फ्रान्सच्या सहकार्याने होत असलेला जैतापूर येथील अणुऊर्जा प्रकल्प हा जगातील सर्वात मोठा अणुऊर्जा निर्मिती प्रकल्प असून या प्रकल्पामुळे भारतीय व फ्रेंच उद्योगांमधील सहकार्य अधिक वाढेल असे प्रतिपादन फ्रान्सचे मुंबईतील नवनियुक्त वाणिज्यदूत जॉन मार्क सेर शॉर्ले यांनी येथे केले.
२०२२ मध्ये ‘बॉनजो इंडिया’ आणि ‘नमस्ते फ्रान्स’ होणार
शॉर्ले यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची सोमवारी (दि. २०) राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते. फ्रान्स सन २०२२ साली भारतात आपला सांस्कृतिक महोत्सव ‘बॉनजो इंडिया’ आयोजित करणार असून त्यानंतर भारत देखील फ्रान्समध्ये ‘नमस्ते फ्रान्स’ या भारताच्या सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करणार असल्याचे त्यांनी सांगितले. कोरोना काळात भारतातील फ्रेंच कंपन्यांनी एकही कामगार कपात केली नाही असे वाणिज्यदूतांनी राज्यपालांना सांगितले.
(हेही वाचा- “खर्या गुन्हेगारांचा शोध घ्यायचा असेल तर प्रकरण सीबीआयला सोपवा”)
फ्रान्सच्या विद्यापीठांना सहकार्याचे आवाहन
राफेल सहकार्यामुळे भारत – फ्रान्स संबंध अधिक मजबूत झाले असून, फ्रेंच कंपनी दासाऊँ एव्हिएशनच्या सहकार्याने नागपूर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत व्यवसाय प्रशिक्षण देण्याचे कार्य सुरू असल्याचे राज्यपालांनी यावेळी सांगितले. राज्यातील २२ सार्वजनिक विद्यापीठांचे कुलपती या नात्याने फ्रान्समधील विद्यापीठांनी राज्यातील विद्यापीठांशी सहकार्य करण्यास प्रस्ताव केल्यास आपण त्याचे स्वागत करू, असे राज्यपालांनी वाणिज्यदूतांना सांगितले.