जागतिक तापमानवाढीची झळ मानवी समूहासह सर्व प्राणीपक्ष्यांना बसलेली असताना वातावरणातील घटकांवरही आता भयावह परिणाम होत असल्याचे एका अभ्यासातून समोर आले आहे. पृथ्वीच्या पृष्ठभागावरून सुमारे १२ किलोमीटर उंचीवर असलेल्या थरात सर्वात जास्त घनता दिसून येते. तपांबर ( इंग्रजी भाषेत ट्रेपोस्पिअर)या नावाने ओळखल्या जाणा-या या थराची उंची गेल्या ४० वर्षांत तब्बल २०० मीटरने वाढली आहे. वातावरणातील या संवेदनशील आवरणाची उंची वाढणे ही धोक्याची घंटा असल्याचा अहवाल या अभ्यासात मांडण्यात आला आहे. याच कारणामुळे उष्णतेच्या लाटांचे प्रमाण वाढल्याची माहिती पर्यावरणतज्ज्ञ डॉ. प्रा. सुरेश चोपने यांनी दिली.
( हेही वाचा : महिला प्रवाशांसाठी भारतीय रेल्वेने घेतला मोठा निर्णय! )
यंदाच्या वर्षाच ऐन मार्च महिन्यात विदर्भात उष्णतेच्या दोन लागोपाठ लाटा आल्या. देशातील वायव्य व मध्य भारतात उष्णतेच्या लाटांची तीव्रता जास्त दिसून येत आहे. विदर्भातही ४६ अंशापर्यंत कमाल तापमानाची झळ पोहोचली आहे. यामागे पृथ्वीवरचे तपांबर हा वातावरणातील थर तापल्याचे कारण आहे, अशी माहिती पर्यावरणतज्ज्ञ डॉ. प्रा. सुरेश चोपने यांनी दिली. हवामानाच्या सर्व घडामोडी तपांबर या थरातच घडतात. ट्रपोस्पिअरचे आवरण तापल्यानेच सतत उष्णतेच्या लाटांचा मारा सुरु आहे. शिवाय वा-याची गती आणि हवेतील आर्द्रतेवरही परिणाम होत असल्याची माहिती डॉ. प्रा. चोपने यांनी दिली. या थरांतील बदल विमानप्रवासादरम्यानही दिसून येत असल्याचे निरीक्षण त्यांनी नोंदवले.
अहवालाविषयी माहिती
हा अभ्यास ५ नोव्हेंबर रोजी प्रकाशित झालेल्या सायन्स अॅडव्हान्स या मासिकात प्रसिद्ध झाला. १९८० ते २०२० या ४० वर्षांत मानवी हस्तक्षेपामुळे होणा-या निसर्गातील बदलाचा अभ्यास करण्यात आला. २० ते ८० अक्षांश उत्तर गोलार्ध भूभागातील वातावरणाचा अभ्यास केला गेला.
तपांबर थराला बाधा होण्याची कारणे
-वाढते प्रदूषण आणि हरित वायू उत्सर्जन
अभ्यासातील निरीक्षण –
- १९६० पर्यंत तपांबर हा थर स्थिर होता. मात्र हरित वायू उत्सर्जन तबांबरमध्ये गोळा होऊ लागला.
- सूर्याची उष्णता पृथ्वीपर्यंत पोहोचल्यानंतर पुन्हा वातावरणात परावर्तित होत नाही. हरित वायूंच्या उत्सर्जनामुळे सूर्याच्या उष्णतेला परावर्तित होता येत नाही. हा परिणाम तपांबरमध्ये होत असून, २००० सालापासून या थरातील तापमान ८० टक्क्यांनी वाढले आहे. गेल्या ४० वर्षांपासून तपांबरची उंची गेल्या २० वर्षांत जास्त वेगाने वाढली.