असा रंगला पोलीस आणि मूकबधिर आरोपीमध्ये प्रश्न-उत्तराचा खेळ!

141
पोलीस आणि आरोपीमध्ये प्रश्न-उत्तराचा खेळ रंगला होता. आरोपी मूकबधिर असल्यामुळे त्याला विचारले जाणारे प्रश्न एका वहीत लिहून दिले जात होते आणि आरोपी या प्रश्नांची अचूक उत्तरे प्रश्नाच्या खाली लिहून देत होता. पोलीस आणि आरोपीमध्ये रंगलेला हा खेळ बघण्यासाठी गुन्हे प्रकटीकरण पथकाच्या खोलीत वरिष्ठ अधिकारी देखील हजर होते.
मोटारसायकली चोरी प्रकरणी घाटकोपर पोलिसांनी कुलाबा येथून दिनेश कुमार रामलाल याला मोठ्या शिताफीने अटक केली. अटक केल्यानंतर मात्र तो मूकबधिर असल्याचे कळताच त्याच्याकडे चौकशी कुठल्या पद्धतीने करायची असा प्रश्न पोलीस उपनिरीक्षक खैरमाटे यांना पडला होता. आरोपी सराईत मोटारसायकल चोर असल्यामुळे त्याने चोरलेल्या मोटार सायकलीचा शोध कशा पद्धतीने घ्यायचा असा प्रश्न तपास पथकाला पडला होता. तपास पथकाच्या लक्षात एक बाब आली होती, ती म्हणजे आरोपीला लिहिता-वाचता येत होते. तपास अधिकारी खैरमाटे यांनी शक्कल लढवली आणि एक वही पेन आणून आरोपीच्या समोर बसून प्रश्न उत्तराचा खेळ सुरू केला. या प्रश्न उत्तरातून आरोपीने पाच गुन्ह्याची कबुली देत तपास पथकाला चोरलेल्या मोटारसायकली ठेवलेले ठिकाण दाखवले, अशा पद्धतीने पोलिसांनी चोरीच्या ५ मोटारसायकली हस्तगत केल्या.

ई चलनामुळे पकडला गेला…

घाटकोपर असल्फा व्हिलेज येथून चोरीला गेलेल्या मोटरसायकलचे कुलाबा वाहतूक विभागाकडून ई चलन कापण्यात आले होते, सिग्नल जम्प केल्याप्रकरणी या ई चलनाचा मेसेज मोटरसायकलच्या मूळ मालकाच्या मोबाईल क्रमांकावर आला होता. मूळ मालकाने ही बाब तपास अधिकारी खैरमाटे यांच्या लक्षात आणून दिली. खैरमाटे यांनी या ई चलनाच्या आधारे आरोपीचा शोध घेण्यासाठी कुलाबा गाठले, ज्या दिवशी आरोपीचा शोध सुरू होता त्याच दिवशी दुसऱ्यांदा चोरीच्या मोटारसायकलचे ई चलन कापले गेले आणि त्याचा मेसेज मूळ मालकाला आले होते. ज्या ठिकाणी ई चलन कापले गेले त्या ठिकाणी तपास पथक आरोपीचा शोध घेत असताना नेमका आरोपी हा तपास पथकाच्या नजरेस पडला. तपास पथकाने त्याला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले.

टोइंग व्हॅनवर करीत होता नोकरी…

दिनेश कुमार रामलाल (२३) असे अटक करण्यात आलेल्या मोटारसायकल चोराचे नाव आहे. दिनेश हा दक्षिण मुंबईतील कफ परेड परिसरात राहत आहे. जन्मताच मूकबधिर असणारा दिनेश हा मूळचा उत्तर प्रदेश राज्यातील आहे. नोकरीच्या शोधात तो मुंबईत आला होता आणि एका खाजगी टोइंग व्हॅनवर काम करीत होता, त्यानंतर तो मुंबई वाहतूक पोलिसांच्या कंत्राटी टोइंग व्हॅनवर वाहने टो करण्याचे काम करीत होता.

टोइंग व्हॅन वरील नोकरी गेली….

कोरोनामध्ये रोजगार गेल्यानंतर दिनेश हा छोटे-मोठे काम करून स्वतःचा उदरनिर्वाह चालवत होता, परंतु त्यातून त्याला केवळ पोटापूरते मिळत होते, म्हणून त्याने रस्त्यावर पार्क करण्यात आलेल्या मोटारसायकली चोरीचा मार्ग पत्करला. मोटारसायकली विना चावी शिवाय कशी सुरू करायची हे माहीत असल्यामुळे त्याने मुंबईत मोटरसायकल चोरी करण्याचा सपाटा लावला होता.

या पथकाने केला तपास…

घाटकोपर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोटार सायकल चोरीच्या घटना घडू लागल्यामुळे घाटकोपर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय कोकाटे, पोलीस निरीक्षक प्रमोद कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पो.उप.नि. खरमाटे आणि गुन्हे प्रकटीकरण पथकातील अंमलदार यांनी तपास सुरू केला होता.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.