पूर्व उपनगरातील पवई व साकीविहार परिसरातील पूल आणि कल्व्हर्टच्या बांधकामांमध्ये अडसर ठरणाऱ्या केबल्सचा अडथळा दूर केला जात आहे. येथील पूल, पादचारी पूल आणि कल्व्हर्टच्या बांधकामांमध्ये एमएससीबी हाय टेन्शन वायर येत असल्याने ती अन्य जागी हलवणे आवश्यक आहे. परंतु या केबलच्या अडथळ्यामुळे या पुलांचे आणि कल्व्हर्टचे बांधकाम रखडले होते. अखेर हे काम पूर्ण होत असून केबल स्थलांतरीत करण्यासाठी येणाऱ्या खर्चाचा आवश्यक निधी एमएससीबीला दिला जात आहे.
ओव्हरहेड हाय टेन्शन वायर अन्य जागी हलवणे आवश्यक
आरे रोडवरील जयभिम नगर येथील पुलाचे रुंदीकरण करणे, पवईतील रेनसन्स हॉटेल येथे पादचारी पूलाची उभारणी तसेच पवई साकीविहार रोडवरील जुन्या विद्यमान कल्व्हर्टची कामे हाती घेण्यात आली आहे. या तिन्ही पुलांच्या कामांमध्ये राज्य विद्युत वितरण कंपनी (एमएससीबी) यांच्या अनुक्रमे २२ केव्ही, ११ केव्ही आणि ३३ केव्ही क्षमतेचे ओव्हरहेड हाय टेन्शन वायर येत असल्याने त्या अन्य जागी हलवणे आवश्यक होते.
या तिन्ही पुलांच्या कामाला गती
त्यामुळे यासाठी एमएससीबी पत्रव्यवहार करण्यात आल्यानंतर त्यांनी या तिन्ही प्रकल्पांच्या ठिकाणांवर केबल्स हलवण्यासाठी अनुक्रमे २८ लाख ९५ हजार, १२ लाख ९४ हजार आणि २९ लाख ४८ हजार रुपये अशाप्रकारे एकूण ७१ लाख ३७ हजारांच्या अंदाजित खर्चाचा तपशिल कळवला होता. त्यानुसार ही रक्कम देण्यात आली आहे. त्यामुळे या तिन्ही पुलांच्या कामाला गती प्राप्त झाली असून सध्या पूर्व उपनगरातील पुलांचा केबल अडथळा दूर होत असल्याचे दिसून येत आहे.
Join Our WhatsApp Community