मनसुखची ‘ती’ गाडी कोणी चोरली? आता एनआयए करणार तपास

कार चोरी प्रकरण हे मनसुख हत्या आणि स्फोटके प्रकरणाशी संबंधित असल्यामुळे हा तपास देखील एनआयएला देण्यात आला आहे.

58

मुकेश अंबानी स्फोटके, तसेच मनसुख हिरेन हत्या प्रकरणानंतर आता मनसुख हिरेन स्कॉर्पिओ चोरी प्रकरणाचा तपास देखील एनआयएने आपल्या ताब्यात घेतला आहे. हा चोरीचा गुन्हा कुणाच्या सांगण्यावरुन दाखल करण्यात आला, याबाबत एनआयएकडून विक्रोळी पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्याकडे चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

म्हणून तपास एनआयएकडे

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अंटालिया या राहत्या घराजवळ स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ कार २५ फेब्रुवारी रोजी गावदेवी पोलिसांना सापडली होती. या स्कॉर्पिओ कारचा मालक मनसुख हिरेन याने ही कार विक्रोळी परिसरातून चोरीला गेल्याची तक्रार विक्रोळी पोलिस ठाण्यात दाखल केली. याप्रकरणी विक्रोळी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला होता. या कार चोरीचा तपास एनआयएने आपल्या ताब्यात घेतला असून, कार चोरी प्रकरण हे मनसुख हत्या आणि स्फोटके प्रकरणाशी संबंधित असल्यामुळे हा तपास देखील एनआयएला देण्यात आला असल्याची माहिती, मुंबई पोलिस दलातील एका अधिकाऱ्याने दिली.

(हेही वाचाः वाझेने दाखल केलेल्या गुन्ह्यांची चौकशी करा… मुंबई पोलिस आयुक्तांचे आदेश!)

असा करणार तपास

स्कॉर्पिओ कार चोरी प्रकरणाचा गुन्हा कुणाच्या सांगण्यावरुन घेण्यात आला, तसेच गुन्हा दाखल केल्यानंतर या गुन्ह्याचा तपास करण्यात आला होता का? जर तपास केला असेल तर काय तपास केला, याबाबत माहिती एनआयएकडून घेतली जाणार आहे. तसेच गुन्हा दाखल करणारा अधिकारी, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, दिवसपाळीवर असणारे पोलिस निरीक्षक आणि परिमंडळ अधिकारी यांच्याकडे याबाबत चौकशी करण्यात येणार असून, त्यांचा जबाब नोंदवण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.