आयुक्तांनी अडवून ठेवलेल्या ज्यूट पिशव्यांची गाठ सुटली!

आयुक्त विरुध्द समिती अध्यक्ष यांच्यामध्ये निर्माण झालेल्या वादामध्ये अखेर आयुक्तांना एक पाऊल मागे जावे लागले आणि यशवंत जाधव यांनी पुन्हा एकदा आयुक्तांना नमते घेण्यास भाग पाडले.

महापालिका आयुक्तांनी ज्यूट पिशव्यांचा प्रस्ताव अडवून ठेवल्यामुळे स्थायी समिती अध्यक्ष आणि आयुक्तांमध्ये वाद सुरू असतानाच हा प्रस्ताव अखेर स्थायी समितीने मंजूर केला. आयुक्तांनी अखेर हा प्रस्ताव समितीपुढे पाठवला आणि तो मंजूरही झाला. त्यामुळे स्थायी समिती अध्यक्षांनी हा प्रस्ताव आणायला भाग पाडून प्रशासनावर आपला अंकुश असल्याचे दाखवून दिले. मात्र, सत्ताधारी पक्षाच्या दबावापुढे आयुक्तांना अखेर झुकावेच लागले असल्याचे यावरुन स्पष्ट दिसून आले आहे.

स्थायी समिती अध्यक्षांनीही थोपटले दंड

मुंबई महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षांसह अनेक नगरसेवकांनी आपल्या विभागांमध्ये ज्यूट पिशव्यांचे वाटप करण्यासाठी निधीची तरतूद केली होती. यातील काही नगरसेवकांचा निधी खर्च झाला तर काही नगरसेवकांनी हा निधी खर्च करण्याची शेवटची तारीख जवळ आल्याने त्यासाठीची निविदा प्रक्रिया पूर्ण केली. पण त्यानंतर आयुक्तांच्या मंजुरीसाठी आलेले प्रस्ताव आयुक्तांनी अडवून ठेवले. यामध्ये स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या प्रभाग क्रमांक २०९ मधील ज्यूट पिशव्यांचाही प्रस्ताव होता. हा प्रस्ताव अडवून ठेवल्याने यशवंत जाधव यांनी आयुक्तांविरोधात दंड थोपटले होते. स्थायी समितीच्या सभागृहात सभागृहनेत्या विशाखा राऊत यांनीही ज्यूट पिशव्यांचे प्रस्ताव आयुक्तांनी अडवून ठेवल्याने नाराजी व्यक्त केली होती.

(हेही वाचाः काँग्रेस वाढवण्यासाठी भाईगिरी: विरोधी पक्षनेत्यांना संसदीय कामकाजांकडे लक्ष देण्याचे निर्देश!)

आयुक्त एक पाऊल मागे

त्यानंतर अवघ्या तिसऱ्या आठवड्यातच दाबून ठेवलेल्या या प्रस्तावाची गाठ आयुक्तांना सैल करुन महापालिका चिटणीस विभागाच्या माध्यमातून स्थायी समितीच्या पटलावर ठेवावा लागला. मागील स्थायी समितीत हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. १ कोटी ३६ लाख १६ हजार ८७० रुपयांच्या ज्यूट पिशव्या खरेदी केल्या जाणार आहेत. या ज्यूट पिशव्या १६ इंच बाय १२ इंच लांबी व रुंदीच्या आहेत. भाजपचे नगरसेवक विनोद मिश्रा यांनी प्रभाग क्रमांक २०९ मध्ये स्थानिक नगरसेवक व स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी जास्त निधी खर्च करत असल्याने याबाबत आक्षेप नोंदवत, असमान निधी वाटपाबाबत आयुक्तांसह सर्व ठिकाणी तक्रार केली होती. त्यानंतर आयुक्तांनी समिती अध्यक्षांच्या विभागातील विकासकामांच्या प्रस्तावाला मंजुरी देताना ज्यूट पिशव्यांचा प्रस्ताव अडवून ठेवला होता. त्यामुळे आयुक्त विरुध्द समिती अध्यक्ष यांच्यामध्ये निर्माण झालेल्या वादामध्ये अखेर आयुक्तांना एक पाऊल मागे जावे लागले आणि यशवंत जाधव यांनी पुन्हा एकदा आयुक्तांना नमते घेण्यास भाग पाडले.

(हेही वाचाः सुधीर भाऊंच्या ट्वीटने राजकारणात आला वेगळाच ‘ट्विस्ट’! म्हणाले…)

दुस-यांदा नामोहरम

यापूर्वी नगरसेवक निधीतील सर्व शिल्लक ३९० कोटी रुपयांची रक्कम आयुक्तांनी रोखून धरली होती. पम सभागृहाने एकदा मंजूर करुन दिलेल्या नगरसेवक निधीत कपात करण्याचा अधिकार आयुक्तांना नाही, याबाबत अधिकाराची जाणीव आयुक्तांना करुन दिल्यानंतर इक्बालसिंह चहल यांना ३९० कोटी रुपयांचा निधी वापरण्यासाठी खुला करावा लागला होता. त्यामुळे आयुक्तांना दुसऱ्यांदा सत्ताधारी पक्षापुढे नामोहरम व्हावे लागल्याचे यावरुन दिसून आले आहे.

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here