राज्य सरकारमधील घडामोडीच्या अपयशाचे खापर गुप्तचर यंत्रणेवर!

महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू असलेल्या हालचाली आणि घडामोडींबाबत तसेच, गृहविभागाचे राज्यमंत्री शंभूराजे देसाई हे देखील एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले याची पुसटशी कल्पना राज्य गुप्तचर यंत्रणेला नसावी हे गुप्तचर यंत्रणेचे अपयश असल्याचे बोलले जात आहे. मात्र याबाबत माहिती सरकारला देण्यात आली होती असे गुप्तचर यंत्रणेच्या सूत्रांनी म्हटले आहे. सरकारने वेळीच पाऊले उचलली असती तर सरकारला या अवस्थेतून जावे लागले नसते, असेही म्हटले जात आहे.

विधानपरिषदेच्या निवडणुकीनंतर राजकीय भूकंप

शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक वरील हल्ला असो अथवा इतर घडामोडी असो राज्यातील गुप्तवार्ता विभागावर यापूर्वी देखील अपयशाचे खापर फोडण्यात आले होते. मंगळवारपासून सुरू असलेल्या राज्यातील घडामोडींबाबत देखील गुप्तवार्ता यंत्रणेवर अपयशाचे खापर फोडण्यात येत आहे. विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या दुसऱ्याच दिवशी महाराष्ट्रातील राजकारणात भूकंप झाला आहे. शिवसेनेचे नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केले असून त्यांच्यासोबत राज्यातील अनेक शिवसेनेचे मंत्री आणि आमदार देखील एकनाथ शिंदे यांच्यासोबत असून राज्यमंत्री शंभूराजे देसाई हे देखील एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेले आहेत.

गुप्तवार्ता विभागाचे मोठे अपयश?

राज्यात एवढी मोठी राजकीय घडामोडी सुरू असताना राज्याची गुप्तचर यंत्रणा काय झोपा काढते की काय ? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. राज्य गुप्तवार्ता विभागाला याची पुसटशी कल्पना नसावी या सारखे हे गुप्तवार्ता विभागाचे मोठे अपयश असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र दोन महिन्यांपासून सरकारमध्ये अस्थिरता निर्माण झाली असून सरकारमधले काही आमदार फुटीच्या वाटेवर असल्याची माहिती गुप्तवार्ता विभागाला होती व याची माहिती सरकारला देण्यात आली होती असे या यंत्रणेतील सूत्रांनी म्हटले आहे. सरकारने याला गांभिर्याने घेतले नाही त्यामुळे सरकारला ही नामुष्की ओढवून घ्यावी लागली असेही सूत्रांचे म्हणने आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here