एका दिवसांत राज्यात ४६ हजारांच्या घरात रुग्ण आढळले असून, ३२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. बुधवारी राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ दिसून आली. दिवसभरात ४६ हजार ७२३ कोरोनाचे नवे रुग्ण आढळल्याने आता कोरोनामुळे आरोग्य व्यवस्थेसमोर पुन्हा मोठे आव्हान उभे राहिले आहे. एकीकडे सरकारी रुग्णालयातील डॉक्टर्स आणि कर्मचारीही आजारी पडत असल्याने रुग्ण सेवेवरही ताण उभा राहिला आहे. यंदाच्या वर्षात पहिल्यांदाच राज्यात ३२ रुग्णांना जीव गमवावा लागला.
दुसरीकडे राष्ट्रीय कोशिका विज्ञान केंद्र, राष्ट्रीय विज्ञान संस्था, बी जे मेडिकल महाविद्यालयांच्या अहवालाच्या आधारे दिवसभरात ८६ ओमायक्रॉनच्या रुग्णांचे निदान झाले. मात्र वाढत्या कोरोना रुग्णांच्या तुलनेत अद्यापही ओमायक्रॉन चाचण्या वाढवण्याचे आव्हान सरकारसमोर उभे आहे. ४६ हजार ७२३ कोरोना रुग्णांच्या तुलनेत केवळ ८६ ओमायक्रॉनबाधितांचा शोध घेण्यात आला.
( हेही वाचा : रुग्ण वाढीचा पारा पुन्हा वर चढला… )
पुण्यात ५३ ओमायक्रॉनचे रुग्ण
बुधवारी पुण्यात तब्बल ५३ ओमायक्रॉनच्या रुग्णांचे निदान झाले. पुणे ग्रामीण भागांत एकच ओमायक्रॉनचा रुग्ण आढळून आला. पिंपरी-चिंचवडमध्ये ६, तर नाशकात २ ओमायक्रॉनचे रुग्ण आढळले. मात्र आतापर्यंत १ हजार ३६७ ओमायक्रॉनबाधितांचा शोध आरोग्य विभागाने लावला असून, त्यापैकी सर्वात जास्त संख्या मुंबईत आढळून आली आहे. मुंबईत ६२७, पुण्यात ३२९ ओमायक्रॉनचे रुग्ण आतापर्यंत दिसून आले आहेत. १ हजार ३६७ रुग्णांपैकी ७३४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने आता केवळ ६३३ सक्रीय ओमायक्रॉनबाधित रुग्णांवर राज्यांतील विविध भागांत उपचार सुरु आहेत.
Join Our WhatsApp Community