मुलुंडमध्ये सर्वाधिक अतिधोकादायक इमारती

मुंबईतील अतिधोकादायक इमारतींची अंतिम यादी अखेर प्रसिध्द झाली असून त्यामध्ये एकूण अतिधोकादायक व मोडकळीस आलेल्या ३३७ इमारतींचा समावेश आहे. यामध्ये उपनगरांमध्येच तब्बल २६७ इमारतींचा समावेश आहे तर सर्वांधित जुन्या इमारती शहरांमध्ये असल्या तरी अतिधोकादायक इमारतींची संख्या ७०एवढी आहे. मुलुंडच्या टी विभागांमध्ये सर्वांधिक म्हणजे ४९ अतिधोकादायक व मोडकळीस आलेल्या इमारतींचा समावेश आहे.

( हेही वाचा : चेंबूर येथील सिद्धार्थ नगर वासियांवर वीज चोरीचे गुन्हे दाखल, ७०० विजेचे कनेक्शन तोडले )

मुंबईतील सी-१ श्रेणीतील अतिधोकादायक व मोडकळीस आलेल्या एकूण ३३७

इमारतींची यादी महानगरपालिकेने जाहीर केली असून ही यादी महानगरपालिकेचे संकेतस्थळ www.mcgm.gov.in यावर उपलब्ध आहे. या ३३७ इमारतींपैकी मुंबई शहर विभागात ७०, पूर्व उपनगरे विभागात १०४ तर पश्चिम उपनगरे विभागात १६३ इमारती यादीत समाविष्ट आहेत. धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतीत राहणाऱया नागरिकांनी खबरदारीचा उपाययोजना म्हणून त्वरित सुरक्षितस्थळी स्थलांतरित व्हावे, असे आवाहन महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल, अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. संजीव कुमार आणि उप आयुक्त (अतिक्रमण निर्मूलन) चंदा जाधव यांनी प्रशासनाच्या वतीने केले आहे.

या अतिधोकादायक व मोडकळीस आलेल्या इमारतीत राहणाऱ्या रहिवाशांनी नागरिकांनी त्वरित निवासस्थान रिक्त करावे, तातडीने सुरक्षितस्थळी स्थलांतरित व्हावे तसेच सदर इमारत स्वतःहून मालकांनी निष्कासित करावी, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे. बृहन्मुंबई क्षेत्रातील ज्या इमारती ३० वर्षांपेक्षा जास्त कालावधीकरीता वापरात आहेत, अशा इमारतींची महानगरपालिका प्रशासनाकडे नोंदणीकृत असलेल्या संरचनात्मक अभियंत्यांद्वारे परीक्षण करुन घेणे अनिवार्य आहे. ही यादी महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

अतिधोकादायक इमारतींबाबत अधिक माहितीसाठी

महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाच्या १९१६ / २२६९४७२५ / २२६९४७२७ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. कोणत्याही प्रकारची हानी टाळण्याच्या दृष्टीने जागरुक राहणे, ही नागरिकांची देखील जबाबदारी असून त्या कामी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.

मुंबई शहर विभाग : ७० इमारती

 • ए विभाग :४
 • बी विभाग: ४
 • सी विभाग :१
 • डी विभाग :४
 • ई विभाग :१२
 • एफ/दक्षिण विभाग: ५
 • एफ/उत्तर विभाग :२६
 • जी/दक्षिण विभाग :४
 • जी/उत्तर विभाग :१०

पश्चिम उपनगर : १६३इमारती

 • एच/पूर्व विभागात: ९
 • एच/पश्चिममध्ये :३०
 • के/पूर्व विभागात :२८
 • के/पश्चिम विभागात :४०
 • पी/दक्षिण विभागात :३
 • पी/उत्तर विभागात :१३
 • आर/दक्षिण विभागात: १०
 • आर/मध्य विभागात :२२
 • आर/उत्तर विभागात :०८

पूर्व उपनगर : १०४ इमारतीं

 • एम/पश्चिम विभागात: १६
 • एम/पूर्व विभागामध्ये: १
 • एल विभागात :१२
 • एन विभागात :२०
 • एस विभागात :०६
 • टी विभागात : ४९

अतिधोकादायक इमारतींची प्राथमिक लक्षणे अशाप्रकारची

 • – इमारतीच्या आर.सी.सी. फ्रेम कॉलम, स्लॅब इत्यादीच्या रचनेत कॉलम झुकल्यासारखे दिसणे.
 • – इमारतीचे बीम झुकल्यासारखे दिसणे आणि इमारतीचा स्लॅब झुकल्यासारखा आढळणे.
 • – इमारतीचा तळ मजल्याचा भाग खचल्यासारखा दिसणे.
 • – इमारतीच्या कॉलममधील भेगा वाढत असल्याचे दिसून येणे.
 • – इमारतीच्या कॉलममधील काँक्रिट पडत असल्याचे दिसणे.
 • – इमारतीच्या कॉलमचा भाग फुगल्यासारखे दिसणे.
 • – इमारतीचा आर.सी.सी. चेंबर्स (कॉलम, बीम) व विटांची भिंत यात सांधा / भेगा दिसणे.
 • – स्लॅबचे किंवा बीमचे तळ मजल्याचे काँक्रिट पडत असल्याचे दिसणे.
 • – इमारतीत काही विशिष्ट आवाज होणे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here