेली आपल्या ठिकठिकाणच्या ज्ञानतंतूची जी उपकेंद्रे आहेत, त्यांनाच यौगिक भाषेत कमले म्हटले असावे. ह्यांची संख्या शाक्तांच्या कुंडलिनी योगांत बरीच दिलेली असली तरी, ती मुख्यत्वे सात आहेत. मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपुर, अनाहत, विशुध्द, आज्ञा, सहस्रार मूलाधारात सुप्त असणारी शक्ती, ती कुंडलिनी, योगध्यानाने जागृत होताच प्रत्येक केंद्रातून वर चढत, अलौकिक सिध्दी आणि अनुभव उपभोगीत सहस्राराच्या अंतिम केंद्रास पोहोचते. तिथे ती पोहचतांच साधकास एक अलौकिक अतींद्रिय अगाध आनंद प्राप्त होतो. ह्याला योगी कैवल्यानंद म्हणतील, वज्रयानी महासुख म्हणतील, अद्वैती ब्रम्हानंद म्हणतील, भक्त प्रेमानंद म्हणतील, नास्तिक किंवा भौतिक परिभाषा केवळ परमानंद म्हणेल. पण हा अनुभव प्रत्येकास आलाच पाहिजे. मग त्याचा विश्वास एखाद्या विशिष्ठ पैगंबरावर, अवतारावर, ग्रंथावर, पांथिक मतमतांतरावर असो वा नसो. यास्तव आपल्या हिंदू धर्मातील चार्वाकपंथी लोका–यतिकांसुध्दा यच्चयावत पंथांचा कुंडलिनी योगाविषयी मतभेद नाही. वैदिक सनातनी, जैन, शीख, ब्राम्हो, आर्या इत्यादी झाडून साऱ्या धर्म, पंथांस कुंडलिनी योग मान्य आहे. कारण ते प्रत्येक्ष आणि प्रयोगात्मक शास्त्र आहे. केवळ शाब्दिक वा तार्रिक असा एखादा मताचा वाद नाही.

ह्यास्तव हिंदू धर्माचे जे पहिले महान पारलौकिक ध्येय्य आहे, त्याचे द्योतक असे अत्युत्तम चिन्हं कुंडलिनी हेच होऊ शकते. कारण ते हिंदुमात्रासच नव्हे तर, मनुष्यमात्रास बुध्दीगम्य आहे. अनुभाव्य आहे. स्वस्तिक हा एक जातिविशिष्ट वा पंथविशिष्ट संकेत आहे. त्यास बुध्दिगम्य स्पष्टीकरणाचा इतका जागतिक पाठिंबा नाही. तीच स्थिती आपल्या देशिक वा जातीय परिस्थिती पुरतेच विशिष्ट महत्व पावलेल्या गाय व गणपती वा ग्रंथ इत्यादी प्रतिमांची होय. हिंदू धर्माचे महत् ध्येय्य व्यक्त करण्यास तशा कोणत्याही केवळ सांकेतिक किंवा मतभेद-क्लिष्ट किंवा मर्यादित चिन्हांपेक्षा ही कुंडलिनी परमेश्वराच्या स्वरुपाशी या प्रत्येक मनुष्यास लाभलेले निसर्गसिध्द अतींद्रिय इंद्रिय. ही शक्ती, हे साधन हेच उत्कृष्ट द्योतक होय.

हिंदू धर्माची मुख्य प्रतिज्ञा, मुख्य वैशिष्ट्य, मुख्य ब्रीद, परमेश्वराचा साक्षात्कार, देवाशी प्रत्यक्ष परिचय, परमात्म्याशी आत्म्याची भेट किंवा आत्माच परमात्मपदास पोहोचणे होय. शक्तीचा शिवाशी जो हा संयोग तोच योग. म्हणूनच हिंदू धर्माचे आणि जातीचे पारलौकिक गंतव्य आणि जगतास पोचविण्याचा दैवी संदेश जर कोणाच्या एका शब्दात स्पष्टपणे व्यक्त करता येणार असेल, तर तो शब्द योग हाच होय. त्या योगाचे मुख्य प्रतीक कुंडलिनी. एतदर्थच आपल्या हिंदू धर्माचे आणि जातीचे प्रथम ध्येय्य जे निःश्रेयस ते सुव्यक्त करण्याचे सामर्थ्य हिंदुध्वजावर अंकित झालेल्या या कुंडलिनीतच उत्कटपणे बसणारे आहे.

