मुंबईकरांनो! महापालिका बांधतेय झाडावर घर…

मलबार हिल येथील कमला नेहरू पार्कच्या धर्तीवर आता वांद्रे पश्चिम बॅंन्ड स्टॅंडजवळ ट्री हाऊस बांधण्यात येणार आहे. वांद्रे किल्ल्याजवळील महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाच्या मालकीच्या बागेत ट्री हाऊस बांधणार आहे. या प्रस्तावाला जिल्हा नियोजन व विकास समितीने नुकतीच मंजुरी दिली. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून आणि जिल्हा नियोजन निधीतून एक कोटी रुपये खर्च करून हा प्रकल्प राबवला जात आहे.

नाविन्यपूर्ण प्रकल्पांना मंजुरी

मुंबई उपनगराच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी म्हणाल्या, डीपीडीसीने (DPDC) मुंबई उपनगरीय जिल्ह्यातील जीवनमान आणि सौंदर्याचा दर्जा सुधारण्यासाठी ट्री हाऊससह काही नाविन्यपूर्ण प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. वांद्रे परिसरात उभारल्या जाणार्‍या या प्रोजेक्टला मिळणार्‍या प्रतिसादाला पाहून इतर ठिकाणी अशाच प्रकारे ट्री हाऊस उभारले जाऊ शकतात, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

( हेही वाचा : बेस्ट अ‍ॅप : मराठीचा आग्रह, ‘चलो’ नको ‘चला’च…! )

महापालिकेचे सहायक आयुक्त किरण दिघावकर यांनी दिलेल्या माहितीनुसार हा प्रकल्प वांद्रे किल्ल्याजवळील महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाच्या अखत्यारित असून त्यांच्याकडून नो ऑन्ब्जेक्शन सर्टिफिकेट्स घेतली जातील. या ट्री हाऊसचे बांधकाम लाकडाचा वापर करून केले जाणार आहे. यात सिमेंटचा वापर कमी प्रमाणात केला जाणार आहे.

अरबी समुद्राचा आनंद

या ट्री हाऊसमधून आपल्याला अरबी समुद्र व परिसरातील निसर्गाचा आनंद घेता येणार आहे. ट्री हाऊस ही संकल्पना मुख्यत: उत्तर भारतात प्रचलित आहे. एका उंच झाडावर जमिनीपासून ५० ते ६० फूट उंचावर ट्री हाऊस बांधले जाते. बॅंन्डस्टॅंड समुद्रावर पर्यटक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात यातच ट्री हाऊस या नाविन्यपूर्ण प्रकल्पामुळे पर्यटक आकर्षित होतील असा विश्वास पालिकेला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here