गुन्हेगाराला पोलिसांनी नाही तर शिक्षकांनी बोलते केले! कसे? वाचा…

पोलिसांनी शाळेच्या शिक्षकाची मदत घेतली आणि त्या चोराला अखेर बोलतं करण्यात आले. 

चोरीच्या गुन्ह्यात आरोपीला अटक तर केली, मात्र तो तोंडातून एकही शब्द काढत नसल्यामुळे पोलिसांची चांगलीच पंचाईत झाली होती. या चोरासमोर डोके आपटून झाल्यानंतर पोलिसांना कळले की, हा तर मूकबधिर चोर आहे. त्यामुळे त्याला बोलतं करण्यासाठी अखेर पोलिसांनी मूकबधिर शाळेच्या शिक्षकाची मदत घेतली आणि त्या चोराला अखेर बोलतं करण्यात आले.

काय घडले नेमके?

मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकावर ८ जून रोजी गावी जाणाऱ्या ट्रेनची वाट पाहणाऱ्या भारतीय सैन्य दलातील जवान संतोष गायकवाड यांचे रात्रीच्या वेळी सामान चोरीला गेले होते. मुंबई सेंट्रल रेल्वे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर, गुन्हे प्रकटीकरण अधिकारी सुनील डोके यांच्या पथकाने या चोराचा शोध घेत त्याला अटक केली. पोलीस ठाण्यात आणल्यानंतर त्याच्याकडे चौकशी सुरू केली. मात्र त्याच्या तोंडातून एक शब्द ही बाहेर पडत नसल्याचे बघून, चौकशी करणारे अधिकारी कंटाळले. हा बोलत का नाही म्हणून त्याला प्रेमाने घेत पुन्हा चौकशी केली असता, तो चोर मूकबधिर असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले.

(हेही वाचाः केकमधून गांजा : भारतात नशेचा नवा ट्रेण्ड!)

असे केले बोलते

एवढा वेळ आपण ज्याला बोलतं करण्याचा प्रयत्न करत होतो, तो मूकबधिर निघाल्यामुळे तपास अधिका-यांची काळजी वाढली. आता हा कसा आपला गुन्हा कबूल करेल, चोरलेला माल त्याने कुठे ठेवला हे कसे सांगेल, म्हणून काळजीत असलेल्या तपास पथकापैकी एकाने मूकबधिर शाळेच्या शिक्षकांना बोलावले तर कदाचित हा काही तरी सांगेल म्हणून अखेर हा देखील उपाय करण्यात आला. वांद्रे येथील मूकबधिर शाळेतील एका शिक्षकाचा मोबाईल क्रमांक घेऊन त्यांना पोलिस ठाण्यात बोलवण्यात आले. या शिक्षकाने अखेर हातवारे आणि इशाऱ्यावरुन या मूकबधिर चोराला बोलतं केलं आणि त्यांने आपला गुन्हा देखील कबूल केला.

अनेक गुन्हे दाखल

सलीम उर्फ तुषार(३३) असे या मूकबधिर चोराचे नाव असून, तो भांडुप येथील खिंडीपाडा येथे राहणारा आहे. सलीम हा लहानपणापासून मूकबधिर असून, त्याच्यावर मुंबईत ६ ते ७ गुन्हे दाखल असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक मेहबूब इनामदार यांनी दिली आहे. तसेच या गुन्ह्यातील चोरीला गेलेली मालमत्ता देखील हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.

(हेही वाचाः पर्यटकांची लोणावळा-खंडाळामध्ये गर्दी : कोरोना निर्बंधांचे उल्लंघन)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here