श्वान पथकातील ‘लॅब्रोडोर’ ची जागा घेतली ‘या’ श्वानाने

192

मुंबई पोलिस दलाच्या श्वान पथकात जंजीर, प्रिन्स, मॅक्स या श्वानांनी एकेकाळी महत्वाची कामगिरी बजावली आहे. मुंबईतील स्फोटकांचा शोध घेण्यापासून ते गुन्हेगारांचा माग काढण्यापर्यंत या श्वानांनी महत्वाची जवाबदारी पार पाडली आहे. मुंबई पोलिस दलात लेब्रॉडॉर जातीच्या श्वानांनी १९९० पासून ३ दशके चांगलेच गाजवले आहे. मात्र आता लेब्रॉडॉर यांची जागा बेल्जियम मॅलिनॉइस प्रजातीच्या श्वानांनी घेतली आहे. पोलिस दलात लेब्रॉडॉर, डॉबरमन सह बेल्जियम मॅलिनॉइस प्रजातीच्या श्वानांना अधिक पसंती दिली जात आहे. बेल्जियम मॅलिनॉइस या श्वानांची एखाद्या गोष्टीचा माग काढण्याची क्षमता तसेच हुंगण्याची क्षमता अधिक असल्यामुळे या श्वानांना पहिली पसंती दिली जात आहे. दहिसर येथे नुकताच उघडकीस आलेलया बँक दरोड्याच्या आरोपीचा माग काढण्यासाठी बेल्जियम मॅलिनॉइस प्रजातीच्या जेसीने महत्वाची कामगिरी बजावली.

जेसीमुळे मुंबई पोलिसांची शान वाढली 

मुंबईतील दहिसर पश्चिमेत नुकताच झालेल्या बँकेत दरोड्यातील आरोपीचा माग घेण्यासाठी बेल्जियम मॅलिनॉइस जातीच्या जेसी या श्वानाने महत्वाची जबाबदारी पार पाडली होती. काही तासातच जेसीने पोलिसांना आरोपींच्या घरापर्यंत पोहोचवले आणि मुंबई पोलिस दलाची लाज राखली होती. जेसीमुळे मुंबई पोलिसांच्या श्वान पथकात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला. जेसीने काही महिन्यापूर्वी धारावीतील एका खुनातील आरोपीचा शोध घेण्यात पोलिसांना मदत केली होती. बेल्जियन मॅलिनॉइस जातीच्या श्वानांची हुंगण्याची शक्ती जास्त असते, या श्वानाचा वापर एनएसजी (राष्ट्रीय सुरक्षा गार्ड) तसेच नक्षलीभाग, विमानतळ, अमली पदार्थ विरोधी पथके या ठिकाणी केली जाते. बेल्जियन मॅलिनॉइस या प्रजातीच्या श्वानांना सुरक्षा दलात सर्वात अधिक मागणी असून मुंबई पोलिस दलात या प्रजातीच्या श्वानांना प्राधान्य देण्यात येत आहे. मुंबई पोलिस दलात सध्या ६ बेल्जियन मॅलिनॉइस प्रजातीचे श्वान आहेत, त्यापैकी ३ गुन्हे शाखा आणि ३ सुरक्षा तपासणीसाठी गोरेगाव श्वान पथकाकडे आहेत.

(हेही वाचा बायोमेट्रीक हजेरीला तात्पुरती स्थगिती!)

मुंबई पोलिस दलात प्रथमच डॉबरमन जातीच्या श्वानाची भरती

मुंबई पोलिस दलात तीन वेगवेगळी श्वान पथके आहेत. गुन्हे शाखेसाठी एक स्वतंत्र श्वान पथक असून व्हीआयपी दौरे, सभा यासाठी गोरेगाव येथे स्वतंत्र श्वानपथक आहे. तसेच दहशतवादी हल्ले, बॉम्बस्फोट यासाठी प्रशिक्षित केलेले बॉम्बशोधक आणि नाशक पथक आहेत त्यात देखील श्वान पथके आहेत. गुन्हे शाखेत गुन्ह्यांची उकल करण्यासाठी आवश्यक असलेल्या या श्वान पथकामध्ये तीन श्वान असून सहा ‘डॉग हँडलर्स’ आहेत. मुंबई पोलिस श्वान पथक व्हीआयपी दौरे, सभा बंदोबस्तसाठी काम करणाऱ्या या श्वान पथकात १२ श्वान आणि २४ ‘डॉग हँडलर्स’ना मंजुरी आहे. १९५९ या साली मुंबई पोलिस दलात प्रथमच डॉबरमन जातीचे तीन श्वानाही भरती करण्यात आली होती. राजा, बिंदू आणि कुमार असे या श्वानांची नावे होती. हे तिन्ही श्वान मुंबई पोलिस दलाला डॉबरमन पिनसार क्लब ऑफ इंडिया यांच्यावतीने एका महाराजाच्या हस्ते देण्यात आले होते.

लॅब्रॉडॉर प्रजातीचा जंजीर आणि प्रिन्स

९० च्या दशकात मुंबई पोलिसांच्या ताफ्यात असलेल्या श्वान पथकातील ‘जंजीर’ हा प्रत्येकाला आठवत असेल. ‘लॅब्रोडोर जातीचा असलेल्या जंजीरने नव्वदीचा काळ चांगलाच गाजवला होता. ९३च्या साखळी बॉम्बस्फोटात जंजीरने कौतुकास्पद कामगिरी केली होती, मुंबईत पेरण्यात आलेले स्फोटके शोधून अनेकाचे त्याने प्राण वाचवले होते. प्रिन्स दहा वर्षांच्या श्वानाने २६/११च्या दहशतवादी हल्ल्यात ट्रायडंट आणि ताज बाहेरील जिवंत बॉम्ब शोधून काढले होते. त्यानंतर तीन दिवसांनी त्याने छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या पार्सल रूममधील जिवंत बॉम्ब शोधून शेकडो जणांचे प्राण वाचवले. प्रिन्स २०१४ साली निवृत्त झाला, त्यानंतर काही महिन्यांनी त्याला हृदय आणि किडनीचा विकार जडला आणि परळच्या प्राणी रुग्णालयात उपचार घेत असताना त्याचा मृत्यू झाला. प्रिन्स इतकीच मॅक्स या श्वानाने देखील २६/११ च्या हल्ल्याच्या वेळी महत्वाची भूमिका निभावली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.