वाराणसीच्या ज्ञानवापी येथे शृंगार गौरी आणि इतर देवतांचे नियमित दर्शन घेण्याच्या संदर्भातील याचिकेवर सोमवारी सुनावणी झाली. राखी सिंगसह 5 महिलांच्या वतीने दाखल याचिकेवर जिल्हा न्यायाधीश डॉ.अजय कृष्ण विश्वेश यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. त्यात आज मुस्लीम पक्षाने आपले म्हणणे मांडले. न्यायालयाने 12 जुलै ही पुढील सुनावणीची तारीख निश्चित केली आहे.
(हेही वाचा – Drugs Case: सुशांत सिंह राजपूतचा रूममेट सिद्धार्थ पिठाणीला जामीन मंजूर)
दिल्लीच्या राखी सिंह आणि वाराणसीच्या लक्ष्मी देवी, सीता शाहू, मंजू व्यास आणि रेखा पाठक यांनी 17 ऑगस्ट 2021 रोजी दाखल केलेल्या याचिकेवर दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ विभाग) यांच्या न्यायालयाने ज्ञानवापी परिसराचे सर्वेक्षण करून तेथील वाजुखानामध्ये दावा केलेल्या शिवलिंगाला सील ठोकण्याचे आदेश दिले होते. अंजुमन इनजानिया यांनी याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. सर्वोच्च न्यायालयाने वादीच्या खटल्याच्या योग्यतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत प्रतिवादी पक्षाने दाखल केलेल्या अर्जावर प्राधान्याने सुनावणी करण्याचे आदेश जिल्हा न्यायाधीशांना दिले होते. तेव्हापासून जिल्हा न्यायालयात सुनावणी सुरू आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर 23 मे पासून जिल्हा न्यायालयात सुनावणी सुरू आहे. दिवाणी प्रक्रिया संहिता सीपीसीच्या आदेश 7 नियम 11 नुसार, हे प्रकरण ऐकणे योग्य आहे की नाही यावर न्यायालयात सुनावणी सुरू आहे. मागच्या सुनावणीत मुस्लीम पक्षाने युक्तिवाद केला होता. आजही मुस्लीम पक्षाने आपला युक्तिवाद मांडला. सुनावणीदरम्यान कोर्टरूममध्ये फक्त 40 लोकांना परवानगी होती. माध्यमांना न्यायालयाबाहेर ठेवण्यात आले होते. याशिवाय संवेदनशीलता लक्षात घेऊन न्यायालयाच्या कक्षाबाहेर मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
Join Our WhatsApp Community