नगरसेवकांच्या प्रभागांची संख्या वाढणार, पण सभागृहातील आसन क्षमता एवढीच

137

मुंबई महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीकरता नगरसेवकांच्या प्रभागांची संख्या २२७ वरून २३६ एवढी करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. परंतु २३६ नगरसेवक आणि पाच नामनिर्देशित सदस्यांची संख्या पाहता सभागृहातील एकूण संख्या २४१ एवढी होणार आहे. परंतु महापालिकेच्या सभागृहातील आसन क्षमता पाहता १४१ नगरसेवकांसह चिटणीस विभाग व प्रशासकीय समितीचे अधिकारी व कर्मचारी तसेच वृत्तांकन करणारे पत्रकार आणि उपस्थित राहणारे अधिकारी यांची संख्या पाहता सभागगृहातील आसन क्षमता कमी पडणार आहे. त्यामुळे सभागृहातील पुतळ्यांना आणि पत्रकारांसह अधिकाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवावा लागणार आहे.

(हेही वाचा – मुंबई महानगरपालिकेत ९ प्रभाग वाढविण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय)

सदस्य वाढल्याने आसन क्षमता वाढवण्याची गरज

मुंबई महापालिकेतील नगरसेवकांच्या प्रभागांची संख्या २२१ वरून २२७वर करण्यात आली होती. महापालिका मुख्यालयातील हेरिटेज इमारतींमध्ये असलेल्या ऐतिहासिक सभागृहातही बसण्याची आसन क्षमता ही दाटीवाटीने बसल्यानंतर २५० एवढी आहे. सध्या या सभागृहात राष्ट्रपुरुषांचे १३ पुतळे आहेत. सभागृहाच्या दोन्ही बाजुच्या भिंतीला चिकटून पुतळे बसवलेले असून यामुळे बरीच जागा व्यापून गेली आहे. त्यामुळे सद्यस्थितीत २२७ अधिक ५ नामनिर्देशित सदस्यांसह सभागृहात २३२ नगरसेवक सभागृहात बसतात. त्यामध्ये चिटणीस विभागाचे किमान १५ अधिकारी व कर्मचारी, प्रशासकीय समितीचे चार ते पाच अधिकारी आणि उपस्थित राहणारे अधिकारी वर्ग यांची संख्या पाहता तसेच सभागृहाचे वृत्तांकन करणारे किमान १५ पत्रकारांची संख्या पाहताही सभागृहाची जागा अपुरी पडत आहे. त्यातच आता ९ सदस्य वाढल्याने सभागृहातील आसन क्षमता वाढवण्याची गरज निर्माण झाली आहे.

हेरिटेज वास्तू असल्याने विस्तारीकरण अशक्य

महापालिका सभागृहाचे विस्तारीकरण करण्याची मागणी मागील अनेक वर्षांपासून होत आहे. परंतु हेरिटेज वास्तू असल्याने याचे विस्तारीकरण होऊ शकत नाही. त्यामुळे सभागृहाच्या व्हरांड्यातील जागांमध्ये पुतळे स्थलांतरीत करून सभागृहातील सर्व जागेचा वापर आसनांकरता राखीव करण्याचा विचार करावा लागणार आहे. तसे केल्यास पुतळे व्हरांड्यात आणून सभागृहाचे सर्व दरवाजे खुले करून तिथेच पत्रकार आणि अधिकाऱ्यांसाठी आसन व्यवस्था केल्यास सभागृहात सर्व २४१ नगरसेवकांना बसता येणार आहे. त्यामुळे प्रशासनाने आता त्यादृष्टीकोनातून विचार सुरु असल्याचे महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. व्हरांड्यांची जागा वातानुकुलिन यंत्रणांच्यादृष्टीकोनातून बंदिस्त करून त्या जागेचा वापर केला जावू शकतो,असे काही अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे सभागृहाच्या विस्तारीकरणासाठी प्रशासन स्तरावर विचार सुरु असून लवकर यावर निर्णय घेऊन कामाला सुरुवात केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.