‘डेंजर मॅन’ सापडला इंदोरमध्ये; एटीएसने नोंदवला जबाब

‘डेंजर मॅन’ सरफराज मेमनच्या शोधात राज्य दहशतवाद विरोधी पथकाचे मुंबईतील युनिट मंगळवारी इंदोरला दाखल झाले आहे. एटीएसने सरफराज मेमन याच्याकडे चौकशी सुरू केली असून त्याचा जबाब नोंदवण्यात आला आहे. एटीएसकडून त्याचे मागील काही वर्षाचे लोकेशन तपासले जात असून अद्याप एटीएसला त्याच्या विरोधात कुठल्याही प्रकारचे पुरावे आढळून आलेले नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.
पाकिस्तान आणि चीनमध्ये प्रशिक्षण घेतलेला इंदूरचा सरफराज मेमन हा शहरात आला असून तो शहरासाठी धोकादायक ठरू शकतो, असा निनावी ईमेल एनआयएला रविवारी मिळाल्यानंतर एटीएस आणि इंदूर पोलिसांनी मेमनचा शोध सुरू केला होता. एनआयएने एटीएस आणि इतर यंत्रणांना सतर्क केले आणि शहर हाय अलर्टवर ठेवण्यात आले.
एजन्सीने दिलेल्या तपशिलांच्या आधारे इंदोर पोलिसांनी मंगळवारी मेमनच्या निवासस्थानावर छापा टाकला आणि त्याच्या वडिलांना चौकशीसाठी ताब्यात घेतले.  मेमन हा फातमा अपार्टमेंट, ग्रीन पार्क कॉलनी, चंदन नगर, इंदोर येथील रहिवासी आहे. महाराष्ट्राच्या दहशतवादविरोधी (एटीएस) एक पथक मंगळवारी इंदोरला दाखल झाले आणि सरफराज मेमनचा जबाब नोंदवण्यात आला आहे.
मेमन अनेक वर्षांपासून हाँगकाँगमध्ये राहत होता का, त्याशिवाय, आम्ही मेमनचे सोशल मीडिया खाते, कॉल डिटेल्स आणि ट्रॅव्हल हिस्ट्री देखील तपासत आहोत, असे वरिष्ठ आयपीएस अधिकारी म्हणाले.  या मेलचा विषय ‘डेंजर मॅन’ असा करण्यात आला असून ‘सरफराज मेमन जो धोकादायक असू शकतो’ असा उल्लेख मेलमध्ये करण्यात आला आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
एटीएसकडून त्याच्या प्रवासाचे तपशील तपासण्यात आले असता असे आढळून आले की, सरफराज याने २०१८ आणि २०१९मध्ये चीनला भेट दिली होती. परंतु, पाकिस्तानमधील प्रवासाबाबतची कुठलीही नोंद सापडली नाही.  ईमेलमध्ये आधार कार्ड, पासपोर्ट आणि ड्रायव्हिंग लायसन्स यांसारखे तपशीलदेखील होते. कागदपत्रांनुसार त्याचा जन्म १९८२ मध्ये झाला. त्याच्या प्रवासाच्या नोंदीबाबतही पोलीस अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. मुंबई हाय अलर्टवर आहे आणि मेमनबद्दल अधिक तपशील मिळवण्यासाठी पोलिसांनी त्यांचे खबरी आणि इतर नेटवर्कला देखील सतर्क केले आहे. एटीएसच्या एका माजी वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, १९९२ ते २०२१ या काळात दहशतवादी संशयिताने चीनमध्ये प्रशिक्षण घेतल्याचे आम्ही ऐकले नाही.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here