पेंच अभयारण्यातील वाघाच्या बछड्याच्या मृत्यूचे कारण आले समोर…

127
शुक्रवारी सायंकाळी पेंच व्याघ्र प्रकल्पात आठ ते नऊ महिन्यांच्या वाघाच्या बछड्याचा मृतदेह आढळून आला होता. या बछड्याचे शनिवारी वनविभागातील पशुवैद्यकीय अधिकारी व वनाधिका-यांच्या उपस्थितीत शवविच्छेदन झाले. या बछड्याचे दुस-या मांसभक्षी प्राण्याशी झालेल्या लढाईत मृत्यू झाल्याचे शवविच्छेदनानंतर समोर आले.

शिकारीच्या हेतूने बछड्याचा मृत्यू नाही 

पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या अतिसंरक्षित क्षेत्रातील चोरबाहुली येथील बीट वनकक्ष ५९२ येथे शुक्रवारी वनाधिका-यांना टेहाळणीदरम्यान सायंकाळच्या सुमारास बछड्याचा मृतदेह आढळला होता. या मृत बछड्याच्या शरीराचे सर्व अवयव व्यवस्थित दिसून आल्याने, शिकारीच्या हेतूने वाघाच्या बछड्याचा मृत्यू झालेला नसल्याचे, वनाधिका-यांच्या लक्षात आले. सायंकाळनंतर वाघावर शवविच्छेदन करण्यास राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या नियमानुसार मनाई केली जाते.
शनिवारी सकाळी शवविच्छेदन प्रक्रिया पार पडली. मांसभक्षी प्राण्याशी संघर्ष झाल्याने, बछडा जखमी झाला. त्यातच बछड्याचा मृत्यू झाल्याचे, शवविच्छेदनानंतर समोर आलेल्या प्राथमिक अहवालात माहिती दिली गेली. पुढील तपासासाठी न्यायवैद्यक विभागाकडे नमुने पाठवण्यात आल्याची, माहिती पेंच व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक प्रभुनाथ शुक्ल यांनी दिली. यावेळी वन्यजीव संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे डॉ. सुजित कोलंगथ, ट्रान्झिट ट्रिटमेंट सेंटरचे डॉ. सुदर्शन काकडे, क्षेत्र संचालक श्रीलक्ष्मी, उपसंचालक प्रभुनाथ शुक्ल, साहाय्यक वनसंरक्षक अतुल देवकर, वनक्षेत्रपाल राहुल शिंदे, नागपूर वनविभागाचे मानद वन्यजीव रक्षक अजिंक्य भाटकर आदी अधिकारी उपस्थित होते. 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.