ठाण्याच्या बारमधील वसुली किती आणि कुणासाठी ?

पोलिसांना मोठी रक्कम पोहोचवली जात असल्याचा आरोप करण्यात येत असून, ही मोठी वसुली कुणासाठी केली जात आहे?

मुंबईतील बारमधून १०० कोटींच्या वसुलीचा आदेश सचिन वाझेला देण्यात आला होता, असा आरोप करुन राज्यभरात खळबळ उडवून देणाऱ्या लेटर बॉम्बमुळे राज्याचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांना पायउतार व्हावे लागले. मात्र याचा विसर ठाणे पोलिसांना पडला असल्याचे चित्र ठाणे पोलिस आयुक्तलयाच्या हद्दीत दिसून येत आहे.

वसुली कुणासाठी

राज्य सरकारकडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या निर्बंधांना ठाणे पोलिसांकडून वाटाण्याच्या अक्षदा लावण्यात येत असल्याचा प्रकार, एका वृत्तवाहिनीने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमुळे उघडकीस आला आहे. ठाण्यातील डान्स बार पहाटे ५ वाजेपर्यंत राजरोसपणे सुरू आहेत. मोबदल्यात पोलिसांना मोठी रक्कम पोहोचवली जात असल्याचा आरोप करण्यात येत असून, ही मोठी वसुली कुणासाठी केली जात आहे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

(हेही वाचाः मुंबईत तीन ठिकाणी एनसीबीचे छापे, तिघांना अटक)

गृहमंत्र्यांनी दिले कारवाईचे आदेश

ठाण्याच्या नौपाडा आणि वर्तक नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत पहाटे उशिरापर्यंत सुरू असलेल्या डान्स बारचा पर्दाफाश एका वृत्तवाहिनीने केला. त्यानंतर गृहमंत्र्यांनी याची गंभीर दखल घेऊन, ठाणे पोलिस आयुक्तांना तात्काळ कारवाई करण्याचे आदेश जारी केले. दरम्यान ठाणे पोलिस आयुक्त जयजीत सिंग यांनी नौपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल मांगले, वर्तक नगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय गायकवाड यांचे तडकाफडकी निलंबन करण्यात आले. तसेच सहाय्यक पोलिस आयुक्त नीता पाडवी आणि पंकज शिरसाठ यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे.

पोलिस झाले अॅक्टिव्ह

या कारवाईमुळे ठाणे पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत येणाऱ्या पोलिस ठाण्यातील वरिष्ठ पोलिस निरीक्षकांचे धाबे दणाणले आणि त्यांनी ताबडतोब हद्दीतील बार बंद करण्याच्या सूचना दिल्या. ठाणे, डोंबिवली, मानपाडा, शिळडायघर, बदलापूर, अंबरनाथ, कल्याण आदी शहरांत रात्री उशिरापर्यंत सुरू असणारे बार, ऑर्केस्ट्रा बार, डान्सबार मालकांना ‘सेक्शन गर्म’ हो गया है बार बंद करो, अशा सूचना देण्यात आल्या. तसेच बार बंद असल्याची खात्री करण्यासाठी रात्रभर पोलिसांनी आपल्या हद्दीत गस्त वाढवली होती.

(हेही वाचाः मानवी आरोग्यापेक्षा धर्म मोठा नाही! बकरी ईदसाठी सवलत मागणाऱ्यांना न्यायालयाने सुनावले!)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here