घाटकोपर-मानखुर्द जोड रस्त्यांवर शिवाजी नगर जंक्शन, बैगनवाडी जंक्शन, देवनार डम्पिंग जंक्शनपर्यंतच्या विस्तारीत उड्डाणपूलाच्या बांधकामाच्या कंत्राटात तिसऱ्यांदा व्हेरीएशन केले जात आहे. यापूर्वी या पुलाच्या बांधकामांमध्ये सुमारे १२० कोटींहून अधिक वाढ झाली होती. आता त्यात आणखी १९.४८ कोटींची वाढ केली जात आहे. त्यामुळे या पुलाच्या बांधकामाचा खर्च आता ४६७ कोटींवरून आता ५९९ कोटी रुपयांवर पोहोचले असून विविध करांसह या कंत्राटाची एकूण किंमत ७१३ कोटींहून ७३२ कोटींवर पोहोचले आहे.
वाढीव कामांच्या फेरफाराला स्थायी समितीने मंजुरी
घाटकोपर-मानखुर्द जोड रस्त्यांवरील देवनार डम्पिंग ग्राऊंड पर्यंतच्या विस्तारीत उड्डाणपुलाच्या कामासाठी डिसेंबर २०१६ रोजी जे. एम. सी प्रोजेक्ट्स लिमिटेड कंपनीला ३० महिन्यांच्या कालावधीकरता ४६७ कोटी ६८ लाख रुपयांचे कंत्राट देण्यात आले होते. त्यानंतर माच २०१७ पासून कामाला सरुवात करण्यात आली. त्यानंतर पुलाच्या बांधकामामध्ये वाढ करत विस्तारीत पुलांची कामे जोडण्यात आली. ज्यामुळे या मूळ कंत्राट कामांमध्ये ५७९.५९ कोटींची वाढ केली गेली. त्यामुळे वाढीव कामांच्या फेरफाराला स्थायी समितीने मंजुरी दिली होती.
(हेही वाचा – प्रभादेवीत ८५ लाखांची सदनिका! ‘या’ लोकांसाठीच होणार उभारणी )
त्यानुसार या मुख्य उड्डाणपूलाचे काम १०० टक्के पूर्ण झाले आहे. तसेच जी तीन पादचारी पुलांची बांधणी केली जाणार होती, त्यातील दोन पुलांचे काम पूर्ण झाले असून एका पुलाचे काम रद्द करण्यात आले आहे. तर मोहिते पाटील नगर जंक्शन येथील भुयारी मार्गाचे कामही १०० टक्के पूर्ण झाले आहे.
वाढीव कामांसह कंत्राट किंमत ५९९ कोटी रुपयांवर
या कामांसाठी नेमलेल्या कंपनीने काम पूर्ण झाल्यानंतर वस्तू व सेवा करामुळे जी अतिरिक्त रक्कमेचा परतावा मिळण्यासाठी अर्ज केला. या अर्जाच्या अनुषंगाने महापालिकेच्या विधी विभागाकडून निवृत्त न्यायाधिश व ज्येष्ठ विधिज्ञ हेमंत गोखले व महापालिकेचे कर सल्लागार बाटलीबॉय व पुरोहित यांच्याकडून अभिप्राय मागवण्यात आले. त्यानुसार ही रक्कम देणे बंधनकारक असल्याचा अभिप्राय त्यांनी दिला आहे. त्यामुळे वस्तू व सेवा कराची एकूण अदा करावयाची अतिरिक्त रक्कम १९ कोटी ४८ लाख एवढी द्यावी लागणार असल्याने मूळ कंत्राट किंमतीत वाढ झाली आहे. त्यामुळे दुसऱ्या फेरफारानंतर वाढलेल्या ५७९.५९ कोटी रुपयांच्या तुलनेत वाढीव कामांसह एकूण कंत्राट किंमत ही ५९९ कोटी रुपये एवढी झाली आहे.
Join Our WhatsApp Community