पावसाच्या गैरहजेरीत राज्यभरातील बहुतांश भागांत तापमानवाढ नियंत्रणात असताना एकट्या जळगावातील कमाल तापमानात भलतीच वाढ दिसून आली. सोमवारी जळगावातील कमाल तापमान थेट ३५.९ अंश सेल्सिअसवर पोहोचले. राज्यातील सर्वात जास्त कमाल तापमान सोमवारी जळगावात नोंदवले गेले. मात्र या तापमानवाढीबाबत शंका व्यक्त केली जात आहे.
तापमानवाढीचा नवा गोंधळ
नाशिक जिल्ह्यांत कमाल तापमान २६.४ तर औरंगाबाद जिल्ह्यात २५.५ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झालेली असताना एकट्या जळगावात कमाल तापमान थेट ३५.९ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले. जळगावात सायंकाळी साडेपाचपर्यंत पाऊस पडला नव्हता. नाशिक आणि औरंगाबाद येथे १ मिमी पावसाची नोंद झाली.
( हेही वाचा : मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये ८९ टक्के साठा : मुंबईसह अनेक गावांच्या चिंतेत भर)
संपूर्ण मध्य महाराष्ट्रातील कमाल तापमानाच्या नोंदीत गेल्या दहा वर्षांतील सरासरीच्या तुलनेत ०.२ ते १.४ अंश सेल्सिअसने तापमान वाढ दिसून आली आहे. केवळ जळगावातील तापमानावाढ ४.६ अंशाने जास्त दिसून आल्याचे वेधशाळेच्या नोंदीत आढळले. जळगावात किमान तापमान २४.६ अंश सेल्सिअस वर स्थिरावले आहे. किमान तापमानाच्या नोंदीत सरासरीतील वाढ दिसून आलेली नाही. कमाल आणि किमान तापमानात अकरा अंशाचा फरक आढळून आल्याने जळगावातील कमाल तापमानाबाबत शंका उपस्थित केली जात आहे.
Join Our WhatsApp Community