२५ फेब्रुवारी ते १७ मार्च अंबानी-हिरेन प्रकरणाची संपूर्ण ‘पटकथा’…

आता या प्रकरणावर एखादी वेब सिरीज किंवा सिनेमा बनला नाही तरच नवल. म्हणून मग विचार केला की जरा या प्रकरणाची पटकथा(स्क्रिनप्ले) आपण लिहूया आणि तुम्हाला पण जरा नवीन कोरी करकरीत वेब सिरीज बघितल्याचा फील देऊया...

193

जगातील टॉप-१० श्रीमंत व्यक्तींपैकी एक आणि भारताच्या उद्योग जगतातील शहनशहा मुकेश अंबानी यांचा अॅंटिलिया बंगला हा एखाद्या राजवाड्यालाही लाजवेल इतका भव्यदिव्य आहे. अरे अंबानीचा बंगला २७ माळ्यांचा आहे…विषय आहे का, अशी चर्चा आजवर आपण कधी ना कधी केली अथवा ऐकली असेल. पण गेले काही दिवस अंबानी, त्यांचा बंगला या सगळ्या गोष्टी केवळ स्टार्टर म्हणून राहिल्या आहेत आणि त्यांच्या घराबाहेर सापडलेली स्कॉर्पिओ गाडी ही मेन कोर्सचा विषय बनली आहे.

कारण त्यानंतर झालेल्या सगळ्याच घडामोडी ह्या याच गाडीभोवती फिरत आहेत. मनसुख हिरेन यांचा मृत्यू, त्यानंतर गुन्हे अन्वेषण विभागाचे तत्कालीन सहाय्यक पोलिस अधिकारी सचिन वाझे यांच्याभोवती घोंगावणारं संशयाचं वादळ, नुकतीच झालेली मुंबई पोलिस आयुक्तांची बदली हा सगळा घटनाक्रम आपल्याला एखादी वेब सिरीज पाहिल्याचा अनुभव देऊन जातो. प्रत्येक दिवसागणिक या प्रकरणात घडणारी प्रत्येक घडामोड म्हणजे थ्रिलिंग एपिसोडच आहे. आता या प्रकरणावर एखादी वेब सिरीज किंवा सिनेमा बनला नाही तरच नवल. म्हणून मग विचार केला की जरा या प्रकरणाची पटकथा(स्क्रिनप्ले) आपण लिहूया आणि तुम्हाला पण जरा नवीन कोरी करकरीत वेब सिरीज बघितल्याचा फील देऊया…

ambani 1

२५ फेब्रुवारी २०२१(गुरुवार)

नुकताच आयपीएल २०२१चा लिलाव पार पाडून जरा निवांत झालेल्या मुंबई इंडियन्सच्या मालकीणबाई निता अंबानी आणि जिओ 5Gच्या गडबडीत असलेल्या मुकेशजींच्या आलिशान बंगल्यापासून काही अंतरावर, एक हिरव्या रंगाची संशयास्पद स्कॉर्पिओ गाडी आढळून आली. या गाडीत सुपर पावरडेझर एक्सप्लोझिव्ह २५ एम एम १२५ ग्रॅम, २० जिलेटीन कांड्या, बनावट नंबर प्ले हे सर्व साहित्य मुंबई इंडियन्स असे लिहिलेल्या एका बॅगमध्ये सापडले. या सोबतच एक धमकीचे पत्र सुद्धा होते. या पत्रात,

डिअर नीता भाभी और मुकेश भैय्या और फॅमिली.. ये तो सिर्फ ट्रेलर है. अगली बार ये सामान पुरा होके आएगा तुम्हारे फॅमिली को उडाने… संभल जाना…

असा धमकीचा मजकूर लिहीण्यात आला होता. तसेच या गाडीचा नंबर हा अंबानींच्या शेकडो गाड्यांपैकी एका गाडीशी मिळताजुळता असल्याचे समोर आले. सीआययूचे सहाय्यक पोलिस आयुक्त सचिन वाझे यांच्या नेतृत्वात प्राथमिक तपास सुरू झाला.

