अन्न व औषध प्रशासनाने चेंबूर येथील दुग्धजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या डेअरी पंजाब या दुकानावर पोलिसांच्या मदतीने कारवाई केली आहे. या दुकानात भेसळयुक्त पनीर असल्याची माहिती पोलिसांनी अन्न व औषध प्रशासनाला दिली होती. या कारवाईत डेअरी पंजाब तसेच या दुकानात पनीरचा पुरवठा करणाऱ्या दोन विक्रेत्या दुकानदारांवरही अन्न व औषध प्रशानाने कारवाईचा बडगा उगारला आहे. तिघांवरही किमान ७ वर्षांचा तुरुंगवास तसेच १० लाखार्यंतचा दंड ठोठावला जाऊ शकतो.
( हेही वाचा : पंजाब सरकारचे योगींच्या पावलावर पाऊल)
भेसळयुक्त पनीर
ही धडक कारवाई ६ मे रोजी शुक्रवारी केली गेली. अन्न व औषध प्रशासनासह चेंबूर पोलीसही हजर होते. डेअरी पंजाबमधून किमान १९ किलोचे पनीर अन्न व औषध प्रशासनाने जप्त केले. यावेळी दुकानासमोर भिवंडी आणि बदलापूरहून पनीरचा पुरवठा करणारे दोन वाहनेही उभी होती. दोन्ही वाहनांतून प्रत्येकी २७० किलो आणि १८५ किलो पनीर अन्न व औषध प्रशासनाने जप्त केले. तिन्ही ठिकाणांहून जप्त केलेल्या पनीरपैकी काही पनीरचे नमुने प्रयोगशाळांमध्ये तपासणीसाठी पाठवले गेले. प्रयोगशाळा अहवालातून पनीरचा दर्जा मानांकनानुसार नसल्याचे स्पष्ट झाले. या अहवालाच्या आधारावर अन्न व औषध प्रशासनाने डेअरी पंजाब तसेच भिवंडीतील दिशा डेअरी आणि बदलापूर येथील यशोदा ऑर्गेनिक्स या दोघांविरोधातही चेंबूर पोलिस ठाण्यात फिर्याद नोंदवली.
Join Our WhatsApp Community