मुलुंड येथील घटनेमुळे समाजसेवा शाखेची अडचण वाढण्याची शक्यता 

समाज सेवा शाखा आणि पोलीस ठाण्याचे वैर काही नवीन नाही. ज्यावेळी समाजसेवा शाखा एखाद्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत जाऊन बेकायदेशीर धंद्यावर कारवाई करते. अशा वेळी स्थानिक पोलीस ठाण्याची भूमिका संशयास्पद असते. त्याचा परिणाम स्थानिक पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकाला भोगावा लागतो. त्यामुळे समाज सेवा शाखा विरुद्ध पोलीस ठाणे यांच्यात शीतयुद्ध सुरू असते. गुरुवारी समाजसेवा शाखा मुलुंड येथील एका कारवाईत अडचणीत आली आहे, याच्यावर स्थानिक पोलीस ठाण्याची भूमिका काय असणार आहे हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.

त्यानंतरच पुढील तपास केला जाणार

मुलुंड पश्चिमेतील संगम व्हिडीओ पार्लरवर गुरुवारी मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेकडून छापेमारी सुरू असताना दिलीप शेजपाल (५०) या ग्राहकांचा संशयास्पद मृत्यू झाला. मुलुंड पोलिसांनी हा मृतदेह जे. जे. रुग्णालय या ठिकाणी शवविच्छेदनासाठी पाठवून प्राथमिक तपासवरून अपमृत्यूची नोंद केली आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिलीप शेजपाल या ग्राहकांचा मृत्यू हृदयविकारच्या धक्क्यामुळे झाला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे. शवविच्छेदन अहवालानंतरच, मृत्यूचे नेमके कारण कळू शकेल आणि त्यानंतर पुढील तपास करता येईल, असे पोलीस सूत्रांचे म्हणणे आहे.

…म्हणून ही परिस्थिती उद्भवू शकते

समाज सेवा शाखेने अचानक टाकलेल्या धाडीनंतर दिलीप शेजवाल यांना धक्का बसला असावा, त्यात त्यांच्या छातीत अचानक कळ मारून आली आणि रुग्णालयात आणल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले, असे पोलीस सूत्रांकडून  सांगण्यात आले. अचानक उदभवलेल्या या परिस्थितीमुळे हृदय विकारचा झटका येऊ शकतो आणि वेळीच उपचार न मिळाल्यामुळे ही परिस्थिती उदभवू शकते असे जाणकारांचे म्हणणे आहे.

समाजसेवा शाखेचे अधिकारी येऊ शकतात अडचणीत

मुलुंड येथे घडलेल्या या घटनेनंतर मृत इसमाच्या कुटुंबीयांनी तक्रार दाखल केल्यास समाजसेवा शाखेचे अधिकारी अडचणीत येऊ शकतात, असे एका पोलीस अधिका-याने नाव न घेण्याच्या अटीवर सांगितले. मात्र अद्याप मुलुंड येथील घटनेत मृत व्यक्तीच्या कुटुंबियांनी कुठलीही तक्रार नसल्याचे अधिका-यांचे म्हणणे आहे. मात्र जे. जे. रुग्णालयातून शवविच्छेदन अहवालानंतर तपासाची दिशा काय असणार आहे?  हे सांगता येईल असे अधिकारी यांचे म्हणणे आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here