स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी भारतमातेच्या स्वातंत्र्यासाठी अंदमानच्या सेल्युलर जेलमध्ये असंख्य यातना सोसल्या. त्यानंतर त्यांना रत्नागिरी येथे स्थानबद्ध करण्यात आले होते. या काळात रत्नागिरीपासून जवळच असलेल्या शिरगांव या गावी काही महिने सावरकरांचे वास्तव्य होते. शिरगांवातील दामले कुटुंबीयांच्या घरातील ज्या खोलीत सावरकरांनी वास्तव्य केलं, ती खोली आजही या कुटुंबीयांनी जतन करुन ठेवली आहे.
मात्र, रत्नागिरीत पर्यटनासाठी येणारे पर्यटक आजही या वास्तूपासून अनभिज्ञ असल्याची खंत विष्णूपंत दामले यांचे वंशज प्रसन्न दामले यांनी व्यक्त केली आहे. महान क्रांतिकारक स्वातंत्र्यवीर सावरकरांचा सहवास लाभलेली ही वास्तू पर्यटनाच्या दृष्टीने फार महत्वाची असून, सरकारी पातळीवर या वास्तूचा विशेष प्रसार आणि प्रचार होत नसल्याचे समोर येत आहे.
(हेही वाचाः स्वातंत्र्यवीर सावरकर विद्यालयाकडे ठाकरे सरकारचे दुर्लक्ष)
शिरगांवातील दामले यांच्या घरी वास्तव्य
1924 ते 1937 या तेरा वर्षांच्या काळात इंग्रज सरकारने सावरकरांना राजकीय कार्यात सहभाग न घेण्याच्या अटीवर रत्नागिरी येथे स्थानबद्ध केले होते. 1924 साली रत्नागिरीत प्लेगच्या साथीने धुमाकूळ घातला. त्यामुळे सावरकरांच्या प्रकृतीला काही अपाय होऊ नये, अशी इच्छा सावरकरप्रेमींच्या मनात होती. रत्नागिरीपासून जवळच असलेल्या शिरगांव या गावी राहणारे विष्णूपंत दामले हे त्यापैकीच एक होते. त्यांनी प्लेगच्या साथीची माहिती मिळताच सावरकरांची रत्नागिरी येथे भेट घेतली. शिरगांव येथील आपल्या राहत्या घरी एक खोली आहे, तिथे आधी धान्याची कोठडी होती, त्या खोलीत आपण राहाल का, अशी विनंती दामले यांनी सावरकरांना केली. त्यावेळी काळ कोठडीपेक्षा तुमची धान्याची कोठडी चांगलीच, असं म्हणत सावरकरांनी त्यांच्या विनंतीला होकार दिला होता.
पर्यटक अनभिज्ञ
नोव्हेंबर 1924 ते जून 1925 या सात महिन्यांच्या काळात सावरकर दामले यांच्या घरातील या खोलीत राहत होते. सावरकरांच्या या वास्तव्याला आता 98 वर्ष पूर्ण झाली आहेत. परंतु आजही दामले कुटुंबीयांच्या पुढच्या पिढीने ही खोली एखादं प्राचीन मंदिर जतन करुन ठेवावं त्याप्रमाणे जतन केली आहे. सावरकरांनी वापरलेल्या वस्तूंचे देखील या खोलीत संवर्धन करण्यात आले आहे. पण या वास्तूकडे मात्र सरकारचे दुर्लक्ष होताना दिसत आहे. रत्नागिरीत येणा-या पर्यटकांपैकी मोजकेच पर्यटक या वास्तूस भेट देण्यासाठी येतात. वर्षाकाठी 25 पर्यटकही भेट देत नाहीत, असं प्रसन्न दामले यांनी म्हटलं आहे. ही वास्तू अनेक ऐतिहासिक घटनांची साक्षीदार आहे. पर्यटकांचे प्रेरणास्थान म्हणून ही वास्तू फार महत्वाची आहे. सध्याच्या काळात अनेक ऐतिहासिक वास्तू या नामशेष होण्याच्या वाटेवर असताना, स्वातंत्र्यवीर सावरकरांचं वास्तव्य असलेल्या या वास्तूला ऐतिहासिक पर्यटन स्थळाचा दर्जा मिळावा, अशी मागणी शिरगांव आणि रत्नागिरी जिल्ह्यातील रहिवाशांकडून होत आहे.
(हेही वाचाः रत्नागिरीत वीर सावरकरनिर्मित हिंदू धर्मध्वज फडकला! )
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संकल्पनेचे उगमस्थान
शिरगांवातील वास्तव्यादरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकर भेटायला येणा-यांना मार्गदर्शन करत असत. याचवेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. केशवराव हेडगेवार यांनीही सावरकरांची भेट घेतली होती. मार्च 1925 मध्ये झालेल्या या भेटीत सावरकर आणि हेडगेवार यांच्यात गहन चर्चा झाली. या भेटीनंतर काही काळाने हेडगेवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली. त्यामुळे संघासारख्या मोठ्या संस्थेच्या संकल्पनेचा उगम याच घरातील या छोट्याशा खोलीतून झाल्याचे देखील म्हटले जाते. तसेच या वास्तूचे ऐतिहासिक महत्व सांगणा-या फलकाचे अनावरणही सध्याचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते 2006 रोजी करण्यात आले आहे.
Join Our WhatsApp Community