पोयसर नदी मलमुक्त करण्याचा खर्च ४०० कोटींनी वाढला

151

मुंबईतील सहा ठिकाणी असलेल्या मलजल प्रक्रिया केंद्रांचे काम निविदेतच अडकलेले असताना महापालिकेने आता मिठी नदीनंतर पोयसर नदी मलमुक्त करून तिला पुनर्स्वरुप प्राप्त करून देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पोयसर नदीत येणार शेणमिश्रीत पाणी तसेच मलवाहितील सांडपाणी आदी रोखण्याच्या दृष्टीकोनात, मलनि:सारण वाहिन्या टाकण्याचे आणि या मलजलावर प्रक्रिया केंद्राची कामे हाती घेण्यात येत आहेत. यासाठी विविध करांसह तब्बल १४८२. ३९ कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. विशेष म्हणजे जानेवारी २०२० मध्ये याचा खर्च ५४० कोटी रुपये एवढा अपेक्षित होता, परंतु एका वर्षात याचा खर्च ९३४ कोटींवर पोहोचला आहे. त्यामुळे एकाच वर्षात या प्रकल्पाचा खर्च सुमारे ४०० कोटींनी वाढल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.

पश्चिम उपनगरांतील ओशिवरा/वालभट, पोयसर आणि दहिसर या नद्यांची स्थिती एकसारखीच असल्याने या नद्यांचे पुनरुज्जीविकरण करण्याचा निर्णय घेत महापालिका प्रशासनाने टंडन अर्बन सोल्यूशन्स प्रा.लि. या प्रकल्प व्यवस्थापन सल्लागारांची नेमणूक करण्यात आली. यानुसार सल्लागाराने पोयसर नदीच्या पुनरुज्जीविकरणासाठी प्रस्ताव तयार केला. यामध्ये पोयसर नदीच्या दोन्ही काठांवर सेवा रस्ता आणि रस्त्यालगतच्या पर्जन्य जलवाहिन्या बांधून नदीचे पुनरूज्जीविकरण करतानाच रस्त्यावर मलनिःसारण वाहिनी टाकणे आणि उदंचन केंद्रापर्यंत वाहून नदीलगतच्या झोपडपट्ट्यांमध्ये मलनिःसारण वाहिनी टाकणे. तसेच मलवाहिनी नसल्याने झोपडपट्टीमधून नदीमध्ये येणाऱ्या सांडपाण्यास प्रतिबंध करण्यासाठी इंटरसेप्टर बसविणे. सांडपाणी प्रस्तावित मल केंद्रात वळविणे, तसेच मलजल प्रक्रिया केंद्रामध्ये प्रक्रिया केलेले पाणी पावसाळ्याव्यतिरिक्त पुनःश्च नदीमध्ये सोडून प्रवाहित ठेवणे. यासाठी पोयसर नदीवर ५ ठिकाणी मलजल प्रक्रिया उभारणे, तसेच मलजल प्रक्रिया कार्यान्वित झाल्यानंतर पुढील १५ चालविणे व देखभाल, दुरूस्ती करणे, परिरक्षण करणे आदी कामांसाठी निविदा मागवण्यात आली होती.

( हेही वाचा : सफाई कामगारांच्या इमारतींना अग्निरोधक यंत्रणा बसवायला महापालिका विसरली )

या कामासाठी महापालिकेन २१ एप्रिल २०२० मध्ये प्रथम निविदा मागवताना कार्यालयीन अंदाज सुमारे ५४० कोटी रुपये एवढा वर्तवला होता. परंतु त्यावेळेस मागवलेल्या निविदेमध्ये १३ वेळा मुदतवाढ देऊनही प्रतिसाद न लाभल्याने ही निविदा रद्द केली. त्यानंतर कार्यालयीन अंदाज हा ७५१ कोटी रुपये करून फेरनिविदा मागवण्यात आली. यालाही १३ वेळा मुदतवाढ देण्यात आली. यात चार कंपन्यांनी भाग घेतला होता. परंतु यामध्ये निविदा पूर्व बैठकीत सूचवलेल्या ४५ कोटी २८ लाख रुपयांचा समावेश नव्हता. त्यामुळे पुन्हा कार्यालयीन अंदाजाची रक्कम वाढवून ९३४ कोटी रुपये एवढी करण्यात आली. या निविदेमध्ये वाटाघाटीनंतर ए.बी.एल.-जी.ई.एल या संयुक्त भागीदारीतील कंपनी १,०४६ कोटी रुपये व विविध करांसह १,४८२.३९ कोटी रुपयांच्या कंत्राट कामांसाठी पात्र ठरली आहे.

पोयसर नदीचा उगम

पोयसर नदी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून उगम पावून पश्चिम द्रुतगती महामार्ग आणि पश्चिम रेल्वे ओलांडून पुढे मालाड खाडीमध्ये विसर्जित होते. पोयसर नदीची एकूण लांबी ११.१५ किलोमीटर व रूंदी उगमस्थानी १० मी. असून ती पातमुखापर्यंत ४५ मी. पर्यंत बदलत जाते. ही नदी १,९२८ हेक्टर पाणलोट क्षेत्र असलेल्या पाणलोटमध्ये वाहते.

हे नाले मिळतात पोयसर नदीला

पोयसर नदीला कमला नेहरू नाला, जोगळेकर नाला, पी.एम्.जी.पी. नाला, समता नगर नाला, गौतम नगर नाला इत्यादी विविध नाले मिळतात, तसेच विविध पर्जन्य जलवाहिन्यांमधून त्या-त्या परिसरांतील वसाहती, झोपडपट्टया व सोसायट्यांमधील मल:मिश्रीत सांडपाणी नदीमध्ये प्रवाहित होते.

नदीमध्ये तबेल्यांमधून शेणमिश्रीत पाणी

नदीच्या काठांवर असलेल्या तबेल्यांमधून शेणमिश्रीत पाणी कोणत्याही प्रक्रियेविना नदीमध्ये सोडण्यात येते. परिणामी नदी प्रदुषित होऊन नदीतून पावसाचे अतिरिक्त पाणी वाहून नेण्याऐवजी नदीला कचऱ्याने भरलेल्या नाल्यांसारखे बकाल स्वरूप प्राप्त होते. उन्हाळ्यात नदीतील पाणी सुकते आणि त्यामुळे प्रदूषणाचे प्रमाण जास्त होते. पोयसर नदीच्या प्रदुषणास अटकाव व आळा बसावा, तसेच परिसरातील रहिवाशांचे आरोग्य व राहणीमान सुधारण्यासाठी मुंबई महानगरपालिकेतर्फे नदीच्या पुनरुज्जीविकरणाचा हा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.