राज्यात विणीच्या हंगामात किना-यावर अंडी घालण्यासाठी येणा-या ऑलिव्ह रिडले कासवांच्या सॅटलाईट टॅगिंग प्रकल्पाला लागलेले ग्रहण अद्याप सुटलेले नाही. सलग पाचव्या मादी ऑलिव्ह रिडले कासवाचा संपर्क तुटल्याचे सोमवारी कांदळवन कक्षाने जाहीर केले. वनश्री या दक्षिण कोकण किनारपट्टीतील समुद्रात फेरफटका मारणा-या मादी ऑलिव्ह रिडले कासवाचा संपर्क तुटला आहे. त्यामुळे प्रकल्प अर्ध्यावरच बारगळण्याची नामुष्की आता शास्त्रज्ञांवर आली आहे.
जानेवारी महिन्यापासून वनविभागाच्या कांदळवन कक्ष आणि भारतीय वन्यजीव संस्थेच्या शास्त्रज्ञांनी पाच मादी ऑलिव्ह रिडले कासवांच्या पाठीवर सॅटलाईट टॅगिंग बसवले. आता पाचही कासवांचा संपर्क तुटला आहे. त्यामुळे सिग्नल यंत्रणेकडून मिळणा-या शेवटच्या तारखेपर्यंत संबंधित कासवाची माहिती प्रकल्पाच्या अभ्यासकरता वापरली जाईल. त्याआधारावरच पाचही मादी कासवांची माहिती, समुद्रातील भ्रमणमार्गाची नोंद घेतली जाईल. लक्ष्मी ही पहिली मादी ऑलिव्ह रिडले कासव संपर्काच्या बाहेर गेली. मार्च महिन्यात लक्ष्मीचा संपर्क बंद झाला. त्यानंतर प्रथमा, सावनी, रेवा संपर्काबाहेर गेल्या. या प्रकल्पाची जबाबदारी स्वीकारलेल्या भारतीय वन्यजीव संस्थेला सॅटलाईट टॅगिंग मशीन बनवणा-या न्यूझीलंडमधील कंपनीने रेवा आणि प्रथमा या दोन मादी ऑलिव्ह रिडले कासवांच्या पाठीवरील सिग्नल यंत्रणेचे मशीन खराब असल्याचे कळवले.
कंपनी दोन नव्या सॅटलाईट टॅगिंगच्या मशिन भारतीय वन्यजीव संस्थेला देणार असल्याची माहिती कांदळवन फाऊंडेशनच्या मनुष्यबळ व देखभाल दुरुस्ती विभागाचे सहसंचालक डॉक्टर मानस मांजरेकर यांनी दिली. वनश्री आणि सावनी या कासवांचा संपर्क तुटण्यामागील कारणाचा कंपनीकडून शोध घेतला जात आहे. पाचही कासवांकडून अपेक्षित माहिती न मिळाल्याने पुढच्या विणीच्या हंगामात मादी ऑलिव्ह रिडले कासवांना पुन्हा सॅटलाईट टॅगिंग केले जाणार का, याबाबत अद्याप निर्णय घेतला नसल्याचेही डॉक्टर मांजरेकर यांनी सांगितले.
शेवटच्या वनश्री कासवाचा संपर्क तुटण्यामागील कारण…
वनश्री आणि रेवा या दोन मादी ऑलिव्ह रिडले कासवांना गुहागर येथील समुद्रकिना-यावरुन १५ फेब्रुवारी रोजी शास्त्रज्ञांनी सॅटलाईट टॅगिग केले होते. ६ ऑगस्टनंतर वनश्रीकडून सिग्नल मिळणे बंद झाले. तिच्याकडून शेवटचा सिग्नल गोव्यातील समुद्राकडून मिळाला. ती पणजीच्या समुद्रात होती. वनश्रीने इतर मादी ऑलिव्ह रिडले कासवांच्या तुलनेत समुद्र भ्रमंती फारच कमी केली.
( हेही वाचा: मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी साकारली भंगारातून इंजिनवरील मिनी ट्रेन व रोबोट )
संपर्क तुटल्याच्या तारखा
- लक्ष्मी -१ मार्च
- प्रथमा – २४ मे
- सावनी – ४ जून
- रेवा – २२ जून