कांदिवलीतील ठाकूर व्हिलेजमधील गगनचुंबी उंच इमारतींना आता मुंबईकर बिबट्याची भीती सतावू लागली आहे. या भागांतील वाढत्या बिबट्याचा वावरासह इमारतींचे नाव समाज माध्यमांवर पसरले की, फ्लॅटच्या किंमती घसरतील, अशी भीती स्थानिकांना सतावू लागली आहे. १५ डिसेंबर आणि १६ डिसेंबर रोजी कांदिवली पश्चिमेलगतच्या ठाकूर संकुलातील धीरज सवेरा आणि एकता मिडास या इमारतीतील मध्यरात्री बिबट्याचा वावर दिसून आला.
असा घडला प्रकार
१५ डिसेंबरला धीरज सवेरा येथे मध्यरात्री एका महिलेला बिबट्या कुत्र्याला घेऊन जाताना दिसला. बिल्डिंगमधील सीसीटीव्ही फुटेजमध्ये बिबट्या आल्याचे सिद्ध झाले. या कुत्र्याचा मृतदेह बिल्डिंगच्याच आवारानजीकच्या भागांत दुस-या दिवशी आढळून आला. कदाचित कुत्रा मोठा असल्याने त्याला उचलून नेणे बिबट्याला शक्य झाले नसावे, अशी माहिती माहितगारांनी दिली. दुस-या दिवशी पुन्हा कुत्र्याला नेण्यासाठी एकता मिडास या इमारतीत बिबट्याने पुन्हा कुत्र्याला भक्ष्य केले. अखेर दोन्ही इमारत प्रशासनाकडून वनविभागाला तक्रार करण्यात आली. आठवडा अखेर वनविभागाने या विभागांत बिबट्याचा वावर असलेल्या क्षेत्रात जनजागृती मोहिम घेत, नजीकच संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा परिसर असल्याने बिबट्याचा वावर या भागांत वाढल्यास कुत्र्यांना आवरा, असे आवाहन केले. नजीकच्या इमारतींमधील तब्बल १८ कुत्रे गेल्या काही महिन्यांत बिबट्याने फस्त केल्याची माहिती स्थानिकांनी दिली.
बिबट्याचा वावर वाढण्याची कारणे
कुत्रा हे बिबट्याचे आवडते व सहज उपलब्ध होणारे खाद्य असते. त्यामुळे जंगलानजीकच्या भागांत बिबट्याचा वावर वाढण्यामागे कुत्र्यांची वाढती संख्या हे प्रमुख कारण दिसून येते. या भागांत कॅमेरा ट्रेप लावले असून, बिबट्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवत आहोत. शिवाय वनविभागाची टीम रात्रीच्यावेळी संवेदनशील भागांत गस्तही घालणार आहे. मात्र कुत्र्यांना रात्रीच्यावेळी इमारतीतील रहिवाशांनी तसेच प्राणीप्रेमींनी खायला घालू नका. बिबट्याचा वावर सुरु होण्यापूर्वी एका विशिष्ट जागेवरच वेळा ठरवून भटक्या कुत्र्यांना खायला घाला, असे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील बचाव पथकाचे प्रमुख, व्याघ्र व सिंह सफारी आणि वनक्षेत्रपाल विजय बारब्धे यांनी सांगितले.
वाइल्ड वल्ड वेल्फेअर फाऊंडेशनच्या मिता मालवणकर यांनी असे सांगितले की, आम्ही काही वन्यजीवांचा बचाव करायला गेलो असता ही माहिती समाजमाध्यमांवर टाकू नका, याकरिता इमारतीतील माणसे वाद घालतात. ही माहिती बाहेर पडल्यास इमारतीच्या किंमती घसरतील, अशी भीती संबंधितांना आहे.
कांदिवली ठाकूर व्हिलेजमधील इमारती
- धीरज उपवन,
- धीरज सवेरा,
- एकता मिडोस,
- रहेजा युनिव्हर्सल,
- न्यू रहेजा संकुल,
- गुंडेजा