विरारच्या कोपर गावात आलेल्या जखमी बिबट्याला मंगळवारी सकाळी साडेपाचच्या सुमारास जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले. या बिबट्याला तातडीने उपचारांसाठी बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात हलवण्यात आले.
बिबट्याला पकडण्यासाठी सोमवारी ठाणे प्रादेशिक वनविभागाचे स्थानिक वनाधिकारी आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे वन्यप्राणी बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले होते. बिबट्याच्या वाटेवरच तीन पिंजरे लावण्यात आल्याची माहिती सहाय्यक वनसंरक्षक मधुमिता एस यांनी दिली. सकाळी बिबट्या अडकल्याचे समजताच वनविभागाने तातडीने बिबट्याला संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात हलवले. या कामात स्प्रेडिंग अवेअरनेस ऑन रेपटाईल्स एन्ड रिहेबिलीटेशन प्रोग्राम ( सार्प इंडिया ) या वन्यप्राणी संस्थेने वनविभागाला सहकार्य केले.
( हेही वाचा : १ एप्रिलपासून एसटी पूर्ण क्षमतेने धावणार )
उपचारासाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात
हा नर बिबट्या चार ते पाच वर्षांचा असल्याची माहिती संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे वन्यप्राणी बचाव पथकाचे प्रमुख विजय बारबदे यांनी यांनी दिली. बिबट्याचा अगोदर एक्सरे तपासणी करण्यात आली. त्यानंतर सायंकाळी त्याच्या पायात अडकलेली तार शस्त्रक्रिया करून काढण्यात आल्याची माहिती उद्यानाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. शैलेश पेठे यांनी दिली. त्याची दोन नखे जखमेमुळे गळून पडली होती. त्याला उपचारासाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातच काही दिवस ठेवले जाईल.
Join Our WhatsApp Community