प्रयागराज येथील मशिदींवरील भोंगे सकाळपर्यंत बंद राहणार! पोलीस महानिरीक्षकांचा आदेश 

कर्नाटकात वक्फ बोर्डाने जरी पहाटे ५ वाजता मशिदींवरील लाऊडस्पीकरवरून अजान म्हणू नका असा आदेश एका दिवसात मागे घेतला असला, तरी प्रयागराज येथे मात्र खुद्द पोलीस महानिरीक्षकांनीच तेथील मशिदींवरील भोंगे रात्री १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत वाजवू नका, असा आदेश दिला आहे.

प्रयागराज येथील सिव्हिल लाईन या ठिकाणी राहणाऱ्या अलाहाबाद विद्यापीठाच्या कुलगुरू प्रा. संगीता श्रीवास्तव यांच्या तक्रारीची गंभीर दखल घेत पोलीस महानिरीक्षकांनी प्रयागराज या ठिकाणी रात्री १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत लाऊडस्पीकर न वाजवण्याचा आदेश दिला आहे. त्यामुळे आता या भागात पहाटेच्या वेळी मशिदींवरील भोंगे वाजणार नाहीत.

काय होते हे प्रकरण?

सिव्हिल लाईन येथे राहणाऱ्या कुलगुरू प्रा. संगीता श्रीवास्तव यांनी प्रयागराज जिल्हाधिकारी आणि पोलीस महानिरीक्षक यांना तक्रार केली होती. ज्या ठिकणी त्या राहतात, त्यांच्या शेजारीच मशीद आहे. दररोज पहाटे मशिदीतून अजान म्हटले जाते, त्यावेळी लाऊडस्पीकरमधून मोठा आवाज होतो आणि माझी झोप मोड होते, त्यामुळे ध्वनी प्रदूषण कायदा २००० अंतर्गत योग्य तो आदेश देण्यात यावा, अशी मागणी केली होती. त्यानंतर त्यावर बराच वाद झाला होता. कुलगुरू प्रा. संगीता श्रीवास्तव यांनी त्यांच्या तक्रारीत उच्च न्यायालयाने मशिदीवरील भोंग्याच्या संबंधी दिलेल्या आदेशाचाही दाखला दिला होता.

(हेही वाचा : कर्नाटकात पहाटेची अजान ऐकूच येणार नाही!)

पोलीस महानिरीक्षकांचा काय आहे आदेश? 

प्रा. संगीता श्रीवास्तव यांच्या तक्रारीची दखल घेत, प्रयागराज येथे रात्री १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत लाऊडस्पीकर लावण्यास बंदी करण्याचा आदेश दिला. तसेच प्रा. संगीता श्रीवास्तव या ज्या ठिकाणी राहतात, त्यांच्या दिशेने असलेल्या मशिदींवरील भोंग्यांची दिशाही बदलण्यात आली आहे. ध्वनी प्रदूषणासंबंधी उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाच्या आधारे हा आदेश पोलीस महानिरीक्षकांनी दिला आहे.

कर्नाटकात वक्फ बोर्डाने घेतला यु टर्न! 

कर्नाटकातील बंगळुरूमधील थनिसंद्रा या भागातील १६ मशिदींतील लाऊडस्पीकरमधून अजानचा आवाज मोठा येत असतो, त्यामुळे ध्वनी प्रदूषण होते. म्हणून याविरोधात कर्नाटक उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. या प्रकरणी न्यायालयाने राज्य शासन आणि प्रदूषण नियंत्रण बोर्डाला नोटीस बजावली. राज्य प्रदूषण मंडळाने कर्नाटक वक्फ बोर्डला नोटीस पाठवली. प्रदूषण मंडळाच्या नोटीसवरून वक्फ बोर्डाने मशिदींना नोटीस काढून नियमांचे पालन करण्याचा आदेश दिला. त्यामध्ये रात्री १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत मशिदींवरील लाऊडस्पीकरद्वारे अजान म्हटले जाऊ नये, असा तो आदेश होता. त्यानंतर मात्र दिवसभर यावर सोशल मीडियातून चर्चा झाली, त्यानंतर वक्फ बोर्डाने तात्काळ स्वतःचा आदेश मागे घेतला.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here