भारतात मुलींची पहिली शाळा कोणी सुरू केली? असा प्रश्न विचारला तर आपल्या डोळ्यापुढे सहजच महात्मा फुले यांचे नाव येते. पण कुठे सुरू केली अस विचारलं तर कुठल्या तरी, वाड्यात सुरू केली होती असं उत्तर ऐकायला मिळतं. आणखी पुढे जाऊन त्यांनी ती कोणत्या वर्षी असे विचारले तर आपल्यापैकी बहुतेकांना ते सांगता येत नाही. आजच्या दिवशी म्हणजे १ जानेवारी १८४८ या नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी महात्मा फुले यांनी मुलींची पहिली शाळा पुण्यातील भिडे यांच्या वाड्यात सुरू करण्यात आली होती. इतरांच्या मुलींना शिकवण्याआधी आपल्या घरातील स्त्री शिकलेली पाहिजे आणि सोबतच मुलींच्या शाळेला महिलाच शिक्षिका पाहिजे या विचारांनी प्रेरित होऊन त्यांनी आधी पत्नीला शिकवण्याचा धाडसी निर्णय घेतला आणि सावित्रीबाई फुले यांना शिक्षिका केलं. त्यांच्या या महान कार्याला ब्राह्मणांनी आणि बहुजनांनीसुद्धा मोठा विरोध केला. कोणाच्याही विरोधाला न जुमानता, न डगमगता महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी मुलींना शिकवण्याचे आपले काम नेटाने पुढे सुरू ठेवले.
सवित्रीच्या लेकीची पहिल्या शाळेची दुरावस्था
जेव्हा ही शाळा सुरु करण्यात आली तेव्हा सावित्रीबाई यांचे वय अवघे १८ वर्षे होते. १८४८ च्या सुरुवातीला या शाळेत केवळ ६ मुली होत्या. पण, ते वर्ष संपेपर्यंत ही संख्या ४० मुलींपर्यंत जाऊन पोहचली. अनेक संघर्ष करत हा सावित्रीबाईंचा शिक्षणप्रसाराचा उपक्रम सुरुच राहिला. हा झाला इतिहास. पण, अखंड देशात स्त्री शिक्षणाच्या क्रांतीची बीजे पेरणाऱ्या आणि फुले दांपत्याच्या कार्याचा वारसा सांगणाऱ्या या शाळेची आज १७२ वर्षांनंतरची अवस्था मात्र, अत्यंत दयनीय झाली आहे. वाड्याची सद्यस्थिती पाहिली तर अंधाऱ्या खोल्या, पडलेल्याला भिंती, कोलमडून पडलेले लाकडी खांब, जमलेली धूळ, जाळे-जळमटं यांनी व्यापलेला अंतर्गत परिसर अशी काहीशी आहे. वाड्यात आत जाण्यासाठी आता रस्ताही नाही.
(हेही वाचा – देशातील ‘त्या’ होत्या पहिल्या शिक्षिका, ज्यांनी दिला स्त्री शिक्षणावर भर)
भिडेवाड्याची दुरावस्था लज्जास्पद!
विद्येचं माहेरघर असणाऱ्या पुण्यात मुलींना शिक्षणाची दारं खुली करणाऱ्या भिडेवाड्याची ही अशी दुरावस्था नक्कीच लज्जास्पद आहे. आजपर्यंत याकडे शासन, प्रशासनाचं तर दुर्लक्ष झालचं आहे. आज पडझड झालेल्या त्या वाड्याचं स्वतःचं अस्तित्व टिकेल की नाही, अशी अवस्था आहे. हा वाडा शेवटच्या घटकाच मोजतोय की काय, असा प्रश्न पडत आहे.
Join Our WhatsApp Community