रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना अटक होणार ?

युक्रेन युद्धाप्रकरणी आंतरराष्ट्रीय क्रिमिनल कोर्टाने (आयसीसी) रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी केले आहे. यावर प्रतिक्रिया देताना युक्रेनचे राष्ट्रपती झेलेंस्की यांनी ‘ही तर फक्त सुरुवात आहे’, असे म्हटले आहे. दरम्यान ‘रशिया इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्टचा सदस्य नाही. त्यामुळे कायदेशीररीत्या कोर्टाचा निर्णय आम्हाला लागू होत नाही. आम्ही कोर्टाला कोणतेही सहकार्य करणार नाही. हा निर्णय अवैध असून आम्हाला अमान्य आहे’, अशा शब्दात रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मारिया झाखारोवा यांनी भूमिका स्पष्ट केली.

काय आहे वाॅरंटचे कारण

व्लादिमीर पुतीन यांच्या आदेशाने २४ फेब्रुवारी २०२२ रोजी रशियाने युक्रेनविरुद्ध लष्करी कारवाई सुरू केली होती. त्यावेळी युक्रेन रशियासमोर शरणागती पत्करेल असे अनेकांना वाटले होते. मात्र, रशियाला जे अपेक्षित होते तसे घडलेले नाही. युक्रेन मोठ्या जिद्दीने आणि ताकदीने रशियन आक्रमणाला प्रत्युत्तर देत आहे. युद्धाच्या काळात वर्षभरात जबरदस्तीने बालकांसह नागरिकांचे युक्रेनमधून रशियाला स्थलांतर केल्याचा ठपका पुतीन यांच्यावर ठेवण्यात आला आहे. रशियाच्या इतर अधिकाऱ्यांना देखील वॉरंट जारी करण्यात आले आहे.

युक्रेनचे राष्ट्रपती झेलेंस्की म्हणाले की, रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी करण्याचा आंतरराष्ट्रीय क्रिमिनल कोर्टाचा निर्णय हा रशियाने केलेल्या आक्रमणाविरोधात न्याय पुनर्संचयित करण्याच्या दिशेने टाकलेले पाऊल आहे.

पुतिन यांचे पतन आणि रशियाची वाताहत होण्याची शक्यता अनेक आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. रशियाचे माजी डिप्लोमेट बोरिस बोन्डारेव म्हणाले की, जर पुतिन हे युद्ध स्वतःच्या अटींवर जिंकण्यात यशस्वी झाले नाहीत, तर त्यांना पायउतार होण्यास भाग पाडले जाऊ शकते. गेल्या वर्षी युक्रेनवर रशियाने हल्ला केला होता. त्यानंतर बोन्डारेव यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. बोन्डारेव हे जिनेव्हामध्ये रशियाचे आर्म्स कंट्रोल एक्सपर्ट म्हणून काम पाहत होते.

( हेही वाचा: लालबाग हत्याकांड- वीणा जैनच्या मृत्यूचे गूढ वाढले; हत्या की अपघात शवविच्छेदन अहवालात होईल स्पष्ट )

चीनकडून मध्यस्थी सुरू

युक्रेन आणि रशिया यांच्यातील वादामध्ये आता चीन मध्यस्थी करत आहे. नुकतेच चीनने इराण आणि सौदी अरब यांच्यातील वाद संपवला होता. आता चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी युक्रेन आणि रशिया यांच्यातील वाद मिटवण्यासाठी मध्यस्थी केली होती. गेल्या वर्षीपासून चीन दोन्ही देशांचा वाद मिटवण्यासाठी प्रयत्न करत आहे. येत्या सोमवारी जिनपिंग दोन दिवसांच्या रशिया दौऱ्यावर जाणार आहेत. यावेळी ते काय चर्चा करणार याकडे लक्ष लागले आहे. रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध संपावे, याकडे सर्व जगाचे लक्ष लागले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here