२६ फेब्रुवारी २०२१(शुक्रवार)

दुस-या दिवशी पोलिसांना तपासात नवीन माहिती मिळाली. स्फोटकांनी भरलेली संशयास्पद स्कॉर्पिओ ही विक्रोळी इथून चोरी झाल्याची माहिती सीसीटीव्ही फुटेजमधून समोर आली. ही गाडी ठाण्यातील गॅरेज मालक मनसुख हिरेन यांची असल्याचे समोर आले. सात-आठ दिवसांपूर्वी आपली गाडी चोरी झाल्याची तक्रार त्यांनी पोलिसात केली होती. १७ फेब्रुवारीला हिरेन कामानिमित्त चालले असताना त्यांच्या गाडीचे स्टेअरिंग अचानक जाम झाले आणि त्यांनी आपली गाडी विक्रोळी येथे पार्क केली. दुस-या दिवशी ते मेकॅनिकला घेऊन गाडी घेण्यासाठी गेले असता, त्याठिकाणी गाडी नसल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले होते. पण या प्रकरणात हिरेन नसले तरी त्यांची गाडी असल्यामुळे, त्यांना सतत पोलिसांच्या चौकशीला सामोरे जावे लागत होते.

Hiren

२८ फेब्रुवारी २०२१(रविवार)

आता स्फोटके म्हटली की त्यात एखाद्या दहशतवादी संघटनेचा हात असतोच, असे आपल्याला अनेकदा बघायला मिळते. त्याचप्रमाणे अंबानींच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांचीही जैश-उल-हिंद या दहशतवादी संघटनेने जबाबदारी स्विकारली. मात्र मुंबई पोलिसांनी हे कृत्य दहशतवादी संघटनेचे असूच शकत नाही, असे ठामपणे सांगितले. कारण दशतवादी संघटना घातपाताचे कृत्य करतांना मागे कुठलाही पुरावा सोडत नसल्याचे मुंबई पोलिसांचे म्हणणे होते. तसेच मुंबई पोलिस आणि राज्य दहशतवाद विरोधी पथकाकडून या संघटनांची मुंबईत नाकाबंदी करण्यात आली असल्याने ते हे धाडस करू शकत नाहीत, असे सांगण्यात आले.

(हेही वाचाः मुकेश अंबानींच्या जीवाला धोका? प्रकरण एनआयएकडे जाणार?)

१ मार्च २०२१(सोमवार)

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले आणि त्याच दिवशी पोलिसांनी दिलेली माहिती खरी ठरली. जैश-उल-हिंद संघटनेने या प्रकरणाशी आपला काहीही संबंध नसल्याचे सांगत जबाबदारी फेटाळून लावली. त्यामुळे पोलिसांनी आपला तपास योग्य दिशेत होत असल्याचे सांगितले.

५ मार्च २०२१(शुक्रवार)

हाच तो दिवस ज्या दिवशी या मालिकेत एक मोठा ट्विस्ट आला. या प्रकरणात ज्यांची सतत चौकशी केली जात होती, त्या मनसुख हिरेन यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. सकाळी १०.३०च्या सुमारास त्यांचा मृतदेह कळवा खाडीत पोलिसांना सापडला. तसेच हिरेन हे ४ मार्च रोजी रात्री घरातून बाहेर पडले पण उशिरापर्यंत घरी न आल्याने, त्यांच्या कुटुंबियांनी नौपाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

crime

मुख्य म्हणजे ५ मार्चला विधानसभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हिरेन हे या प्रकरणातील मुख्य दुआ आहेत. त्यासाठी त्यांना संरक्षण देण्याची मागणी केली होती. पण त्यानंतर हिरेन यांचा मृतदेह सापडल्याची माहिती मिळताच हे प्रकरण गंभीर असल्याचे सांगत याची चौकशी एनआयएकडे सोपवावी, अशीही मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली.

रात्री उशिरा हिरेन यांच्या पत्नी विमला व मोठा भाऊ विनोद यांनी मनसुख यांनी आत्महत्या केली नसून, त्यांच्यासोबत घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला. विमला यांनी पत्रकारांशी बोलताना दिलेली माहिती अशी की, मागील आठ दिवसांपासून माझ्या पतीला पोलिसांचे चौकशीसाठी फोन येत होते. माझे पती पोलिसांना तपासात सहकार्य देखील करत होते. आमची मोटार विक्रोळी येथून चोरीला गेल्यानंतर आम्ही विक्रोळी पोलिस ठाण्यात तक्रार देखील केली होती. गुरुवारी रात्री माझ्या पतीला एक फोन आला. मी त्यांना त्याबाबत विचारले असता, कांदिवली क्राईम ब्रांच येथून तावडेचा फोन आहे, त्यांनी घोडबंदर येथे मला भेटायला बोलावले आहे, असे बोलून ते रात्री घरातून बाहेर पडले. त्यानंतर मी त्यांना रात्री १० वाजता फोन केला तर त्यांचा फोन स्विच ऑफ लागत होता, असे मनसुख यांची पत्नी विमला यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

