महापालिकेची पहिली सभा अत्यंत शिस्तबद्ध

कोविडनंतर मुंबई महापालिकेची पहिली प्रत्यक्ष सभा सोमवारी झाली. पहिली सभा शोक प्रस्तावाची असली तरी २० महिन्यांनंतर सभागृहात प्रत्यक्ष सभेत सहभागी होता येणार, असल्याने सर्वच पक्षाच्या नगरसेवकांनी हजेरी लावताना सोशल डिस्टन्सिंगचेही काटेकोरपणे पालन केले. मात्र, कोविड नियमांचे पालन करताना एकाही सदस्याने मास्क जराही हनुवटीवर येणार नाही याची काळजी घेत शिस्तीबध्द पध्दतीत सभागृहाच्या कामकाजात भाग घेतला.

शोक प्रस्ताव मांडण्यात आला

मुंबई महापालिकेची यापूर्वीची सभा मार्च महिन्यामध्ये पार पडली होती. परंतु त्यानंतर कोविड विषाणूच्या प्रार्दुभावामुळे महापालिकेच्या सभा ऑनलाईन पध्दतीने सुरु करण्यात आल्या होत्या. त्यानंतर तब्बल २० महिन्यांनी पहिली प्रत्यक्ष महापालिकेची सभा सोमवारी २२ नोव्हेंबर रोजी भरली. ही नोव्हेंबर महिन्याची पहिली सभा व कोविडनंतरची प्रत्यक्ष सभा होती. या पहिल्या सभेत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे निधन झाल्याने त्यांचा शोक प्रस्ताव मांडण्यात आला. सभागृहनेत्या विशाखा राऊत यांनी शोक प्रस्ताव मांडून प्रत्येक गटनेत्यांनी या प्रस्तावावरील चर्चेत भाग घेत त्यांना श्रध्दांजली वाहिली.

बाबासाहेबांचे कलादालन उभारण्यात यावे

भाजपचे महापालिका गटनेते प्रभाकर शिंदे यांनी यावेळी चर्चेत भाग घेताना बाबासाहेबांना खऱ्या अर्थाने श्रध्दांजली तेव्हाच ठरेल जेव्हा त्यांच्या नावाने संयुक्त महाराष्ट्र कलादालनातील पहिल्या मजल्यावर त्यांच्या नावाने कलादालन उभारले जाईल. त्यामुळे बाबासाहेब पुरंदरे यांनी संशोधन केलेले साहित्य हे भावी पिढीला उपलब्ध करून देण्यासाठी संयुक्त महाराष्ट्र कलादालनातील पहिल्या मजल्यावर कलादालन उभारण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली. यासाठी धोरणात्मक निर्णय घेतला जावा,अशी मागणी करत त्यांनी बाबासाहेबांना श्रध्दांजली वाहिली.

तब्बल वीस महिन्यांनी बसता आले सभागृहात 

कोविडनंतरच्या या पहिल्या महापालिका सभेमध्ये कोविड नियमांचे पालन व्हावे आणि प्रत्येक नगरसेवकाने सोशल डिस्टन्सिंग पाळावे यासाठी खुद्द सभागृहनेत्या विशाखा राऊत या लक्ष  ठेवून होत्या. प्रत्येक नगरसेवकांचे आसन निश्चित करून देत सोशल डिस्टन्सिंग राखताना प्रत्येकाने मास्क लावूनच कामकाजात सहभागी व्हावे याकडेही त्या जातीने लक्ष देत होत्या. या पहिल्या सभेत २२७ नगरसेवकांपैकी ६५ नगरसेवक गैरहजर होते. तब्बल २० महिन्यांनी ऐतिहासिक सभागृहात पुन्हा बसता आल्याचा भावही नगरसेवकांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळत होता.

 (हेही वाचा : कल्याण-डोंबिवलीत भाजपा पडणार गोंधळात, नगरसेवक ‘शिवबंधनात’ )

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here