मुंबई गुन्हे शाखा पुन्हा उभारी घेणार

मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेला बळकटी देण्यासाठी अँटिलिया प्रकरणानंतर बदली करण्यात आलेल्या गुन्हे शाखेतील पोलीस अधिकाऱ्यांना पुन्हा एकदा गुन्हे शाखेत बोलवण्यात येणार असल्याचा निर्णय पोलीस आयुक्तांनी घेतल्याचे समजते.  या अधिकाऱ्यांची मुंबईतील गुन्हेगार, अंडरवर्ल्ड तसेच दहशतवादी यांच्यावर चांगली पकड असल्यामुळे मुंबईतील गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवता येईल, असा विश्वास पोलीस आयुक्तांना आहे.
अँटिलिया प्रकरण तसेच मनसुख हिरेन हत्याकांडात मुंबई गुन्हे शाखेतील पोलिस अधिकारी सचिन वाजेसह काही अधिकारी अडकले. त्याचवेळी खंडणी प्रकरणात गुन्हे शाखेतील अधिका-यांवर गुन्हे दाखल झाले आहेत. काहींना अटकदेखील करण्यात आली होती. हे सर्व प्रकरण तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या काळात घडल्यामुळे परमबीर सिंग यांची बदली करण्यात आली होती. त्यानंतर पोलीस आयुक्तपदी हेमंत नगराळे यांना बसवण्यात आले होते.
अँटिलिया आणि मनसुख हिरेन हत्याकांड हे दोन्ही कट पोलीस मुख्यालयातील गुन्हे शाखेच्या गुन्हे गुप्तचर शाखा (सीआययू) च्या कार्यालयात शिजल्याचे समोर आल्यानंतर, तत्कालीन पोलीस आयुक्त नगराळे यांनी गुन्हे शाखेत अनेक वर्षांपासून ठाण मांडून बसलेले पोलीस अधिकारी असे एकूण ६५ जणांची एकाचवेळी गुन्हे शाखेतून उचलबांगडी करून त्यांना साईड पोस्टिंग देण्यात आले. त्यानंतर मुंबई गुन्हे शाखेला घरघर लागली होती, संजय पांडे हे पोलीस आयुक्त झाल्यानंतर त्यांनी देखील गुन्हे शाखेकडे दुर्लक्ष केले होते. मुंबई पोलीस दलाचा एकेकाळी कणा समजल्या जाणाऱ्या गुन्हेशाखेचे संपूर्ण देशात नाव होते. अंडरवर्ल्ड असो अथवा दहशतवादी संघटना असो या गुन्हे शाखेने त्यांचे कंबरडे मोडून ठेवले होते. मात्र मागील दोन वर्षांपासून गुन्हे शाखेची अवस्था अडगळीत पडल्यासारखी झाली होती.

( हेही वाचा: रस्त्याचे काम सुरू आहे का? क्यू आर कोड स्कॅन करा आणि जाणून घ्या किती काम झाले ते! )

त्या अधिका-यांची पुन्हा नियुक्ती होणार 
या शाखेला बळ देण्याचा प्रयत्न मुंबई पोलीस आयुक्तपदी रुजू झालेले पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी दिले. विवेक फणसाळकर यांनी पोलीस आयुक्त पदाची धुरा सांभाळातच मुंबई पोलीस दलाच्या गुन्हे शाखेत नवचैतन्य निर्माण झाले असून, अडगळीत पडलेल्या गुन्हे शाखेने पुन्हा एकदा उभारी घेतली आहे. गुन्हे शाखेला अधिकच बळकट करण्यासाठी फणसाळकर यांनी ज्या ६५ अधिका-यांची गुन्हे शाखेतून उचलबांगडी करण्यात आली आहे, त्यांना पुन्हा गुन्हे शाखेत आणले जाणार आहे. ६५ अधिका-यांची सम्पूर्ण माहिती काढून चौकशीच्या फेऱ्यात नसलेल्या अधिका-यांना गुन्हे शाखेत पुन्हा रुजू करण्यात येणार आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here