(हेही वाचाः त्या रात्री हिरेनना भेटायला बोलावणारा, कांदिवली क्राईम ब्रँचचा ‘तो’ अधिकारी कोण ? )

६ मार्च २०२१(शनिवार)

मनसुख यांच्या मृतदेहाचा शवविच्छेदन अहवाल समोर आला. प्राथमिक अहवालात मनसुख यांच्या शरीरावर कुठल्याही प्रकारच्या मारल्याच्या खुणा आढळून आलेल्या नसून, मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट होत नसल्याने अंतिम अहवाल राखून ठेवण्यात आला. तसेच त्यांचे भाऊ विनोद यांनी, मनसुख पट्टीचा पोहणारा होता त्याचा बुडून मृत्यू होऊच शकत नाही, त्याची हत्या करून मृतदेह पाण्यात फेकला असल्याचा संशय व्यक्त केला. तसेच ती स्कॉर्पिओ ही मनसुख यांच्या नावावर नसून सॅम न्यूटल या व्यक्तीच्या नावावर होती. मनसुख हे कार इंटीरियर डिझायनर असल्यामुळे, सदर स्कॉर्पिओ मोटार ही मागील तीन वर्षांपासून मनसुख यांच्याजवळ होती, अशी माहिती त्यांनी दिली. तसेच मनसुख यांच्या मोबाईलचे शेवटचे लोकेशन वसई येथील असल्याने गूढ वाढले होते.

New Project 10 2

(हेही वाचाः मनसुख हिरेन यांची फसवून हत्या! नातलगांचा आरोप )

७ मार्च २०२१(रविवार)

या रहस्यमय प्रकरणाचा तपास गृह विभागाकडून एटीएसकडे वर्ग करण्याचे आदेश देण्यात आले होते. एटीएसने कुठलेही ठोस पुरावे नसल्यामुळे, परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे व मनसुख हिरेन यांच्या पत्नी विमला यांच्या फिर्यादीवरुन दहशतवाद विरोधी पथकाने हत्या, पुरावा नष्ट करणे, एकत्रित कट रचल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. त्यामुळे हिरेन यांची खरंच हत्या झाली का, असा प्रश्न निर्माण झाला.

(हेही वाचाः मनसुख हिरेन यांची खरंच हत्या? एटीएसने केला गुन्हा दाखल… गूढ काही संपेना!)

८ मार्च २०२१(सोमवार)

विरोधकांकडून सतत एनआयएकडे तपास सोपवण्याची मागणी होत असल्याने, अखेर हा तपास एनआयएकडे वर्ग करण्यात आला.

९ मार्च २०२१(मंगळवार)

या दिवसाचा स्क्रिनप्ले हा एकदम थ्रिलिंग होता. देवेंद्र फडणवीस यांनी थेट विधानसभेत मनसुख हिरेन यांच्या पत्नी विमला हिरेन यांनी पोलिसांना दिलेला जबाब वाचून दाखवला. त्या जबाबात विमला यांनी त्यांच्या पतीचा खून झाला असावा आणि तोही या प्रकरणाचा सुरुवातीला तपास करणारे पोलिस अधिकारी सचिन वाझे यांनीच केला असावा, असा खळबळजनक आरोप केला.

VAZE

(हेही वाचाः हिरेन मृत्यू प्रकरणात नवा गौप्यस्फोट… सचिन वाझेंना अटक करा- फडणवीसांची मागणी!)

त्यामुळे थेट तपास अधिका-यालाच खलनायक बनवून आरोपीच्या पिंज-यात उभे केल्याने मोठा गौप्यस्फोट झाला. तसेच सचिन वाझे हे व्यवसायानिमित्त आपल्या पतीच्या ओळखीचे असल्याचे सांगितले. हिरेन यांची तीन दिवस वाझे यांनी चौकशी केली. चौकशी झाल्यानंतरही वारंवार पोलिसांकडून चौकशीसाठी फोन येत असल्याने माझ्या पतीला तक्रार अर्ज दाखल करण्यासाठी सुद्धा सचिन वाझे यांनीच सांगितले होते, असंही जबाबात म्हटले आहे. वाझे यांनी माझ्या पतीला ‘अटक हो’ असे सांगितले होते, दोन-तीन दिवसांत मी तुला जामिनावर बाहेर काढतो. असंही विमला यांनी सांगितल्याचा खुलासा फडणवीसांनी केला. त्यानंतर सभागृहात आरोप-प्रत्यारोप झाल्याने एकच गोंधळ उडाला.

