महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये रुग्णांवर उपचार करण्यात होणारी दिरंगाई आणि रिक्त पदांमुळे कर्मचाऱ्यांवर रुग्णसेवा पुरवताना येणारा ताण यामुळे महापालिकेची आरोग्य व्यवस्था कोलमडली जात असताना आता आजही केईएम रुग्णालयांमध्ये कोविड पॅटर्नचा वापर केला जात आहे. कोविडची लाट गेल्यानंतरही केईएममध्ये दोन दिवस आड एक सुट्टी या पॅटर्नचा वापर केला जात असून याचा संसर्ग महापालिकेच्या इतर रुग्णालयांना लागून त्यांच्याकडूनही आता ही मागणी होत आहे. त्यामुळे महापालिकेच्या इतर कर्मचाऱ्यांच्या पाच दिवसांच्या आठवड्याप्रमाणे अति अत्यावश्यक सेवांमधील हे कर्मचारी कोविड पॅटर्नचा वापर आजही करत असल्याने कोविडची लाट फक्त केईएममध्ये आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे.
केईएम रुग्णालय अपवाद का?
मार्च २०२० मध्ये कोविड १९च्या विषाणूचा संसर्ग झाल्यानंतर महापालिकेच्या रुग्णालयांना अलर्ट करण्यात आले. कोविड काळामध्ये नर्ससह इतर कर्मचाऱ्यांनी दोन दिवसांची सेवा दिल्यानंतर त्यांना एक दिवसाची रजा दिली जायची. परंतु कोविड काळात कर्मचाऱ्यांच्या रजेकरता वापरलेला हा पॅटर्न दुसरी लाट ऑगस्ट २०२१ नंतर संपुष्टात आल्यानंतरही आजही केईएम रुग्णालयांमध्ये वापरात आहे. महापालिकेच्या इतर रुग्णालयांमध्ये पुन्हा आठवड्याची एक साप्ताहिक सुट्टी घेत नर्ससह इतर कर्मचारी सेवा बजावत असताना केईएम रुग्णालय मात्र याला अपवाद का, अशी विचारणा आता होत आहे.
केईएम रुग्णालयांमधील नर्ससह रुग्णालयीन कर्मचारीही अपवाद
महापालिकेच्या सर्व श्रेणीतील कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा केल्याने त्यांना शनिवार व रविवार सुट्टी दिली जाते. परंतु कोविड काळात सुरु केलेल्या पॅटर्नची आजतागायत अंमलबजावणी केईएम रुग्णालयांमध्ये सुरु असल्याने याची चर्चा आता इतर रुग्णालयांमध्ये सुरु झाली आहे. त्यामुळे इतर रुग्णलयांकडून रजेच्या कोविड पॅटर्नच्या अंमलबजावणीची मागणी वाढू लागली आहे. केईएम वगळता शीव आणि नायर या प्रमुख रुग्णालयांसह इतर विशेष आणि उपनगरीय रुग्णालयांमधील कर्मचाऱ्यांनी रजेचा कोविड पॅटर्न बंद करून पुन्हा जुन्या पध्दतीने सेवा द्यायला सुरु केली आहे. परंतु केईएम रुग्णालयांमधील नर्ससह रुग्णालयीन कर्मचारीही याला अपवाद आहे.
कामगार संघटना म्हणून गप्प
केईएम रुग्णालयांमध्ये जो रजेचा कोविड पॅटर्न राबवला जात आहे, त्याचा इतरही रुग्णालयांमध्ये लाभ मिळवून देणार असल्याचे सांगत कामगार संघटना आपले सदस्य वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे केईएममधील या रजेच्या पॅटर्नबाबत कुठलीही कामगार संघटना आवाज करताना दिसत नाही.
( हेही वाचा : बापरे! पुण्यात परदेशातून आलेले १ हजार बेपत्ता )
बायोमेट्रीक हजेरीचा पर्याय
केईएम रुग्णलयांमध्ये नर्ससह इतर कर्मचारी हे कोविडप्रमाणेच आजही सुट्टी घेत असले, तरी इतर कर्मचाऱ्यांकडून कोणत्याही प्रकारची अतिरिक्त सेवा घेत नाही. आठ तासांप्रमाणे ही सेवा आहे, तीच सेवा हे कर्मचारी देत असतात. त्यामुळे आठवड्याला पाच दिवस काम आणि दोन सुट्टी याप्रमाणे ते सेवा देत आहेत. कोविड काळात जो पॅटर्न दिला होता, त्याची अंमलबजावणी आजही होत असून बायोमेट्रीक हजेरी झाल्यास तशा प्रकारची नोंद आपण करून घेऊ, जेणेकरून त्यांच्या हजेरीच्या नोंदीवरून गोंधळ होणार नाही, असे केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता हेमंत देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.
Join Our WhatsApp Community