पारलौकिक दृष्टी क्षणभर कोणी बाजूस ठेवू इच्छितो, तरीही आपल्या हिंदू जातीने जगास जी अदृश्य ऐहिक दाने दिली आहेत, त्यात सर्वोत्कृष्ट दान जे आहे ते योगशास्त्र. एक वेळ तात्विक मतवादांस मतमतांचा गलबला म्हणता येईल, पण योगास म्हणता येणार नाही. कारण योग हे भौतिक परिभाषेत आणि परिमाणांत व्यक्त करता येणारे एक त्यागात्मक प्रत्यक्ष आणि अनुभाव्य शास्त्र आहे. भौतिक दृष्टीने देखील मनुष्याच्या आत्मिक आणि भावनिक नव्हे तर, दैहिक शक्तीही किती आश्चर्यकारक उन्नति करु शकतात, किती अद्भुत सिध्दी मिळवू शकतात आणि “मन एक अनिर्वाच्य यं लब्धा चापरं लाभ मन्यते न ततोधिक” असा आनंद उपभोगू शकते, हे सहस्त्रावधि वर्षाच्या अविरत प्रयोगांनी शक्य आणि सिध्द करुन दाखविणारे हे योगशास्त्र आम्ही हिंदुंनी परिणत केले आणि त्याची जागतिक संस्कृतीत अमूल्य भर टाकली, ही गोष्ट केवढी गौरवाची आहे. तोच आमचा जातीय गौरव आमच्या जातीय ध्वजावर ही कुंडलिनी व्यक्त करत राहील.

आपल्या हिंदू धर्माचे आणि जातीचे जे पारलौकिक ध्येय निःश्रेयस ते कुंडलिनीने अशा प्रकारे व्यक्त केल्या नंतर त्या धर्माचे जे ऐहिक साध्य अभ्युदय ते आपल्या ध्वजावर व्यक्त करण्यास अत्युत्कृष्ट चिन्हं म्हणजे ‘कृपाण’.
कृपाण– प्रत्यक्ष धर्म हा ही कृपाणाची दंडशक्ती आहे म्हणूनच सुरक्षित आहे. विशेषतः आपल्या हिंदू जातीच्या अवनतीस ह्या कृपाणाचे, ह्या शक्तीचे, ह्या ऐहिक अभ्युदयाचे जे विस्मरण झाले, त्याकडे जे आम्ही अपराधी दुर्लक्ष केले तेच मुख्य कारण झालेले आहे. यापुढे असे दुर्लक्ष न करण्याचा आम्ही हिंदुंनी निर्धार केलेला आहे, हे सर्व शत्रूस आणि मित्रांस बजावून सांगण्यासाठी आमच्या हिंदू संघटनांच्या ह्या महान ध्वजावर कृपाण अंकित झाले पाहिजे. आमच्या धर्माच्या व्याख्येप्रमाणेच निःश्रेयस आणि अभ्युदय, मुक्ति आणि भुक्ति ही त्यांची दोन चरणे आहेत, परंतु यापैकी अभ्युदयाकडे, भुक्तिकडे आणि ज्या साधकाने ती साध्य होणारी आहेत त्या शक्तीकडे आम्ही दुर्लक्ष केल्यामुळे आमचा धर्म एक पायी झाला, पंगू झाला. त्यायोगे समाजाचे ऐहिक आणि पारलौकिक धारण करण्याचे त्यांचे कर्तव्य करण्यास तो असमर्थ झाला. ती चूक आता यापुढे होऊ द्यायची नाही. यापुढे ज्या शक्तीने मिळती राज्ये ती शक्ती, राष्ट्रशक्ती, ती शास्त्रशक्ती, ती ऐहिक भुक्तिची तलवार आम्ही आपल्या हातातून कोण्या निष्क्रिय भंगड गुंगीलाच समाधी समजून तिच्या बेशुध्दीच्या नशेत गळू देणार नाही. ती कुंडलिनी, हे कृपाण, ती मक्ती, ही भुक्ती! ती शांती, ही शक्ती! तो योग, हा भोग! ते निःश्रेयस, हा अभ्युदय! ती क्षमा, ही शांती! ती निवृत्ती, ही प्रवृत्ती! ते ध्येय्य, ही धारणा! ती औपनिषदिक विद्या, ही औपनिषदिक अविद्या! तो योगेश्वर कृष्ण, हा धनुर्धारी! ती ज्ञानयोगाची कुंडलिनी, हे कर्मयोगाचे कृपाण! “परित्राणाय साधुनां, विनाशायच दुष्कृताम्! ईशा वास्यं इदं सर्व यंत्किंच जगत्या जगत्, तेन व्यक्तेन भुंजीताः”. हाच आमच्या हिंदुध्वजाचा जागतिक संदेश आणि जातीय घोषणा ही कुंडलिनी आणि हे कृपाण करीत आहे.