१० मार्च २०२१(बुधवार)

विरोधकांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांची क्राईम ब्रॅंचमधून बदली करण्यात येत असल्याचे, विधान परिषदेत सांगितले. तसेच त्यांची एकाच दिवसात दोन वेळा बदली करण्यात आली.

(हेही वाचाः बदलीत सुद्धा गोंधळाचे वातावरण!)

१३ मार्च २०२१(शनिवार)

या प्रकरणात पुरते अडकलेल्या वाझे यांनी एक व्हॉट्सअप स्टेटस ठेवत आता जगाला ‘गुड बाय’ म्हणण्याची वेळ आल्याचे म्हटले होते. त्यात त्यांनी आपल्याला आपल्याच सहका-यांनी फसवल्याचे म्हटले होते. त्यांनी केलेला अटकपूर्व जामीनही जिल्हा सत्र न्यायालयाने तात्पुरता फेटाळत, १९ मार्च ही सुनावणीची तारीख दिली. याच दिवशी रात्री त्यांना एनआयएकडून १३ तासांच्या चौकशीनंतर अटक करण्यात आली.

SAHCIN V

१४ मार्च २०२१(रविवार)

वाझे यांना रविवारी न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने त्यांना २५ मार्चपर्यंत एनआयए कोठडी सुनावली. त्यानंतर त्यांना एनआयएच्या कार्यालयात नेण्यात आले.

(हेही वाचाः सचिन वाझेंना २५ मार्चपर्यंत एनआयए कोठडी!)

१६ मार्च २०२१(मंगळवार)

स्फोटकांनी भरलेली जी स्कॉर्पिओ गाडी अंबानींच्या घराबाहेर सापडली होती, ती कधीच चोरी झाली नसल्याचा खळबळजनक प्रकार, एनआयएच्या तपासात समोर आला. ही गाडी चोरीला न जाता सचिन वाझे राहत असलेल्या ठाणे येथील साकेत कॉम्प्लेक्स येथे उभी असल्याचे, तपासात सांगण्यात आले. पुरावे सापडू नयेत म्हणून, वाझे यांनी सीआययूच्या माध्यमातून साकेत कॉम्प्लेक्सचे सीसीटीव्ही फुटेज बेकायदेशीररित्या काढून ते नष्ट केल्याचे एनआयएने सांगितले.

HIREN SACHINVAJE

याच दिवशी रात्री अजून एक धक्कादायक प्रकार एनआयने उघडकीस आणला. ज्या मर्सिडीज कारमधून मनसुख हिरेन यांनी शेवटचा प्रवास केला ती गाडी एनआयने जप्त केली. ही गाडी सचिन वाझे चालवत असल्याचेही सांगण्यात आले. ही गाडी धुळ्यातील सारांश भावसार यांनी फेब्रुवारीमध्ये विकली होती. या मर्सिडीज गाडीत अनेक बनावट नंबर प्लेट, एक चेक्सचा शर्ट, पाच लाख रुपयांची रोख रक्कम तसेच नोट काऊंटिंग मशीन, अशा अनेक वस्तू सापडल्या होत्या.

Mansukh Hiren Case

(हेही वाचाः हिरेन यांनी शेवटचा प्रवास केला ती मर्सिडीज एनआयएच्या हाती… सापडल्या धक्कादायक वस्तू!)

१७ मार्च २०२१(बुधवार)

हे संपूर्ण प्रकरण हाताळण्यात मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंग आणि गृहमंत्री अनिल देशमुख हे अपयशी ठरल्याचे आरोप करण्यात आल्याने सरकार अडचणीत सापडले होते. परमबीर सिंग यांची बदली आणि अनिल देशमुख यांच्या राजिनाम्याची विरोधक मागणी करत असल्याने, महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या दोन दिवस गल्लीपासून दिल्लीपर्यंत जोर‘बैठका’ सुरू होत्या. आदल्या दिवशी राज्याचे तत्कालीन पोलिस महासंचालक हेमंत नगराळे, गृहमंत्री अनिल देशमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा बंगल्यावर मध्यरात्रीपर्यंत बैठक झाली आणि १७ मार्च रोजी रात्री परमबीर सिंग यांची मुंबई पोलिस आयुक्त पदावरुन अखेर उचलबांगडी करण्यात आली. तर राज्याचे तत्कालीन प्रभारी पेलिस महासंचालक हेमंत नगराळे यांची नियुक्ती करण्यात आली.

Hemant Nagrale

(हेही वाचाः अखेर परमबीर सिंग यांची उचलबांगडी! हेमंत नगराळे मुंबई पोलीस आयुक्त! )

काय मग? आहे की नाही या संपूर्ण घटनाक्रमात ड्रामा???

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.