त्याने बनवलेल्या केकमधून चढायची नशा… एनसीबीने घेतले ताब्यात

अनेक पार्ट्यांमध्ये या केकचा पुरवठा होत असल्याचे एनसीबीच्या चौकशीत समोर आले आहे.

75

मुंबईसह उनगरात होणाऱ्या ड्रग्स पार्ट्यांमध्ये ‘हॅश ब्राऊनी’ केकची मोठ्या प्रमाणात मागणी आहे. अंमली पदार्थ मिश्रित ब्राऊनी केक तयार करुन त्याचा पुरवठा करणाऱ्या एका मानसशास्त्रज्ञा सोबत दोघांना नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने अटक केली आहे. या मानसशास्त्रज्ञाकडून एनसीबीने हशीस, अफू, चरस या अंमली पदार्थांपासून तयार केलेले १० किलो ब्राऊनी केक जप्त केले आहेत.

कोण आहे चारनिया?

रहमीन चारनिया असे या मानसशास्त्रज्ञाचे नाव आहे. दक्षिण मुंबईतील एका नामांकित रुग्णालयात मानसोपचार तज्ज्ञ असणारा हा डॉक्टर माझगाव येथील रहिवासी आहे. एनसीबीने रविवारी रमजान शेख या ड्रग्स विक्रेत्याला ५० ग्राम हशिस या अंमली पदार्थसह अटक केली. त्याच्या चौकशीत तो रहमीन चारनिया याच्यासह अनेकांना अंमली पदार्थांचा पुरवठा करत असल्याचे समोर आले.

(हेही वाचाः ड्रग्स तस्करीसाठी होतो महिला आणि मुलांचा मोठ्या प्रमाणात वापर)

असे आहेत ब्राऊनी केक

सोमवारी रात्री उशिरा एनसीबीने दक्षिण मुंबईतील माझगाव येथे छापा मारुन रहमीन चारनिया या मानसोपचार तज्ज्ञाला अटक केली आहे. रहमीनच्या घरातून एनसीबीने १० किलो ब्राऊनी केक आणि ३२० ग्राम अफू जप्त केली आहे. हशिस, अफू, चरस इत्यादी अंमली पदार्थांचे मिश्रण करुन हे मिश्रण टाकून, त्याचे ब्राऊनी केक तो तयार करत होता. अनेक पार्ट्यांमध्ये या केकचा पुरवठा होत असल्याचे एनसीबीच्या चौकशीत समोर आले आहे.

अशी होते नशा

ब्राऊनी केक तयार करताना त्यात अंमली पदार्थांची किती मात्रा टाकल्यास किती नशा होते, याचा पूर्णपणे अभ्यास चारनिया याने केला होता. त्याने तयार केलेल्या ब्राऊनीला ‘हॅश ब्राऊनी’ असे नाव त्याने दिले होते. हे हॅश ब्राऊनी केक खाल्ल्यानंतर सुमारे ६ ते ७ तास नशा असते. या हॅश ब्राऊनीला उपनगरात मोठी मागणी असल्याचे समजते.

(हेही वाचाः प्रियकराला परत मिळवण्यासाठी ती त्याच्याकडे गेली आणि त्याने जे सांगितले ते केले, पण त्यानंतर…)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.