प्रसारमाध्यमांच्या ‘न्यूड’ बातम्या, लोकशाहीचा चौथा स्तंभ घसरलाय

74

तुमचं लक्ष ‘नको तिकडे’ असेल आणि जिथे लक्ष असायला हवं तिथे तुम्ही डोळे मिटून केवळ पाहण्याचा अभिनय करत असाल तर सगळंच कठीण होऊन बसेल. सध्या प्रसारमाध्यमांची हीच अवस्था झालेली आहे.

( हेही वाचा : मुंबईत मुसळधार पाऊस; पाणी साचल्याने अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद)

लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखल्या जाणार्‍या या घटकाची विश्वासार्हता लयाला गेली आहे. सूत्रांच्या नावावर न घडलेल्या बातम्या दाखवण्याचा घाट तर घातलाच आहे. परंतु पेज ३ च्या नावावर अश्लीलतेचा बाजार मांडायला सुरुवात केली आहे. सध्या बातम्या कशा असतात? अमुक अमुक हिरोईनचे उप्स मूमेंट. उप्स मूमेंट म्हणजे एखाद्या नटीचा ड्रेस निघणे इ. आता लहान मुले देखील मोबाईल वापरु लागले आहेत. त्यांना अशा बातम्या दाखवायच्या का?

एखाद्या मॉडेलने आत काय घातले आहे याच्याशी वाचकांना काय देणे-घेणे असावे? या मॉडेलचा समुद्रकिनारी बिकिनी वरील फोटो. या अशा बातम्या देऊन पैसे कमावता येतील पण विश्वासार्हता कशी मिळवणार? मूळात मेन स्ट्रीम मीडियाच्या वेब पोर्टल्सना असल्या बातम्यांची गरज का पडत असावी? त्यांच्याकडे बातम्या मिळवण्याची तर अनेक साधने आहेत. आता तर सूत्र तुरुंगातील बातम्या देखील देऊ लागले आहेत.

आपल्या देशाला स्वतंत्र होऊन ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. या परिस्थितीत आपण अधिक प्रगल्भ होणे अपेक्षित आहे. पण प्रसारमाध्यमांची पातळी दिवसेंदिवस खालावत चाललेली आहे. या अशा ‘न्यूड’ बातम्यांमुळे लोक वैतागत आहेत. केवळ क्लिक्स मिळवण्यासाठी अश्लील बातम्या देऊन आपण एक पिढी बरबाद करत आहोत याची जाणीव देखील यांना नाही. उलट इतकं सशक्त माध्यम हातात असताना तुम्ही जग बदलू शकता, जगाला सकारात्मक दिशेने घेऊन जाऊ शकता.

दर्पण हे मराठीतील पहिले वर्तमानपत्र होते आणि बाळशास्त्री जांभेकर हे मराठीतील आद्य पत्रकार आहेत. आपण नेमका कोणाचा वारसा चालवत आहोत, याचा देखील या प्रसारमाध्यमांना विसर पडलेला आहे. एक दिवस लोकांना तुमचा विसर पडेल.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.