कोरोना काळात परिचारिकांनी ज्या पद्धतीने काम केले आहे ते म्हणजे खऱ्या देवदूताचे काम आहे. या देवदुतांच्या माध्यमातूनच आपण कोरोनाची लढाई जिंकणार असल्याचा विश्वास महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिला होता, असे मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रतिपादन केले.
( हेही वाचा : ‘बेस्ट’च्या एका आगारातील सर्व कर्मचाऱ्यांची केली बदली? काय आहे कारण… )
सर्वोत्तम सार्वजनिक आरोग्य परिचारिका व सहाय्यकारी परिचारिका यांना सन २०१७ व सन २०१८ चे महापौर पुरस्कार आणि महानगरपालिका आयुक्त पुरस्कार प्रदान करण्याचा समारंभ मुंबईच्या महापौर किशोरी किशोर पेडणेकर आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी यांच्या हस्ते मंगळवार, १५ फेब्रुवारी २०२२ रोजी दामोदर नाट्यगृह परळ, येथे पार पडला, त्यावेळी आयोजित कार्यक्रमात महापौर बोलत होत्या. मुंबई महानगरपालिका चांगली आरोग्य सेवा देणारी ही देशातील सर्वोत्तम महानगरपालिका आहे. परिचारिका या घरासोबतच आपल्या रुग्णांची सुद्धा तेवढ्याच तत्परतेने काळजी घेत असून रुग्णालयात माझा पेशंट व मी अशी भूमिका परिचारिकांची असते. कोरोना काळात परिचारिकांनी ज्या पद्धतीने काम केले त्याला तोड नसल्याचे सांगून परिचारिका पुरस्कारांची संख्या वाढविण्याचे निर्देश महापौरांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
परिचारिकांचा सन्मान
आज उपस्थित असलेल्या परिचारिकांचा सत्कार म्हणजे संपूर्ण परिचारिका वर्गाचा सत्कार असल्याचे खासदार अरविंद सावंत यांनी यावेळी सांगितले. तर अतिरिक्त महापालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी यांनी यावेळी मार्गदर्शन करताना म्हणाले की, कोरोनामुळे दोन वर्ष कार्यक्रम होऊ शकला नाही. सर्व परिचारिकांनी झोकून देऊन अत्यंत धीरोदत्तपणे काम केले आहे. कोविड रुग्णांना मानसिक आधार दिला. आपण सर्व परिचारिका फ्रन्टलाइन वर्कर म्हणून काम करीत असल्यामुळे कोरोनावर नियंत्रण मिळविणे शक्य झाले आहे. मुंबईच्या महापौर या खऱ्या अर्थाने मुंबई शहराच्या फ्लोरेंस नाइटिंगेल असून त्यांचे करावे तेवढे कौतुक कमी आहे. यापुढील काळातही आपण सर्व परिचारिकांनी अशाच पद्धतीने काम करावे अशा शुभेच्छा सुरेश काकाणी यांनी दिल्या.
सन २०१७ या वर्षाकरीता एकूण ३९ महापौर पुरस्कार आणि एकूण २८ महानगरपालिका आयुक्त पुरस्कार तर, सन २०१८ या वर्षाकरीता एकूण ४१ महापौर पुरस्कार व एकूण ३० महानगरपालिका आयुक्त पुरस्कार प्रदान करण्यात आले. कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी आपल्या प्रास्ताविकातून कार्यक्रमाची रूपरेषा मांडली. पुरस्कार प्राप्त परिचारिका यांना प्रमाणपत्र तसेच ट्रॉफी मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. या काळात काम करणारे आरोग्य विभागातील डॉक्टर, अधिकारी, कर्मचारी यांचा सुद्धा महापौरांच्या हस्ते यावेळी सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी खासदार अरविंद सावंत, सार्वजनिक आरोग्य समिती अध्यक्षा राजुल पटेल, माजी महापौर तथा नगरसेविका श्रद्धा जाधव, नगरसेविका सिंधुताई मसुरकर, मोरे, नगरसेवकसचिन पडवळ, नियाज अहमद सुफियान वनू, अतिरिक्त महापालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी, उपायुक्त (सार्वजनिक आरोग्य) संजय कुऱ्हाडे, कूपर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. शैलेश मोहिते, कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ.मंगला गोमारे उपस्थित होत्या.
( हेही वाचा : मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या घरात 25 लाखांचा झगमगाट! )
पुरस्कारांविषयी माहितीः-
बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे महापालिकेच्या रुग्णालयातील आणि प्रसुतिगृहातील कार्यक्षम तसेच कार्यतत्पर परिचारिकांना महापौरांच्या नावे दरवर्षी पुरस्कार व प्रशस्तीपत्र सन १९७३ पासून देण्यात येत आहेत. तसेच महानगरपालिका आयुक्त यांच्या नावे पुरस्कार सन – १९७४ पासून सुरु करण्यात आले आहेत.
कर्तव्याप्रती हेतू आणि समर्पण, सेवेप्रती नीतिमत्ता, कठीण परिस्थितीत कामकाज हाताळण्याची क्षमता, स्वभाव, शैक्षणिक गुणवत्ता, परिचर्या सेवेत केलेले अति उत्कृष्ट कार्य, नेतृत्त्व गुण, व्यवस्थित मांडणी करण्याची क्षमता आणि इतर वाखाणण्याजोगे कार्य या निकषांचा विचार करुन परिचारिकांची मुलाखतीमार्फत पुरस्कारासाठी निवड करण्यात येते. पुरस्कार विजेत्या प्रत्येक परिचारिकेला रोख रक्कम, प्रशस्तिपत्र व पदक देऊन सन्मानित करण्यात येते. सन २०१२ पासून पुरस्काराच्या रकमेत रुपये १०,०००/- वरुन रुपये १५,०००/- पर्यंत वाढ करण्यात आली. तसेच महापौर पुरस्कार संख्येत १८ वरुन २९ अशी वाढ करण्यात आली आहे.
Join Our WhatsApp Community