मुंबई महापालिकेची आगामी निवडणूक उद्धव ठाकरे यांची शिवसेना ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत महाविकास आघाडीत लढेल अशाप्रकारची घोषणा होत असली तरी शिवसेनेने आपल्यासोबत नवीन भिडू घेत शिवशिक्ती-भीमशक्तीची घोषणा केली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत आता दलित नेते प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीचा प्रवेश झाला आहे. परंतु शिवसेनेने वंचितसोबत युती करताना थेट आंबेडकर भवन गाठले आणि आजवरच्या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी घातलेल्या प्रथा आणि परंपरेलाच छेद दिला. आजवर शिवसेनेशी युती करताना सर्व पक्षांनी मातोश्रीवर पायधूळ झाडली होती, परंतु वंचितशी युती करताना शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांनी आंबेडकर भवनवरच पायधुळ झाडत आता मुंबईतील ठाकरे यांचे अस्तित्व संपल्याचीच प्रचिती दिली.
हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्ष आणि वंचित बहुजन आघाडी या दोन्ही पक्षांनी एकत्र येत शिवशक्ती व भीमशक्तीची युती होत असल्याची घोषणा केली. दादरमधील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनमध्ये पार पडलेल्या या पत्रकार परिषदेत शिवसेना पक्षाचे उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी ही संयुक्तपणे ही घोषणा केली. यापूर्वी भाजप आणि रिपाइं आठवले गट यांच्यासोबत झालेल्या युतीच्या वेळी दोन्ही पक्षांचे नेते हे मातोश्रीवर गेल्यानंतरच तिथेच युतीची घोषणा करण्यात आली होती. परंतु मातोश्रीच्या बाहेर पत्रकार परिषद घेऊन झालेली ही पहिलीची युतीची घोषणा असल्याचे बोलले जात आहे.
१९८०मध्ये प्रथम शिवसेनेने काँग्रेसला मदत केली होती, तेव्हाही काँग्रेसच्या नेत्यांनी मातोश्रीवर जावून बाळासाहेबांची भेट घेतली होती. त्यामुळे याबाबत ज्या काही बैठका घडल्या त्याही मातोश्रीवर झाल्या होत्या. त्यानंतर १९८४मध्ये शिवसेनेने भाजपसोबत प्रथम युती केली होती. परंतु भाजपने पुलोदची मदत घेतल्याने शिवसेनेने ही युती तोडली होती. पुढे १९८९मध्ये पुन्हा शिवसेनेने भाजपसोबत युती केली होती, ती युती महापालिकेच्या २०१७च्या निवडणुकीवेळी तुटली आणि दोन्ही पक्षांनी स्वतंत्र निवडणूक लढवली, पण २०१९च्या निवडणुकीत दोन्ही पक्षांची पुन्हा युती झाली. पण युतीत आमदार निवडून आल्यानंतर शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेससोबत महाविकास आघाडी करून युती केलेल्या भाजपला बाजुला सारले. ही युती २५ वर्षे टिकली होती.
शिवसेना महाविकास आघाडीसोबत असले तरी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा त्यांचा विश्वास नसल्याने आपल्या पक्षाला मजबूत करण्यासाठी प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीलासोबत शिवशक्ती-भीमशक्तीचा नवा नारा उद्धव ठाकरे यांनी दिला. मात्र, ही पत्रकार परिषद मातोश्री किंवा शिवसेना भवनवर होणे अपेक्षित मानले जात होते, परंतु उद्धव ठाकरे यांनी वंचितने घातलेली अट मान्य करत आंबेडकर भवनवर घेण्यास तयारी दर्शवली आणि स्वत: तिथे हजेरी लावली. आजवरच्या काँग्रेससोबतची मैत्री असो वा भाजप आणि रिपाइं आंबेडकर यांच्यासोबतची युती असो याची घोषणा मातोश्रीवर पायधूळ झाडल्यानंतरच होत असताना, वंचित सोबतच्या युतीची आंबेडकर भवनवर झाल्याने आजवरच्या सर्व प्रथा आणि परंपरेला छेद दिल्याची चर्चा रंगू लागली. ठाकरे नावाचे जे वजन होते, त्या व्यक्तीमत्वाला बाबासाहेब आंबेडकरकरांच्या नातवाने झुकवले.
वंचितची मुंबई आणि महाराष्ट्रात एवढी ताकद नाही, जेवढी ताकद शिवसेनेची आहे. आज शिवसेनेचे दोन तुकडे होऊन शिवसेना (उद्धव ठाकरे गट) आणि बाळासाहेबांची शिवसेना अशी विभागणी झाली. त्यामुळे खरी शिवसेना आपलीच अशी वल्गना करणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी वंचितसोबतच्या आघाडीची युती करण्यासाठी आंबेडकर भवन गाठल्याने आता खऱ्या अर्थाने ठाकरेंचे मुंबईतील अस्तित्वच संपल्याची खात्री आता जनतेला पटू लागली आहे, अशी कुजबूजच नाक्यानाक्यांवरील चर्चांमधून कानावर पडू लागली आहे.
मागील महापालिका निवडणुकीत एकही नगरसेवक वंचित बहुजन विकास आघाडीचा निवडून आलेला नाही, तसेच दुसऱ्या क्रमांकावरही वंचितचा एकही उमेदवार नाही. त्यामुळे ज्या पक्षांची ताकदच मुंबई आणि महाराष्ट्रात नाही त्या पक्षापुढे बाळासाहेबांच्या पुत्राने झुकावे हे योग्य वाटत नाही, अशाप्रकारची प्रतिक्रियाही जनतेकडून व्यक्त होत आहेत.
(हेही वाचा – आता उद्धव ठाकरे कुणाचीही पक्षातून हकालपट्टी करू शकणार नाही)
Join Our WhatsApp Community