पुण्यातील वाहतूक कोंडीला कारणीभूत ठरलेला चांदणी चौकातील पूल पाडण्याची तारीख अखेर समोर आली आहे. येत्या २ ऑक्टोबरला हा पूल पाडण्यात येईल. पूल पाडल्यानंतर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पर्यायी रस्त्याचे काम सध्या युद्धा पातळीवर सुरू आहे.
( हेही वाचा : चाईल्ड पोर्नोग्राफी प्रकरणी CBI ची मोठी कारवाई! देशात ५६ ठिकाणी छापे)
चांदणी चौकातील जुना पूल पाडण्यात येणार
चांदणी चौकातील हा पूल पाडण्याचे नियोजन, यासाठी लागणारी यंत्रसामग्री, पूल पाडण्यासाठी लागणारा कालावधी, राडारोडा टाकण्याचे ठिकाणी याबाबतचा सविस्तर अहवाल २७ सप्टेंबरला सादर करण्यात येणार आहे. काही दिवसांपूर्वीच हा पूल पाडण्यासाठी जोरदार तयारी सुरू करण्यात आली होती. दोन दिवसांपूर्वी पहिला ब्लास्ट करण्यात आला होता याचा अंदाज घेत भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून पूल पाडण्याची तारीख निश्चित करण्यात आली आहे. हा पूल पाडण्यासाठी Edifice engineering या कंपनीची NHAI ने निवड केली आहे. या कंपनीकडून काही दिवसांपूर्वी ट्वीन टॉवर्स पाडण्यात आले होते. याच तंत्रज्ञानाचा वापर करून पुण्यातील चांदणी चौकातील जुना पूल पाडण्यात येणार आहे.
एनडीए-पाषाण पूल पाडल्यानंतर त्याखालील महामार्ग जवळपास ३६ मीटर रुंदीचा होणार आहे. सध्या या ठिकाणी मुंबईच्या दिशेने जाणारी व मुंबईहून पुण्याला येणारी अशा दोन लेन आहेत. रुंदीकरणात मात्र पुण्याहून-मुंबईला जाण्यासाठी ३, तर मुंबईहून पुण्याला येण्यासाठी ३ अशा एकूण सहा लेन तयार होणार आहेत. त्यामुळे पुलाजवळ होणारी वाहतूक कोंडीची समस्या सुटणार आहे, अशी माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून देण्यात आली.
Join Our WhatsApp Community