ह्या कृपाणाने, ह्या शक्तीने प्राप्त होणारे राज्य, सामर्थ्य, अधम आततायी लोकांच्या कलंकाने दूषित होऊ नये म्हणून, ” तेन त्यक्तेन भुंजीयाः मागृध कस्यचिद धनं” हे नीतिमत्तेचे सार-सूत्र सदोदित सन्मुख असावे यास्तव या कृपाणाचा, ह्या हिंदुध्वजाचा पृष्ठभूमिचा रंग गौरिक अर्थात भगवा आहे. हा रंग त्यागाचा आहे. योगच नसेल, क्षेमच नसेल, तर त्याग तरी कसला! म्हणून हे योगक्षेमाचे कृपाण हिंदू जातीने उपसले आहे. पण ते आनंदही विसर्गाय स तो वारिमुच्चरिव, आम्ही स्वतंत्र होणार, शक्तिशाली होणार, पण ते आम्हांस इतरासही स्वतंत्र करण्यासाठी. यास्तव आमच्या संपन्नतेचा ध्वज त्यागी आहे, भगवा आहे, गौरिक आहे. ज्या भगव्यावर ॐकारयुक्त कुंडलिनी आणि कृपाण अंकित आहे, त्या ह्या हिंदू जातीच्या हिंदुध्वजाचा हा संकेतार्थ हा गूढार्थ आहे, हे तात्विक रहस्य आहे. या तात्विक रहस्याप्रमाणे त्या ध्वजाचे ऐतिहासिक महत्व हेही काही अल्प नाही. कारण तो हिंदू जातीतील जे अनेक ध्वज आजवर प्रचलित आहेत, त्यांच्या परंपरेचाच विकास आहे, पूर्णता आहे.

हिंदू जाती वर्गाला मुसलमानी आक्रमणाच्या काळांत ज्या अत्यंत प्रबळ आंदोलनाने हिंदू संघटनांचा पुरस्कार केला, त्या महाराष्ट्रीय हिंदू पादशाहीचा ध्वज भगवाच होय. तो ज्या राष्ट्रगुरुने राष्ट्रवीर शिवाजीस दिला, त्या समर्थ रामदासांनी ज्या कार्याची एका ठिकाणी अशीच व्याख्या केली होती की,
सामर्थ्य आहे चळवळींचे | जो जो करील तयांचे |
परंतु तेथे भगवंताचे | अधिष्ठान पाहिजे ||१||
पहिले ते हरिकथा निरुपण | दुसरे ते राजकारण |
तिसरे ते सावधपण | सर्व विषयीं ||२||
महाराष्ट्रीय भगव्या झेंड्यात निगुढ असलेला हाच अर्थ ह्या हिंदू ध्वजात प्रकट झालेला आहे. ही ॐकारयुक्त कुंडलिनी हीच ते भगवंतांचे अधिष्ठान दर्शविते. ते मुख्य हरिकथेचे निरुपण करते आणि हे कृपाण हे तेच चळवळीचे सामर्थ्य तेच राजकारण सर्व विषयी सावधपण प्रकटविते. अर्थात त्या महान हिंदू साम्राज्याच्या पुरातन ध्वजाच्या त्या भगव्यात समर्थांचा जो मूक संदेश अंतर्हित होता, त्याचीच प्रकट घोषणा हा हिंदुध्वज करीत आहे. ह्याहून त्यात काही एक अंतर नाही.

महाराष्ट्रीय भगव्याप्रमाणे शिखांचे कृपाण हेही त्यावर अंकित असल्याने हिंदू जातीच्या दुसऱ्या महान संरक्षकाची, गुरू गोविंदसिंगांचीही मुद्रा त्यावर अंकित आहे. गुरू गोविंद कटीस दोन खड्ग बांधीत आणि म्हणत, हा खड्ग योगाचा आहे, हा भोगाचा आहे, हा शांतीचा आहे, हा पुष्टीतुष्टीचा! तोच संदेश हा हिंदुध्वज घोषित करीत आहे. तो योगाचा खड्ग ही ह्या ध्वजावरील कुंडलिनी आहे. तो भोगाचा खड्ग हे कृपाण! त्याचप्रमाणे हा ॐकार, शिखांचा, वैदिकांचा, आर्यांचा, ब्राम्हणांचा, सनातनीयांचा, सर्वांचाच महामंत्र आहे. ही कुंडलिनी ही जैन, बौध, शैव, शाक्त चार्वाकांसुध्दा अखिल हिंदुंच्या सर्वांच्या भवितव्याची हमी आहे. सर्व प्रांताच्या आणि पंथाच्या जातीवर्ण निर्विशेष हिंदू मात्रास अत्यंत पुज्य असलेली आणि त्यांचे प्रतिनिधित्व करणारी, हिंदू जातीच्या महान ध्येयाची घोषणा करणारी, भूतकाळाच्या हितावह परंपरेस लवमात्र न सोडता हिंदू जातीच्या धार्मिक आणि राष्ट्रीय अशा महान भावी आकांक्षांना प्रकट आणि प्रस्फुरित करणारी आणि तरीही अखिल मनुष्य जातीसह प्रत्यक्ष बुध्दिवादाने, भौतिक शास्त्रांच्या परिभाषेतही पटवून देता येणारी ही ॐकारयुक्त–कुंडलिनी –कृपाणाची भव्य चिन्हे ज्या भगव्यावर अंकित आहेत, तो हा हिंदुध्वज देवकुलाच्या कोटी-कोटी वीरांच्या प्रतापाने “परित्राणाय साधूनाम् विनाशासच दुष्कृताम्” अशी धीरगंभीर गर्जना करीत अखिल मानवांचे परम मंगल साधीत या पृथ्वीवर सर्वत्र आणि सदोदित विजयी होवो!!!

लेखक- स्वातंत्र्यवीर सावरकर

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here